Ashadi wari 2022 Sant Dnyaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj Sopandev Maharaj palkhi near pandharpur
Ashadi wari 2022 Sant Dnyaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj Sopandev Maharaj palkhi near pandharpur  sakal
वारी

चिंब पावसात माउलींचे विश्वरूप दर्शन

विलास काटे

वाखरी : भगव्या पताकांची दाटी... ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष... टाळ-मृदंगाचा गजर... पावसाची संततधार... चिखलात नाचणारे वैष्णव... अशा भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात अश्वांनी दोन फेऱ्या मारून लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सोपानदेव महाराज यांच्यासह सकल संतांच्या पालख्यांसह आलेल्या लाखो भाविकांना वाखरीत माउलींच्या विश्वरूप दर्शनाची अनुभूती झाली. तब्बल अठरा दिवसांची पायी वाटचाल करीत पालखी सोहळे पंढरी समीप वाखरीत विसावले.

भंडी शेगाव येथील तळावर प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी महापूजा केली. भंडीशेगावहून दुपारी एक वाजता माउली निघणार असल्याने वारकरी आज निवांत होता. कांदे नवमीमुळे दिंड्या-दिंड्यामध्ये कांदा भजीचा बेत सुरू होता. दुपारचे भोजन घेऊन दुपारी एक वाजता माउलींचा पालखी सोहळा वाखरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. या वेळी पावसाने हजेरी लावली. त्यात अवघा सोहळा चिंब झाला. रस्ता रुंद झाल्यामुळे या वाटचालीत दरवर्षी होणारी वाहतूक यंदा दिसत नव्हती. तीनच्या सुमारास पालखी सोहळा वाखरीच्या उभ्या रिंगणाजवळ आला. चोपदारांनी दिंड्यांमधून जागा करून रिंगण घेतले. त्यातून पुढील बाजूने माउलींचा आणि स्वाराचा अश्व धावत रथाजवळ येऊन मागे काही दिंड्यांमध्ये गेला. तेथून फिरून पुन्हा रथाजवळ आला. तेथे सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी त्यांना प्रसाद दिला. त्यानंतर दोन्ही अश्वाने बेफाम वेगाने रिंगण रंगविले. त्यानंतर सोहळा गोल रिंगणासाठी शेजारील रिंगणात गेला. दिंड्यांतून वाट काढीत पालखी मधोमध ठेवण्यात आली. तिच्या पाठोपाठ पताकाधारींनी दाटी केली. या वेळी रिंगणात सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, योगेश देसाई ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे सरकार, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार आदी उपस्थित होते.

पालखी विराजमान होताच वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. दिंड्यांमध्ये ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष सुरू होता. भोपळे दिंडीतील मानकऱ्यांने रिंगणाच्या तीन प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर दोन्ही अश्वाने नेत्रदीपक दौड सुरू केली. दोन्ही अश्वाने दोन फेऱ्या मारल्या. अश्वांनी रंगविलेल्या रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पावसाची रिपरिप चालू असताना रंगलेल्या रिंगणानंतर उडीच्या खेळात वारकरी चिखलात लोळत खेळ खेळत होते. दरम्यान, रिंगणाजवळ उड्डाणपूल झाल्याने पुलावरून गोल आणि रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

संत नामदेव महाराजांना रथ भेट...

माउलींचा जुना रथ संत नामदेव महाराजांना भेट देण्यात आला. भंडीशेगाव तळावर हा सोहळा झाला. यावेळी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, योगेश कुऱ्हाडे, अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, राणू महाराज वासकर यांनी संत नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास, केशव महाराज नामदास, एकनाथ महाराज नामदास आणि निवृत्ती महाराज नामदास यांनी तो स्वीकारला.

पंधरा वर्षांपासून वारीत चालते. जीवनाचा आनंद वारीत पाहायला मिळतो. जिवाला समाधान देणारी वारी आहे. गेली दोन वर्ष वारी झाली नव्हती. त्यामुळे रिंगणाच्या आनंदाला मुकलो होते. यंदा रिंगण पाहून डोळ्याचे पारणे फिटले.

- छाया कुमकर, वीरगाव, जि. नगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT