Rupali
Rupali Sakal
वुमेन्स-कॉर्नर

सौंदर्यखणी : ‘चिकनकारी’ची अदाकारी

रश्मी विनोद सातव

‘चिकनकारी’ हे मूळचे पर्शियन भरतकाम असून, पर्शियन भाषेत त्याला ‘चिकीन’ म्हणतात. ‘चिकीनकारी’ म्हणजे सुई घाग्याने पातळ कापडावर भरतकाम करून सुंदर नक्षीकाम साकारणे. भारतात या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘चिकनकारी’ असे नाव रुळले.

इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक इतिहास अभ्यासक मेगॅसथेन्स याने भारतावर लिहिलेल्या ‘इंडिका’ या पुस्तकात, भारतात मसलिन कापडावर असे भरतकाम केले जात असल्याचा उल्लेख सापडतो. त्याच्याही आधी व्यापाराच्या निमित्ताने इराणमधून आलेल्या पर्शियन लोकांकडून ही कला भारतात रुजली असे मानले जाते. त्याकाळात फक्त पांढऱ्या शुभ्र मसलिन कापडावर पांढऱ्याच रंगाच्या रेशमी धाग्याने हे चिकनकाम केले जात असे. नंतरच्या काळात सतराव्या शतकात मुघल साम्राज्यातील सम्राट जहांगीरची बेगम ‘नूर जहाँ’ हिने या कलेला राजाश्रय दिला. मुघलकाळात भरभराटीला आलेल्या ‘चिकनकारी’ कलेवर मुघल साम्राज्यातील आर्किटेक्चरमधील कलाकुसरीचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो. पण स्वतः भरतकामात माहीर असलेल्या ‘नूर जहाँ’ने राजस्थान आणि काश्मिरी भरतकामाची गुंफण घालून ‘चिकनकारी’कलेत काही नवीन ‘टाके’ विकसित केले आणि त्यातून दोन संस्कृतींचा मिलाफ घडवून आणला. ‘लखनौ’मध्ये या कलेच्या कारागिरांना तिने वसविले आणि या कलेला प्रोत्साहन दिले. त्या काळात राजघराण्यातील स्त्रिया लखनवी चिकनचे दुपट्टे मोठ्या हौशीने बनवून घेत असत; पण ‘नूर जहाँ’च्या मृत्यूनंतर डबघाईला आलेल्या या कलेला १८३० मध्ये अवधच्या हैदर राजाने परत उर्जितावस्था दिली. आजही लखनौमध्ये चिकनकारी कापडाची मोठी बाजारपेठ आहे.

नंतरच्या काळात मसलिनव्यतिरिक्त सिल्क, सिफॉन, जॉर्जेट, नेट, क्रेप आणि ऑर्गेंझासारख्या पातळ कापडांवरही चिकनकारी केली जाऊ लागली. शिवाय पांढऱ्या रंगाबरोबरच इतर रंगात विशेषतः पेस्टल शेड्सवर पांढऱ्या रंगात केलेली चिकनकारी लोकप्रिय होऊ लागली.

साडीवर चिकनवर्क सुरू करण्यापूर्वी कागदावर आर्टिस्टकडून डिझाईन काढून घेतले जाते, मग ते डिझाईन साडीवर, ‘धुतल्या जाणाऱ्या इंडिगो शाईत’ छापले जाते. शक्यतो ज्या रंगाचे कापड असते त्याच रंगाच्या किंचित डार्क शेडच्या जाड धाग्याने किंवा पांढऱ्या रेशमी जाड धाग्याने चिकनवर्क केले जाते. त्यात काही वेळा बारीक सोनेरी किंवा चंदेरी बुंद (मुकेश), मणी किंवा छोटे आरसे गुंफून सुंदर कलाकृती निर्माण केल्या जातात. चिकनवर्कच्या साड्यांसाठी जरासे पातळ कापडच वापरले जाते, त्यामुळे या कलेतील ‘शॅडो-वर्क’ हा प्रकार कापडाच्या उलट्या बाजूने केला जातो आणि सुलट्या बाजूने भरलेल्या नक्षीबरोबर हे ‘शॅडो-वर्क’ अप्रतिम दिसते.

या भरतकामात बॅकस्टिच, शॅडो-वर्क, चेन स्टिच, जाळी, जंजिरा, बुलबुल, ताजमहाल इत्यादी एकूण ३२ स्टिचचे प्रकार वापरले जातात. चिकनकारीचे ठराविक कारागीर ठराविक स्टिचमध्ये वाकबगार असतात. एक स्टिच पूर्ण झाल्यानंतर साडी दुसऱ्या स्टिचसाठी दुसऱ्या कारागिरांकडे सोपवली जाते. लखनौमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला कारागिरांचा समावेश असून हे काम अत्यंत कौशल्य वापरून हाताने होत असल्यामुळे चिकनवर्क केलेली एकेक साडी म्हणजे कलेचा एकेक अद्‍भुत नमुना ठरते.

कलाकारांची आवडती चिकनकारी

‘अंजुमन’ या हिंदी चित्रपटात चिकनकारी-कारागिरांच्या कष्टांना अधोरेखित करण्यात आले होते. मुझफ्फर अली दिग्दर्शित या चित्रपटात शबाना आझमी आणि फारुख शेख यांनी काम केले होते. चित्रीकरणादरम्यान फारुख शेख चिकनकारी कलेने इतके प्रभावी झाले, की आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी चिकनवर्कचे कुर्ते आवर्जून वापरले. एकंदरीतच अत्यंत ‘एलिगंट’ दिसणाऱ्या चिकनवर्कच्या कुर्त्यांचा आणि साड्यांचा मराठी आणि हिंदी चित्रपट कलाकारांकडून मोठ्या प्रमाणात कायमच वापर होताना दिसतो.

रूपालीची ‘लकी’ साडी

‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत ‘संजना’ साकारणाऱ्या रेखीव चेहऱ्याच्या रूपाली भोसलेचा, २००९ मध्ये ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेने सुरू झालेला प्रवास, मराठी-हिंदी मालिका, रिॲलिटी शोज, चित्रपट, वेब सिरीज करत खूप पुढेपर्यंत आला आहे.

कोणताही ‘आऊटफिट’ रूपाली सुंदर ‘कॅरी’ करते. शिवाय रुपाली, साडी खूप सुंदर ‘ड्रेप’ करते आणि सोशल मीडियावर तिचे साड्यांमधील फोटो ‘ट्रेंडिंग’ आहेत. अभिनेत्री रेखा यांच्या साड्यांच्या प्रेमात असलेल्या रूपालीकडे स्वतःच्या संग्रहातही खूप सुंदर साड्या आहेत. पहिल्या पगारातून तिने तिच्या आईसाठी गर्द हिरव्या रंगाची एक सुंदर मऊसूत कॉटनची साडी घेतली होती. रूपाली दौऱ्यावर जाताना आजही ती साडी ऊबदार पांघरूण म्हणून घेऊन जात असते.

रूपालीला काळा रंग खूप आवडतो. ती म्हणते, ‘‘काळ्या कपड्यांमध्ये आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसतं आणि ते कणखरही वाटू लागतं!’’ दोन वर्षांपूर्वी संक्रांतीच्या आधी रूपालीला साक्षात्कार झाला, की आपल्याकडे संक्रांतीच्या दिवशी नेसण्यासाठी काळी साडीच नाहीये, म्हणून ती आणि तिची आई दुकानात गेल्या. आईने सिल्कची एक काळी साडी घेतली आणि रूपाली एका झुळझुळीत काळ्या सिफॉन साडीच्या प्रेमात पडली. त्या साडीवर कॉन्ट्रास्ट लाल रंगाच्या धाग्याने चिकनकारी वर्क केलेले होते. रूपालीने ताबडतोब ती साडी घेतली, संक्रांतीच्या दिवशी नेसली आणि त्या साडीवर घराच्या गच्चीवर जाऊन चक्क पतंग उडवला. त्या संक्रांतीला, तिळगूळ देण्याच्या कार्यक्रमातही तिने ती साडी खूप मिरवली आणि त्याच दिवशी तिला ‘बडी दूर से आये है’ या मालिकेच्या ऑडिशनसाठी फोन आला.

गंमत म्हणजे, तिने काही दिवसांपूर्वीच बुक केलेल्या कारच्या डिलिव्हरीची तारीख आणि ऑडिशनची तारीख एकच होती. मग रूपाली त्या दिवशी परत तीच ‘ब्लॅक साडी’ नेसून कारची डिलिव्हरी घ्यायला आई-बाबा आणि भावासोबत गेली आणि तिथूनच स्वतः कार चालवत ‘बडी दूर से आये है’च्या ऑडिशनसाठी गेली. ऑडिशन मस्त झाली आणि तिचं सिलेक्शनही झालं. रूपालीसाठी ती ब्लॅक साडी खूप ‘लकी’ ठरली. त्यानंतर महत्त्वाच्या कामांना रूपाली तीच साडी नेसत असते. शिवाय मालिकांमध्ये एका तरी एपिसोडमध्ये ती साडी नेसण्याचा ती आग्रह धरते.

‘पॉवरफुल ड्रेसिंग’ करणाऱ्या रूपालीसाठी ही ‘ब्लॅक साडी’ खूप खास आहे- कारण ती तिच्यासाठी लकी आहे. रूपालीचे दर्जेदार काम बघता, ही साडी पुढेही तिच्यासाठी कायमच ‘लक’ घेऊन येईल हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT