Hemant Dhome and Kshiti Jog
Hemant Dhome and Kshiti Jog Sakal
युथ्स-कॉर्नर

लग्नाची गोष्ट : ‘ऑफ स्क्रीन’ही सुपरहिट!

सकाळ वृत्तसेवा

खऱ्या आयुष्यात नवरा बायको असणाऱ्या कलाकारांच्या अनेक जोड्यांना ऑन स्क्रीनही तितकीच लोकप्रियता मिळाली आहे. अशीच एक हसतमुख जोडी म्हणजे हेमंत ढोमे आणि क्षिती जोग. हेमंतच्या आधी क्षितीनं मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या दोघांची भेट होण्याच्या आधीपासून हेमंत क्षितीचं काम बघत आला आहे. दहा वर्षांपूर्वी ‘सावधान शुभमंगल’ या नाटकात क्षिती आणि हेमंत या दोघांनी एकत्र काम केलं होतं. हे त्यांनी एकत्र केलेलं पहिलं काम. त्या नाटकाच्या वेळी त्यांचे सूर जुळले आणि आता त्यांच्या विवाहाला साडेआठ वर्षं झाली आहेत.

हेमंत म्हणाला, ‘‘क्षिती कोणत्याही गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारी मुलगी आहे. ती अत्यंत स्पष्टवक्ती आहे. जे काही आहे ते ती तिथल्या तिथं बोलून मोकळी होते. त्यामुळं एखाद्याच्या पाठीमागं बोलणं, एखादी गोष्ट मनात धरून ठेवणं हा तिच्या स्वभावाचाच भाग नाही. तिच्या स्वभावातला हा महत्त्वाचा गुण आहे. माझं या उलट आहे. मी योग्य वेळ आल्यावरच एखादी गोष्ट बोलून दाखवतो. सहकलाकार म्हणून ती खूप प्रोफेशनल आहे. कामाच्या बाबतीत भरपूर प्रामाणिक आहे, मेहनती आहे. ती वेळेच्या बाबतीत प्रचंड काटेकोर आहे. तिचं पाठांतर उत्तम आहे. एकदा स्क्रिप्ट वाचली, की ती लगेच पाठ होते. स्पष्टवक्तेपणा आणि तिच्या इतकं प्रोफेशनल असणं हे दोन्ही गुण मला तिच्याकडून घ्यायला आवडतील. ती अत्यंत समजून उमजून काम करणारी अभिनेत्री आहे. त्यामुळं तिच्याबरोबर काम करायलाही खूप मजा येते.’’

क्षितीनं हेमंतच्या स्वभावाविषयी सांगितलं, ‘‘हेमंत एक माणूस म्हणून, नवरा म्हणून, मित्र म्हणून खूप समजूतदार आहे. विशेष म्हणजे, त्याच्यात समोरच्याला माफ करण्याची ताकद आहे. समोरच्या व्यक्तीकडून काही चूक झाल्यास ‘जाऊदे’ असं हेमंतला म्हणता येतं. तो भरपूर शांत आहे. एखाद्या गोष्टीवर मी जितकी चिडते, तितका तो कधीच चिडत नाही. त्याच्याबरोबर इतकी वर्षं राहून त्यांचातला हे शांत स्वभाव बऱ्यापैकी माझ्यात उतरला आहे. तो प्रचंड स्वच्छताप्रिय आहे. तो खूप छान जेवण बनवतो आणि त्यानं केलेले सगळेच पदार्थ खास होतात. दुसरीकडं, सहकलाकार म्हणून तो फार छान आहे. त्याच्याबरोबर काम करायला नेहमीच मजा येते. तो खूप उत्स्फूर्तपणे काम करतो; त्यामुळे एक सहकलाकार म्हणून आम्हालाही दक्ष राहावं लागतं त्याच्यासोबत काम करताना.’’

हेमंत आणि क्षिती या दोघांनाही चित्रपट बघायला, वेगवेगळे पदार्थ बनवून खायला खूप आवडतं. या दोघांनीही एकमेकांची सगळीच कामं पहिली आहेत. त्यातल्या हेमंतने ‘नवा गडी नवं राज्य’ नाटकात साकारलेला हिंमतराव आणि ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटात साकारलेला समशेर या भूमिका क्षितीला विशेष आवडल्या. हेमंत खलनायकाची भूमिका उत्तम करतो आणि अशा आणखी भूमिका त्यानं केल्या पाहिजेत असंही क्षितीला वाटतं. क्षितीची ‘गृहलक्ष्मी’ या चित्रपटातील भूमिका आणि त्यांच्या आगामी ‘झिम्मा’ या चित्रपटात क्षितीनं साकारलेली भूमिका ही हेमंतला जास्त भावली आहे. ‘झिम्मा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झाला आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे हेमंत ढोमेनं. या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे क्षिती जोग ही या चित्रपटाची सहनिर्माती आहे. क्षिती याबद्दल बोलताना म्हणाली, ‘‘हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे. मला या चित्रपटाची स्क्रिप्ट फार आवडली आणि सुरुवातीला मी या चित्रपटात अभिनय करत होते. मी या चित्रपटासाठी सहनिर्माती व्हावं हे आमचं नंतर ठरलं. निर्माती म्हणून माझा हा पहिलाच चित्रपट आणि हा अनुभव खूप छान होता. हेमंतला प्रोडक्शनचंही चांगलं ज्ञान असल्यानं यात मला त्याचीही खूप मदत झाली.’’ यासोबत दिग्दर्शक म्हणून हेमंत कलाकारांचं कधीही कौतुक करत नाही किंवा कलाकारांचे फार लाड करत नाही. एखादा सिन त्याला आवडला की तो फक्त हसतो आणि लगेच पुढच्या सिनच्या तयारीला लागतो. पण त्यानं दिग्दर्शित केलेले चित्रपट इतके सुंदर होतात की त्याची ही बाजू आमच्याकडून पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते, असंही क्षितीनं सांगितलं. कामाच्या बाबतीतले आणि वैयक्तिक आयुष्यातले सगळेच निर्णय ते परस्पर सहमतीने घेतात, एकमेकांच्या कामाबाबत एकमेकांना स्पष्ट प्रतिक्रिया देतात. अशाप्रकारे एकमेकांना सपोर्ट करत ऑन स्क्रीनसारखेच ऑफ स्क्रीनही ही जोडी हीट ठरली आहे.

(शब्दांकन - राजसी वैद्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT