मिस्त्रींची टाटा इंडस्ट्रीजच्या संचालक पदावरुन हकालपट्टी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

टाटा सन्सने याआधीच शेअरधारकांना सायरस मिस्त्रींना हटवण्यासाठी त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. मिस्त्री टाटा समुहात कार्यरत राहिल्यास समूहात फुट पाडतील असे टाटा सन्सकडून शेअरधारकांना सांगण्यात आले होते

मुंबई: टाटा इंडस्ट्रीजच्या संचालक पदावरुन सायरस मिस्त्री यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. आज (सोमवार) टाटा इंडस्ट्रीजच्या झालेल्या शेअरधारकांच्या सर्वसाधारण बैठकीत (ईजीएम) मतदान करून मिस्त्रींना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

टाटा सन्सने याआधीच शेअरधारकांना सायरस मिस्त्रींना हटवण्यासाठी त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. मिस्त्री टाटा समुहात कार्यरत राहिल्यास समूहात फुट पाडतील असे टाटा सन्सकडून शेअरधारकांना सांगण्यात आले होते.

मिस्त्रींना संचालक मंडळावरून हटवण्यासाठी टाटा समूहातील आणखी सहा महत्त्वाच्या कंपन्या येत्या काही दिवसात भागधारकांची विशेष बैठक बोलवण्याची शक्यता आहे. मिस्त्री यांनी समूहाची दिशाभूल करून अध्यक्षपद मिळविले आणि नंतर आधी दिलेला शब्द न पाळता व्यवस्थापन रचना कमकुवत केली, असा आरोपही टाटा सन्सने केला आहे.

Web Title: Cyrus Mistry Removed As Director Of Tata Industries