"एटीएम'मधून पैसे काढण्यावरील निर्बंध हटविले...

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

चालु खाते व ओव्हरड्राफ्ट खात्यांमधून पैसे काढण्यावरील सर्व मर्यादा हटविण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. मात्र बचत खात्यांवरील निर्बंध सध्या "जैसे थे' अवस्थेतच राहणार आहेत

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) येत्या 1 फेब्रुवारीपासून "एटीएम'मधून पैसे काढण्याची मर्यादा हटविण्यात येणार असल्याची घोषणा आज (सोमवार) केली. मात्र देशातील विविध बॅंकांनी त्यांच्या क्षमतेनुसार एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा आणण्यास हरकत नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

चालु खाते व ओव्हरड्राफ्ट खात्यांमधून पैसे काढण्यावरील सर्व मर्यादा हटविण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. मात्र बचत खात्यांवरील निर्बंध सध्या "जैसे थे' अवस्थेतच राहणार आहेत.

याआधी, गेल्या 16 जानेवारी रोजी आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढविली होती. याचबरोबर, आठवड्यास एटीएममधून जास्तीत जास्त 24 हजार रुपये (बचत खाते) काढण्यासच परवानगी देण्यात आली होती. ही मर्यादा अशीच राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.तसेच चालु खात्यामधून पैसे काढण्याची मर्यादाही 50 हजार वरुन 1 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती.

आरबीआयच्या या नव्या घोषणेमुळे गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून चलन तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांशी संघर्ष करत असलेल्या सामान्य जनतेस मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

या धोरणानुसार, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एकूण चलनापैकी 78-88% रक्कम पुन्हा एकदा बाजारपेठांमध्ये वापरात येण्याचा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात मांडलेल्या एका अहवालानुसार, नोटाबंदीनंतर घसरलेली आर्थिक स्थिती येत्या दोन महिन्यांत पूर्वपदावर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: RBI lifts limit on cash withdrawal from ATMs from February 1