आयपीएलच्या कायदेशीर 'ड्रीम' सट्ट्याचा उत्साह शिगेला

प्रवीण कुलकर्णी
मंगळवार, 22 मे 2018

आपला आवडता संघ निवडणं हे क्रिकेटमधील दिग्गजांपासून तमाम क्रिकेट रसिंकांचा आवडता उद्योग. अगदी कर्टनी वॉल्श पासून ते सुनील गावसकरांपर्यंत सगळ्या जणांना आपली 'ड्रीम ११' खुणावत असते. खरंतर चांगला संघ निवडणं हे संघ व्यवस्थापन आणि 'सिलेक्टर'च महत्वाचं काम. त्यासाठी त्यांना भलामोठा पगार दिला जातो. पण क्रिकेट रसिक मात्र क्रिकेट वरील असलेल्या प्रेमापोटी एवेढे दिवस विना मोबदला हा उद्योग करत आले आहेत. पण याच रिकामटेकड्या उद्योगाचं रूपांतर पैसे मिळ्वण्यामध्ये झालं तर?

आपला आवडता संघ निवडणं हे क्रिकेटमधील दिग्गजांपासून तमाम क्रिकेट रसिंकांचा आवडता उद्योग. अगदी कर्टनी वॉल्श पासून ते सुनील गावसकरांपर्यंत सगळ्या जणांना आपली 'ड्रीम ११' खुणावत असते. खरंतर चांगला संघ निवडणं हे संघ व्यवस्थापन आणि 'सिलेक्टर'च महत्वाचं काम. त्यासाठी त्यांना भलामोठा पगार दिला जातो. पण क्रिकेट रसिक मात्र क्रिकेट वरील असलेल्या प्रेमापोटी एवेढे दिवस विना मोबदला हा उद्योग करत आले आहेत. पण याच रिकामटेकड्या उद्योगाचं रूपांतर पैसे मिळ्वण्यामध्ये झालं तर?

हे आता शक्य झालं आहे  'ड्रीम ११' नावाच्या फँटसी लीगच्या उदयामुळे. खरतरं ही लीग खूप वर्षांपासून कार्यरत आहे मात्र मागील वर्षांपासून तिचा जोमाने प्रचार आणि प्रसार व्हायला सुरुवात झाली. भारतातील फँटसी लीगची कल्पना हर्ष जैन आणि भवित शेठ यांची. फँटसी लीग म्हणजे एका प्रकारचा सट्टाच पण तो कायदेशीर ('लीगल बेटिंग'). लीगल बेटिंग म्हणण्याचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टानं एप्रिल २०१८ मध्ये राज्यघटनेच्या कलम १९ (g) नुसार याला दिलेली कायदेशीर परवानगी. प्रत्येक चांगल्या कामाला अडथळा करणारे काही हात असतात. येथेही ते होतेच. या फँटसी लीग विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका कर्त्याच म्हणणं होत की हा एक प्रकारचा सट्टा आहे. मात्र सुप्रीम कोर्टानं त्याला नकार दिला. 'गेम ऑफ स्किल्स विरुद्ध गेम ऑफ चान्स' या आधारावर या खटल्याकडे पाहिलं गेलं. कोर्टाच्या म्हणण्यानुसार यामध्ये सामना सुरु असताना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. किंवा स्पॉट फिक्सिंग प्रकरालाही थारा नाही. हा एक कौशल्य -आधारित खेळ (गेम ऑफ स्किल्स) आहे. यामध्ये मालक (प्रेक्षक) पैसे भरून संघ विकत घेतो. चांगला संघ निवडणं हे हा खेळ खेळणाऱ्याचं कौशल्य. निवडलेल्या संघातील खेळाडू चांगले खेळले तर त्या मालकाला 'पॉईंट्स' नुसार पैसे मिळणार. तब्बल ५० हजार रुपये तेही प्रत्येक सामन्यागणिक. हे शक्य आहे फक्त १३, १५,  ४० किंवा ५० रुपयांच्या नाममात्र 'एंट्री फी' मधे.  

एरव्ही घरातील तरुण मंडळी टीव्ही समोर बसून 'मॅच' बघण्यात वेळ वाया घालवतात असं म्हणणाऱ्या पालकांची संख्या कमी नव्हती. आता मात्र हेच पालक आपला मुलगा मॅच बघत कसा पैसे कमवतो, त्याचा अचूक अंदाज, क्रिकेटविषयी आवड, क्रिकेटचं ज्ञान वैगेरे विषयांवर बॊलताना दिसू लागले आहेत. IPL नावाच्या कोंबडीमुळे हे शक्य झालं आहे. ललित मोदी नावाच्या चतुर बनियाने ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी जन्माला घातली. या कोंबडीनं कितीतरी लोकांना श्रीमंत केलं. ICC, BCCI, सरकारी तिजोरी, स्थानिक ते आंतरराष्ट्रीय खेळाडू, बॉलिवूड स्टार्स, मार्केटिंग- ऍडव्हर्टायजिंग क्षेत्र, चिअर गर्ल्स, उद्योग विश्व आणि अनेक बेरोजगारांना रोजगार असे एक ना अनेक घटक IPL च्या झगमगाटात आणि पैशात न्हाऊन निघाले. प्रेक्षक हा एकमेव घटक या सगळ्यापासून लांब होता आता तोही यामध्ये सामील झाला आहे. 

आपल्या आवडीच्या खेळातून पैसे मिळत असतील तर तो खेळायला काहीच हरकत नाही. पण वरवर नाममात्र दिसणाऱ्या शुल्कातूनच हा खेळ खेळणाऱ्यांना पैसे कमावण्याचं व्यसन जडतंय. अर्थातच दुसऱ्या कुठल्याही व्यसनाधीशांप्रमाणे ते हे मान्य करत नाहीत. पैसे कमावण्याच्या नादात प्रत्येक सामन्यागणिक 'परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन' चा मेळ घालत एकेकजण १०-१२-१५-२० असे कितीही संघ विकत घेतात. आयपीएलचा हंगाम जसा संपत चाललाय तसा हा सट्टा खेळणाऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचलाय. प्रसंगी दिवसागणिक ५०० ते १००० रुपये घालवणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. हे झालं एकदम बेसिक. यातही 'ऍडव्हान्स' प्रकार आहेत. 'हेड टू हेड' सारख्या प्रकारामधे ५ ते १० हजारापर्यंत पैसे लावले जातात. येथेही पुन्हा जास्त पैसे कमावण्यासाठी जास्त संघ. मग चालू होतं नेहमीच चक्र. गमावलेलं माघारी मिळवण्याचं आणि कमावले असतील तर आणखी कमावण्याचं. त्यासाठी घालवला जाणारा वेळ हा आणखी एक वेगळाच विषय. 

सर्व काही कायदेशीर असल्यामुळे सरकारला उत्पन्नाचा हमखास स्रोत मिळाला आहे. बेकायदेशीर चालणाऱ्या सट्ट्याला कायदेशीर स्वरूप मिळावं असं २०१३ मधल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर नेमल्या गेलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश लोढा समितीने म्हटलं होतं. याला कारण होत ते म्हणजे भारतीय सट्टेबाज इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या देशातून जिथे असा सट्टा कायदेशीर आहे तिथून सट्टा लावत. अर्थातच याचा भारत सरकारला काहीच फायदा होत नव्हता. ते आता यामुळे साध्य झालं आहे. भारतात  खेळात उतरणाऱ्या स्टार्ट अप्स ची संख्याही जोमाने वाढतेय. परत क्रिकेट बरोबरच कब्बडी, फूटबाँल, अमेरिकेतल्या एनबीए लीग या सगळ्यामध्ये हा खेळ खेळता येणार असल्याने एक नवीन बारमाही उद्योग सुरु होणार आहे. पैसे कमावण्याचा. आयपीएलच्या नावाने कितीही शंख केला तरी या लीगची पाळेमुळं घट्ट रोवली गेली ती क्रिकेटचा निखळ आनंद लुटणाऱ्या प्रेक्षकांमुळे. आता हेच प्रेक्षक जर त्यांनी पैसे लावलेला संघ हरला म्हणून मनःस्ताप करून घेणार असतील तर खेळाचा आनंद लुटणार कोण हाच खरा प्रश्न आहे. 

Web Title: With $200 million on every ODI match, illegal betting thrives in India