शेअर बाजारात पाच आठवड्यात 40 लाख कोटींचे नुकसान

Share Market
Share Market

जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता. शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 रोजी बाजार बंद झाला त्यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत होते. मात्र, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात हळूहळू सुरु झालेल्या घसरणीने महिन्याच्या शेवटी वेग पकडत आज (शुक्रवार, 5 ऑक्टोबर) बाजार बंद झाला त्यावेळी (पाच आठवड्यात) तब्बल 4500 अंकांची घसरण झाली आहे. या काळात शेअर बाजारात तब्बल 40 लाख कोटींच्या बाजार भांडवलाचे नुकसान झाले आहे. 

31 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 38,896 च्या सर्वोच्च पातळीवर स्थिरावत बाजार भांडवल तब्बल 159 लाख कोटींच्या घरात पोचले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस सारख्या कंपन्यांनी 8 ट्रिलियन रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा पार केला होता. मात्र, त्यानंतर अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, इंधन दर आणि रुपयाची घसरण अशी कारणे समोर येत हळूहळू घसरणीला सुरुवात झाली. गैरव्यवहार आणि थकीत कर्जाचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या बँकिंग क्षेत्रात नवीन प्रकरणांची भर पडली. येस बँकेच्या राणा कपूर यांना सीईओ पदावर राहण्यास आरबीआयने मनाई केल्याने बँकेच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. आरबीआयच्या नियमांचे पालन केल्याचा ठपका ठेवत बंधन बँकेवर देखील निर्बंध आले. यातच अचानक डीएचएफएल कंपनीकडे रोखीच्या कमतरतेची बातमी धडकताच शेअर बाजाराने पाच मिनिटांच्या आत 1500 अंकांची घसरण अनुभवली होती. सुदैवाने ही बातमी 'अफवा' ठरल्याने मार्केट सावरले गेले. मात्र, आयएल अँड एफएस या बिगर बँकिंग वित्त समूहाने आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजदेखील थकवल्याचे समजताच पुन्हा एकदा मोठा भूकंप शेअर बाजारात घडून आला. 

शेअर बाजार हा 'फंडामेंटल' आणि 'टेक्निकल' विश्लेषणावर चालतो हा समज सुद्धा याच काळात खोडला गेला. 'इन्फिबीम अव्हेन्यू' नावाच्या माहिती तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीच्या संदर्भात एक चुकीचा व्हॉट्स अप संदेश पसरला गेला आणि 'व्हायरल सत्या'ची शहानिशा न होताच कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 70 टक्क्यांची घसरण देखील याच काळात पाहायला मिळाली. 

त्याबरोबरच, केरळ आणि काही प्रमाणात तामिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यात आलेल्या महापुराचा फटका वाहन उत्पादक क्षेत्रातील कंपन्यांना बसून वाहन विक्रीत मोठी घट झाली. त्याचा परिणाम म्हणून मारुती सुझुकी, महिंद्रा सारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या तेलाचा फटका विमान वाहतूक कंपन्यांना बसत आहे. जेट एअरवेज, इंडिगो एअरलाइन्स, स्पाईस जेट सारख्या कंपन्यांचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. 

सप्टेंबर महिन्यात सुरु झालेल्या घसरणीला ऑक्टोबर महिन्यात ब्रेक लागण्याऐवजी वेगात वाढच दिसून येत आहे. यात प्रामुख्याने इंधनाच्या दरात कपात कारण्यासंदर्भांतील निर्णय सरकारने गुरुवारी जाहीर केल्यानंतर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी 180 डिग्री 'टर्न अबाऊट' होत तब्बल 25 टक्क्यांची घसरण नोंदविली. एवढे सगळे होत असताना रुपयाच्या घसरणीला ब्रेक लावण्यासाठी आरबीआयच्या आज (शुक्रवार, 5 ऑक्टोबर) जाहीर होणाऱ्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून बसलेल्यांच्या हातात निराशा आल्याने, निमित्ताची वाटच पाहत असलेला शेअर बाजार आज पुन्हा 792 अंकांनी घसरला. आज शेअर बाजार 34,376 वर बंद झाला. 

गुरुवारी बाजार बंद झाला त्यावेळी बीएसईचे (मुंबई शेअर बाजार) बाजार भांडवल 126 लाख कोटींवर पोचले होते. त्यात आज साधारणतः 800 अंकांची घसरण झाल्याने अंदाजे घसरण पकडून 31 ऑगस्ट राजी 159 लाख कोटींचे बाजार भांडवल असलेला शेअर बाजार 120 लाख कोटींच्या जवळपास पॊचलेला असेल. 

विशेष म्हणजे, 31 ऑगस्ट रोजी शुक्रवार असताना सर्वोच्च पातळी नोंदविलेल्या शेअर बाजाराने त्यानंतर मात्र सातत्याने 'ब्लॅक फ्रायडे' अनुभवले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com