
Mumbai News : कोटक महिंद्र बँकेकडून सोनाटा फायनान्सचे अधिग्रहण
मुंबई : खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेतर्फे, मायक्रो फायनान्सिंग क्षेत्रातील बिगरबँक वित्तसंस्था सोनाटा फायनान्स प्रा. लि. चे अधिग्रहण केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानुसार एका कराराद्वारे सोनाटा फायनान्सचे सर्व भागभांडवल कोटक तर्फे खरेदी केले जाईल. या व्यवहाराचे मूल्य ५३७ कोटी रुपये आहे. रिझर्व बँक व अन्य नियामकांच्या मान्यतेनंतर हा व्यवहार प्रत्यक्ष अस्तित्वात येईल.
सोनाटा फायनान्स तर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना व्यापारी तत्वावर कर्जे दिली जातात. ती यंत्रणा आता कोटक बँकेला मिळेल. सोनाटा फायनान्सच्या ताब्यात सध्या एकोणीसशे कोटी रुपयांची मालमत्ता असून पाचहजार दोन शाखांतर्फे ते नऊ लाख ग्राहकांची सेवा करतात. उत्तर भारतातील दहा राज्यांमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र आहे.
या अधिग्रहणामुळे कोटक बँकेला ग्रामीण व निमशहरी भागात आपले कार्यक्षेत्र विस्तारता येईल. मायक्रो फायनान्सिंग क्षेत्रात सोनाटा फायनान्स दोन दशके काम करीत आहे. त्यांना या क्षेत्रातील ग्राहकांची चांगली जाण आहे. या अधिग्रहणामुळे आम्ही या घटकातील ग्राहकांची अधिक चांगली सेवा करू शकू असे कोटक महिंद्राच्या कमर्शियल बँकिंग विभागाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी सांगितले.