सोन्याबरोबर चांदीचीही 'चांदी' कशामुळे?

आदित्य मोडक
Monday, 9 September 2019

सोन्याने सहा वर्षांची उच्चांकी पातळी गाठली आहे, पण दुसरीकडे चांदीने मात्र तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. म्हणजेच चांदी वाढण्याची व्यावहारिक शक्‍यता जास्त अाहे, असे वाटते. यानिमित्ताने सोन्याबरोबर चांदीदेखील भाव का खात आहे, याचा ऊहापोह.

सोन्याप्रमाणेच मौल्यवान असलेल्या चांदीने प्रतिकिलो ५१ हजार रुपयांच्या भावपातळीला नुकताच स्पर्श केला. गेल्या एका महिन्यात चांदीत सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ नोंदली गेली. चांदी-सोन्याच्या भावातील गुणोत्तर कमी होत चालले आहे. सोन्याने सहा वर्षांची उच्चांकी पातळी गाठली आहे, पण दुसरीकडे चांदीने मात्र तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. म्हणजेच चांदी वाढण्याची व्यावहारिक शक्‍यता जास्त अाहे, असे वाटते. यानिमित्ताने सोन्याबरोबर चांदीदेखील भाव का खात आहे, याचा ऊहापोह.

काही दिवसांपूर्वीच सोन्याच्या वाढत्या भावावर ऊहापोह करणारा लेख ‘सकाळ’मध्ये वाचनात आला होता. त्या लेखाच्या शेवटी ‘चांदीवरही लक्ष असू द्या,’ असे म्हटले होते. त्या वेळेस चांदी प्रतिकिलोस सुमारे ४२ हजार रुपयांच्या आसपास होती, जी नुकतीच म्हणजे चार सप्टेंबर रोजी जवळपास ५१ हजार रुपयांच्या भावपातळीला स्पर्श करून आली. म्हणजे मागील एका महिन्यात तिच्यात सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ नोंदली गेली. सोन्याच्या बरोबरीने चांदीचीही अशी ‘चांदी’ कशामुळे झाली, हे पाहणे यानिमित्ताने औत्सुक्‍याचे आहे.

चांदीचे प्रमाण वाढणार
चांदी हा सोन्यापाठोपाठचा सुरक्षित गुंतवणूक पर्याय समजला जातो. परदेशात चांदीचे एक्‍स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) उपलब्ध आहेत. त्यामधील सिंगापूर व अमेरिकी बाजारात व्यवहार होणारे ‘शेअर सिल्व्हर ट्रस्ट’ व ‘ग्लोबल सिल्व्हर ईटीएफ’ हे दोन चांगल्यापैकी तरलता असणारे ‘ईटीएफ’ आहेत. साधारणतः २०१० मध्ये हे दोन्हीही ‘ईटीएफ’ अस्तित्वात आले, ज्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) आजमितीस सुमारे तिप्पट म्हणजेच वार्षिक २२ टक्के दराने वाढले आहे. ‘ईटीएफ’ सुरू झाल्यावर उच्चांकी गुंतवणूक ३८९ दशलक्ष औंस होती, जी २०१८ अखेरीस ३३३ दशलक्ष औंस एवढी होती. म्हणजेच आर्थिक अस्थैर्य पाहता, ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूकरूपी चांदीचे वजनरूपी प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे.

चांदी-सोन्यातील गुणोत्तर
चांदी व सोन्यातील गुणोत्तर हे त्यांच्या भावात होणाऱ्या सततच्या बदलामुळे बदलत राहते. २०११ मध्ये ज्या वेळेस आपण सोन्याच्या भावात अचानक तेजी पाहिली, त्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव सुमारे ५० डॉलर प्रति औंसपर्यंत पोचला होता. तेव्हा सोन्याचा भाव हा सुमारे १६०० डॉलर प्रति औंस इतका होता. यातील गुणोत्तर पाहता, गेल्या ५० वर्षांतील चांदीच्या उच्चांकी भावात सोने हे चांदीच्या ३२ पट होते. नुकतीच चांदीत १४ डॉलर प्रति औंसच्या आसपास घसरण झाली होती आणि त्या वेळी सोने १३०० डॉलर प्रति औंस होते. तेव्हा सोने हे चांदीच्या ९० पटीपेक्षा अधिक भावात ‘ट्रेड’ होत होते. गेल्या एका महिन्यातील हे गुणोत्तर पाहिल्यास सोने हे चांदीच्या ९३ पट ‘ट्रेड’ होत होते आणि आता आलेल्या चांदीतील तेजीनंतर हेच गुणोत्तर ८१ पटीपर्यंत खाली आले आहे. 

चांदी कुठपर्यंत जाणार?
आपण चांदी व सोन्याचे २०११ मधील ३० गुणोत्तर गृहित धरले व सध्याच्या सोन्याचा १५३० डॉलर प्रति औंसाचा भाव पाहिला तर आपल्याला लक्षात येईल, की चांदी पुन्हा ५० डॉलरकडे सहज झेपावू शकते. तसेच याच शक्‍यतेला आपण ५० टक्‍क्‍यांपर्यंत कमी गृहित धरले व चांदीचा भाव २५ डॉलर प्रति औंसपर्यंत वाढू शकतो, अशी शक्‍यता वर्तविली तर सद्यःस्थितीतील चांदीच्या भावापेक्षा जवळपास ३५ टक्के भाववाढ दिसू शकेल. आपल्या भारतीय रुपयात बोलायचे झाले, तर चांदी ६५ हजार रुपये प्रति किलो या भावापर्यंत पोहोचू शकते व सध्याचे ४० हजार रुपये या सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम भावात त्याचे गुणोत्तर ६६ असे असू शकते.

‘फिअर ट्रेड’चा परिणाम
‘फिअर ट्रेड’ म्हणजेच जेव्हा गुंतवणुकीसाठी कोणताच सुरक्षित पर्याय उरत नाही, तेव्हा गुंतवणुकीसाठी निवडलेला मार्ग होय. गुंतवणुकीच्या बाबतीत विचार केला तर, आपण एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवण्यास तयार नसतो. ‘फिअर ट्रेड’च्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात ‘हेज फंड’ हेसुद्धा एकाच (सोन्याच्या) टोपलीत सर्व गुंतवणूक ठेवण्यापेक्षा दुसऱ्या टोपलीत (चांदी) गुंतवणूक ठेवण्यास उत्सुक असतात आणि नेमके तेच सध्या घडत आहे. सध्या सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मागील सहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहे, तर चांदीचा भाव हा मागील तीन वर्षांच्या उंचीवर आहे. मागील सहा वर्षांतील चांदीचा उच्चांकी भाव पाहिला, तर आपल्या लक्षात येईल, की चांदी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सहा वर्षांपूर्वी सुमारे २३ डॉलर प्रति औंस होती. म्हणजेच सोन्याच्या बरोबरीत चांदीचा भाव येणे अपेक्षित असेल, तर ते २३ डॉलर प्रति औंस म्हणजेच भारतीय रुपयाच्या मूल्यात जवळपास ६२ हजार रुपये प्रति किलो असू शकतील. वरील सर्व गोष्टींचा ऊहापोह एकच गोष्ट दाखवून देत आहे आणि ती म्हणजे चांदी-सोन्याच्या भावातील गुणोत्तर कमी होत चालले आहे. सोन्याने सहा वर्षांची उच्चांकी पातळी गाठली आहे, पण दुसरीकडे चांदीने मात्र तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. म्हणजेच चांदी वाढण्याची व्यावहारिक शक्‍यता जास्त असू शकते.

चांदीचा औद्योगिक वापर
चांदीचा उपयोग औद्योगिक वापरासाठी होत असतो. मात्र, औद्योगिक मंदी आल्यास औद्योगिक धातूची मागणी कमी झाल्याने निर्मिती कमी होते. त्याचा परिणाम चांदीचे उत्पादन घटण्यावर होतो. कारण चांदी ही मुख्यत्वे औद्योगिक धातूंच्या शुद्धीकरण प्रक्रियेत दिसते व त्याचे प्रमाण एकूण उपलब्ध होणाऱ्या चांदीपैकी सुमारे ७० टक्‍क्‍यांपर्यंत असते. (तांबे, जस्त व सोने हे शुद्ध करतानाच्या प्रक्रियेत चांदी हे ‘बाय प्रॉडक्‍ट’ असते.) चांदीची जागतिक मागणी ही साधारणपणे १००० दशलक्ष औंस एवढी आहे. त्यापैकी सुमारे १८० दशलक्ष औंस एवढी गुंतवणूक मागणी २०१८ मध्ये होती, तर २१२ दशलक्ष औंस एवढी मागणी २०११ मध्ये होती. (त्या वेळेस चांदीचा भाव ५० वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचला होता.) आता आर्थिक अस्थैर्यामुळे सोन्याबरोबरच चांदीच्या गुंतवणूकरूपी मागणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. ही मागणी २०१८ च्या मानाने ३० दशलक्ष औंसाने जास्त असेल. गुंतवणूकरूपी मागणीतील वाढ ही पुरवठ्यावर विपरित परिणाम करते आणि त्याचा परिणाम भाव वाढण्यावर आजपर्यंत दिसून आला आहे. सध्याही त्याचीच प्रचिती येत आहे आणि त्याचमुळे सोन्याबरोबर चांदीचीही ‘चांदी’ होत आहे.

सोने आयातीत मोठी घट
देशांतर्गत पातळीवर भावात झालेली मोठी वाढ आणि सरकारने वाढविलेले आयात शुल्क, यामुळे ऑगस्ट २०१९ मध्ये सोन्याच्या आयातीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. मागील तीन वर्षांचा विचार करता ऑगस्ट महिन्यात झालेली आयात नीचांकी पातळीवर आहे. सोने आयातीत झालेल्या घटीचा फायदा म्हणून भारताला १.३७ अब्ज डॉलरची गंगाजळी वाचविण्यात यश आले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात १११.४७ टन सोन्याची आयात केली गेली होती. या वर्षी ती फक्त ३० टन इतकीच होती. सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या ८१.७१ टनांच्या तुलनेत या वर्षी ३५ टनांपेक्षा कमी असू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. सरकारने सोन्यावरील आयातीत २.५ टक्‍क्‍यांनी वाढ केल्याने आयात शुल्क १२.५ टक्‍क्‍यांवर पोचले आहे. परिणामी, सोने तस्करीचे प्रमाणदेखील वाढले आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ११९७.७ किलो तस्करीचे सोने जप्त केले, जे मागील वर्षीच्या तुलनेत २३ टक्के अधिक आहे.

(लेखक ‘सीए’ असून, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे ‘सीएफओ’ आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार वरील अंदाज व्यक्त केले आहेत. वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय आपापल्या सल्लागारांच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Modak article