esakal | देशातील इलेक्ट्रिक मोटारींची पहिली रॅली; आदित्य ठाकरेंच्या हस्ते हिरवा झेंडा | Aditya Thackeray
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Electricity

देशातील इलेक्ट्रिक मोटारींची पहिली रॅली; आदित्य ठाकरेंच्या हस्ते हिरवा झेंडा

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : हरित उर्जेवरील (Green energy) वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे (Adani electricity) विजेवर चालणाऱ्या मोटारींची पहिली वहिली रॅली (motor rally) शनिवारी (2 ऑक्टोबर) मुंबईत होणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली जाईल.

हेही वाचा: Sakal Impact : महात्मा गांधी जयंती दिनी ठेवलेली प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली

देशातील बाजारात विकल्या जाणाऱ्या विजेवरच्या मोटारींची सर्व मॉडेल यावेळी पाहण्यास मिळतील. अदाणी इलेक्ट्रिसिटी व ऑटोकार इंडिया यांच्यातर्फे पर्यावरण जागृतीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या रॅलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि भिन्नभिन्न कंपन्यांच्या तीस मोटारी सहभागी होणार असून त्यांचे मालक किंवा त्या मोटारी निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी त्या चालवतील. महालक्ष्मी रेसकोर्स पासून सुरु होणारी ही रॅली पश्चिम उपनगरांमधील आरे कॉलनी, पवई मार्गे पूर्व उपनगरांतील तिवरांच्या जंगल पट्ट्यातून, शहराच्या मिठागर भागातून 110 किलोमीटरचे अंतर कापेल, अशी माहिती अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईचे सीईओ कंदर्प पटेल यांनी दिली.

राज्य सरकारने सन 2025 पर्यंत दहा टक्के वाहने विजेवर चालविण्याचे ध्येय ठेवले असून त्याला पाठबळ देण्यासाठी ही रॅली होईल. हवेत जाणाऱ्या कर्बवायूपैकी तीस टक्के कार्बन डायऑक्साईड हा वाहनांच्या इंधनाच्या धुरातून जातो. अदाणी इलेक्ट्रिसिटी ही मुंबईतील सर्वात मोठी उर्जानिर्मिती कंपनी असल्याने वायूप्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ इंधनावर भर देणे हे कंपनीचे उद्दीष्ठ आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या ताफ्यातही 15 इलेक्ट्रिक गाड्या आहेत, तसेच यापुढे विजेवर चालणाऱ्या गाड्याच वापरण्याचा कंपनीचा निर्धार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक तापमानवाढीस कार्बन डायऑक्साईड कारणीभूत आहे. हे टाळण्यासाठी आज जगभरात सर्वत्र विजेवर चालणाऱ्या गाड्या लोकप्रीय होत आहेत. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करून पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी हरित मुंबई 2021 ही मोहीम आम्ही हाती घेतली आहे. त्यानुसार ही रॅली होत आहे, असे ऑटोकार चे प्रकाशक व संपादक होर्मजाद सोराबजी म्हणाले.

loading image
go to top