
कवच आणि रक्षक या दोन्हींमध्ये ‘क्लेम’साठी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा पुरावा लागतो. ‘कवच’ आपल्या पूर्ण कुटुंबासाठी घेता येते, मात्र ‘रक्षक’ ही प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र घ्यावी लागते.
विनायक - घरी बसून जाम कंटाळा आलाय. आता कधी एकदा ‘ऑफिस’मध्ये जाऊन काम करतोय, असं झालंय.
रवी - ‘ऑफिस’ पुन्हा चालू होणार, हे चांगलंच आहे... पण ‘अनलॉक’ची तयारी नीट केलीयस का?
विनायक - हो तर, पूर्ण तयारी झालीय... ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, ‘ग्लोव्हज’... एकदम सज्ज!
रवी - अरे व्वा... व्हेरी गुड! पण ही तयारी तर फक्त कोरोना होऊ नये म्हणून...
विनायक - म्हणजे...? अजून कसली तयारी पाहिजे?
रवी - अरे, सगळी काळजी घेऊनदेखील जर कोरोना झालाच तर काय? आपल्या शरीराबरोबरच, कोरोनापासून आपल्या पैशाचे देखील संरक्षण केले पाहिजे.
विनायक - खरंच की! हा विचार तर मी केलाच नाही. या आजारावर अजून तरी कुठलंही औषध नसलं तरी हॉस्पिटलच्या बिलाची रक्कम ऐकून धक्काच बसतो! यासाठी नक्की काय करायला हवं?
रवी - नुसता विचार नाही, तर प्रत्यक्ष कृती म्हणजेच ‘कोरोना कवच’ आणि ‘कोरोना रक्षक’ या विमा पॉलिसी घेण्याची गरज आहे.
विनायक - ‘कोरोना कवच’ आणि ‘कोरोना रक्षक’? काय आहेत या ‘पॉलिसी’ आणि या दोन्हींमध्ये काय फरक आहे?
'वर्क फ्रॉम होम' करत असाल तर जास्तीचा कर देण्याची तयारी ठेवा
रवी - अरे, ‘कोरोना कवच’ ही कुठल्याही ‘हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम’सारखी ‘इंडेम्निटी’ पॉलिसी आहे, म्हणजेच ही पॉलिसी कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देते.
विनायक - म्हणजे हॉस्पिटलचं बिल?
रवी - हो, बरोबर... तर ‘कोरोना रक्षक’ ही ‘बेनिफिट’ पॉलिसी आहे. म्हणजे जर पॉलिसीहोल्डरला कोरोना झाला तर इन्शुरन्स कंपनी त्याला ठराविक रक्कम देते.
विनायक - पण मग दोन्हीपैकी कुठली पॉलिसी घेतली पाहिजे?
रवी - कवच आणि रक्षक या दोन्हींमध्ये ‘क्लेम’साठी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा पुरावा लागतो. ‘कवच’ आपल्या पूर्ण कुटुंबासाठी घेता येते, मात्र ‘रक्षक’ ही प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र घ्यावी लागते. शिवाय ‘रक्षक’ ही १८ वर्षांपुढेच घेता येते. ‘कवच’मध्ये हॉस्पिटलच्या बिलानुसारच ‘क्लेम’चे पैसे मिळतात, तर ‘रक्षक’मध्ये ठराविक रक्कम दिली जाते. (खर्च झाला असो किंवा नसो !) आणि मुख्य म्हणजे दोन्हींसाठी १५ दिवसांचा ‘वेटिंग पिरियड’ आहे... म्हणजेच पॉलिसी घेतल्यापासून १५ दिवस तरी कोरोना होऊ नये!
विनायक - ओके... आणि नेहमीच्या ‘हेल्थ इन्शुरन्स किंवा ‘मेडिक्लेम’चे काय?
रवी - ‘कोरोना कवच’ किंवा ‘कोरोना रक्षक’ या पॉलिसी ‘कोरोना’पुरत्याच मर्यादित आहेत. आपल्याला फक्त एखादा विशिष्ठ आजारच होईल, असं काही सांगता येत नाही. ‘हेल्थ इन्शुरन्स’ किंवा ‘मेडिक्लेम’ ही पॉलिसी ‘कॉन्प्रिहेन्सिव्ह’ असल्यामुळे श्रेष्ठ ठरते.
विनायक - हो ना... कुणाला कुठला आजार केव्हा होईल, हे काहीच सांगता येत नाही...
'शिक्षण उपकर' होणार उत्पन्नातून वजा !
रवी - ज्यांच्याकडे ‘हेल्थ इन्शुरन्स’ आहे, पण ज्यांच्या आरोग्याला थोडा धोका अधिक आहे, अशा लोकांसाठी ‘कोरोना रक्षक’ हा उत्तम पर्याय आहे. शिवाय हॉस्पिटलच्या खर्चाव्यतिरिक्त आजारपणात अनेक गोष्टींसाठी पैसे लागतात. त्यासाठी ‘कोरोना रक्षक’ ही पॉलिसी उपयोगी ठरते.
विनायक - खरंय तुझं म्हणणं...
रवी - सध्या कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे, दुसरी कुठलीही हेल्थ पॉलिसी नसेल तर निदान ‘कोरोना कवच’ ही पॉलिसी तरी नक्कीच घ्यायला हवी.
विनायक - हो रे... सध्या ‘हेल्थ’ म्हणजेच ‘वेल्थ’ आहे. आता आमच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनासुद्धा सांगतो... ‘कोरोना’पासून कसे करायला हवे आपल्या आरोग्याचे आणि पैशाचे संरक्षण ते!
रवी - ओके, गुड... काळजी घे...
विनायक - नक्की... तू पण काळजी घे... लवकरच भेटू!
(लेखक विमा व गुंतवणूक सल्लागार आहेत.)