सार्वभौम सुवर्ण रोखे आता डिसेंबरअखेर दर आठवड्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

केंद्र सरकारच्या वतीने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या तिसऱ्या सीरिजमधील पुढील टप्पा विक्रीस खुला करण्याचा निर्णय घेतला असून, या सुवर्ण रोख्यांच्या अर्जाची विक्री ९ ऑक्‍टोबर रोजी सुरू झाली असून, ११ ऑक्‍टोबरला बंद होत आहे. त्यानंतर डिसेंबरपर्यंत प्रत्येक आठवड्यासाठी नवा टप्पा सुरू होणार असून, विक्री प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी सुरू होऊन बुधवारी संपेल, हे या वेळच्या सुवर्ण रोख्यांचे वेगळेपण आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या तिसऱ्या सीरिजमधील पुढील टप्पा विक्रीस खुला करण्याचा निर्णय घेतला असून, या सुवर्ण रोख्यांच्या अर्जाची विक्री ९ ऑक्‍टोबर रोजी सुरू झाली असून, ११ ऑक्‍टोबरला बंद होत आहे. त्यानंतर डिसेंबरपर्यंत प्रत्येक आठवड्यासाठी नवा टप्पा सुरू होणार असून, विक्री प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी सुरू होऊन बुधवारी संपेल, हे या वेळच्या सुवर्ण रोख्यांचे वेगळेपण आहे. 

केंद्र सरकारची हमी असणारे हे सुवर्ण रोखे पूर्वीप्रमाणेच वजनावर आधारित राहणार असून, किमान एक ग्रॅम, व्यक्ती व हिंदू कुटुंब अविभक्त पद्धतीसाठी कमाल चार हजार ग्रॅम; तर ट्रस्ट व तत्सम संस्थांसाठी वीस हजार ग्रॅम वजनाचे सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षात मिळतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यंदाच्या या टप्प्यातील जे लोक ऑनलाइन वर्गणीदार बनतील आणि ‘डिजिटल मोड’मध्ये रक्कम अदा करतील, त्यांच्यासाठी रोख्याच्या खरेदीवर सोन्याच्या प्रतिग्रॅम बाजारमूल्यावर ५० रुपयांची सवलत घोषित केली गेली आहे. सुवर्ण रोख्यांच्या प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत सोन्याचे बाजारमूल्य रु. ३००६ असताना रु. २९५६ इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेत, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नामनिर्देशित केलेल्या काही टपाल कार्यालयांत या सुवर्ण रोखे खरेदीचे अर्ज मिळू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बॅंकेने विक्रीस काढण्यात आलेल्या सुवर्ण रोख्यांचा आढावा घेतला व जमा झालेल्या ५४०० कोटी रुपयांचा विचार केला, तर ही योजना हळूहळू यशस्वी होत आहे, हे निश्‍चित!

सार्वभौम सुवर्ण रोख्यांची वैशिष्ट्ये
१) अनुत्पादक गुंतवणूक : सोन्याच्या धातूतील गुंतवणूक अनुत्पादक मानली जाते. याउलट अशा गुंतवणुकीचे पैसे उत्पादक कारणासाठी वापरले गेले तर अर्थव्यवस्थेची व परिणामी देशाची प्रगती होऊ शकते. याला पर्याय म्हणून या रोख्यांची विक्री केली जात असून, भौतिक सोने घेण्याऐवजी कागदोपत्री सोने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यात स्वतःचे व देशाचे हित साधले जाणार असल्याने सर्वांच्या फायद्याचे ठरावे. गेल्या वर्षात या योजनेमुळे सोन्याच्या आयातीत दहा टक्के घट झाली आहे, हे या योजनेचे यश मानायला हवे.

२) व्याजाची सुविधा - आपण जेव्हा सोने विकत घेतो, तेव्हा कालपरत्वे त्याचे फक्त भांडवली मूल्य कमी किंवा जास्त होते. त्यावर व्याज मिळत नाही. या योजनेत केंद्र सरकारने दरवर्षी २.५० टक्के दराने व्याज देण्याची तरतूद केली आहे. या रोख्यांवर मिळणारे व्याज हे जरी प्राप्तिकर कायद्यांतर्गत करपात्र असले तरी दर सहा महिन्यांनंतर ते मिळणार असल्याने या गुंतवणुकीतील नियमित उत्पन्नाची रुची कायम राहू शकते.

३) भांडवली नफ्यातून मुक्ती - प्राप्तिकर कायद्यानुसार विक्री केलेल्या सुवर्ण रोख्यांचा भांडवली नफा मुदतपूर्तीपश्‍चात करमुक्त करण्यात आला आहे. हा महत्त्वाचा फायदा ठरावा. जरी रोख्यांची मुदत आठ वर्षे असली तरी योग्य बाजारमूल्याचा फायदा घेण्यासाठी रोखीकरण करण्याचा पर्याय पाचव्या, सहाव्या, सातव्या वर्षानंतर उपलब्ध आहे. या रोख्यांची शेअर बाजारात नोंदणी होणार असल्याने लोकांना आवश्‍यकतेनुसार मुदतपूर्व रोखीकरण करणे शक्‍य होऊ शकेल.

४) कर्जासाठी तारण - गरज भासेल त्या वेळी हे सुवर्ण रोखे घेतलेल्या कर्जासाठी तारण म्हणून ठेवता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तात्पुरत्या आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी अशा रोख्यांचा मोठा उपयोग होऊ शकतो. हाही महत्त्वाचा फायदा ठरावा.

५) भांडवल घट - भविष्यात सध्यापेक्षा सोन्याच्या किमती कमी झाल्या तर त्या योजनेत थोडासा तोटा संभवतो. तथापि, मुद्दलावर व्याज मिळत असल्याने या भांडवलघटीचा भार कमी होऊ शकेल.

Web Title: arthavishwa news