बॅंकांचा डोलारा कर्जांच्या गर्तेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

२.५ लाख कोटींच्या थकीत कर्जांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता

मुंबई - देशातील मंदावलेल्या बॅंकिंग क्षेत्रास कारणीभूत असलेल्या थकीत कर्जाचा (एनपीए) गंभीर प्रश्‍न सोडविण्याच्या प्रक्रियेत बॅंकांना तब्बल २.४० लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल, असे ‘क्रिसिल’ या प्रख्यात पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.

देशातील अनेक कंपन्यांनी बॅंकांचे कर्ज थकविलेले आहे. थकीत कर्जाच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेक बॅंका अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले बॅंकिंग क्षेत्र मंदीच्या छायेत आहे. कर्ज थकविलेल्या आणि दिवाळखोरीचा सामना करणाऱ्या प्रमुख ५० कंपन्यांकडील थकबाकी वसुलीच्या प्रक्रियेत बॅंकांना आपली ६० टक्के रक्कम किंवा सुमारे २.४० लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागेल, असे ‘क्रिसिल’च्या विश्‍लेषणात नमूद करण्यात आले आहे. या कंपन्यांकडील थकीत कर्जाची रक्कम सुमारे चार लाख कोटी रुपये आहे.

सर्वाधिक कर्ज थकविलेल्या या कंपन्यांमध्ये बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा हा एकूण थकीत कर्जाच्या एक चतुर्थांश इतका आहे. धातू क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक म्हणजे ३० टक्के आहे; तर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा १५ टक्के आहे. उरलेला हिस्सा अन्य क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये विभागला गेलेला आहे.
एकूण थकीत कर्जांच्या सुमारे ४० टक्‍क्‍यांचीच तरतूद बॅंकांनी केलेली आहे, असा अंदाज पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे. याचा अर्थ बॅंकांना ६० टक्के रक्कम ‘राईट ऑफ’ करावी लागेल, म्हणजेच तेवढा तोटा किंवा फटका सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

Web Title: arthavishwa news The banks are in debt