‘त्या’ सरकारी बॅंकांमधील लॉकर, डी-मॅट खात्यांचे काय?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मागील काही महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील काही बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेकडून ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’ची (पीसीए) कार्यवाही सुरू झाली आहे. या सर्व बॅंकांत सर्वसामान्य नागरिकांची विविध ठेव खाती तर आहेतच; त्यासोबत बऱ्याच जणांची लॉकर व डी-मॅट खातीदेखील आहेत. मध्यंतरीच्या एका लेखात अशा बॅंकांतील ठेवी सुरक्षित असल्याबाबतचे आपल्या वाचनात आले असेलच. तरीसुद्धा लॉकर व डी-मॅट खात्यांबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम असल्याचे दिसून येते. याबाबत नेमकी काय स्थिती आहे व राहील, हे आपण जाणून घेऊया.

प्रश्‍न - ‘पीसीए’ची कार्यवाही सुरू झालेल्या बॅंकांतील लॉकर व त्यातील चीजवस्तू सुरक्षित असतील का व ही सुविधा चालू राहील का?
उत्तर - वरील सरकारी बॅंकांची आर्थिक परिस्थिती ही थकीत कर्जांमुळे (एनपीए) काहीशी बिघडलेली आहे व ही परिस्थिती यापुढे आणखी न बिघडता त्यात सुधारणा व्हावी व त्यांची आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर समाधानकारक व्हावी, या उद्देशाने रिझर्व्ह बॅंकेमार्फत ‘पीसीए’ची कार्यवाही सुरू झाली आहे. या कार्यवाहीमुळे संबंधित बॅंकेवर काही निर्बंध आले आहेत व त्यानुसार आता या बॅंकांना पुढील काळात शाखाविस्तार करता येणार नाही, जास्त जोखीम असलेले कर्जव्यवहार करता येणार नाहीत. हे निर्बंध संबंधित बॅंकांची आर्थिक परिस्थिती समाधानकारक होईपर्यंत असू शकतील. मात्र, नेहमीच्या बॅंकिंग सेवा व सुविधा देण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. यामुळे लॉकर सुविधा पूर्वीप्रमाणेच चालू राहील व पूर्वीसारखीच सुरक्षित असेल. समजा, यातील एखाद्या बॅंकेचे अन्य बॅंकेत विलीनीकरण झाले, तरी नव्या बॅंकेकडून ही सुविधा विनाअडथळा सुरू राहील. मात्र, अशा वेळी ग्राहकाला नव्या बॅंकेशी नव्याने ‘लॉकर ॲग्रिमेंट’ करावे लागेल. काही कारणाने विलीनीकरणाच्या प्रक्रियेत बॅंकेचे कामकाज काही दिवस बंद राहिले, तरी लॉकर व्यवहार चालू राहतील. (उदा. : युनायटेड वेस्टर्न बॅंक जेव्हा आयडीबीआय बॅंकेत विलीन झाली, त्या वेळी या बॅंकेचे व्यवहार काही दिवस बंद होते. मात्र, लॉकर व्यवहार करता येत होते.)

प्रश्‍न - वरील बॅंकांतील डी-मॅट खाते चालू राहील का व त्यावर व्यवहार करता येतील का?
उत्तर - डी-मॅट खाते हे ‘एनएसडीएल’ किंवा ‘सीडीएसएल’ या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे (डीपी) उघडलेले असते, बॅंकेकडे नाही. बॅंका फक्त सेवा पुरवठादार म्हणून ही सुविधा आपल्याला देऊ करतात. म्हणून रिझर्व्ह बॅंकेच्या ‘पीसीए’ कार्यवाहीचा डी-मॅट खाते व त्यातील व्यवहार करण्यावर काहीही परिणाम होणार नाही. जर एखाद्या बॅंकेचे विलीनीकरण झाले व बॅंकेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद राहिले, तरी डी-मॅट खाते व त्यावर व्यवहार करण्यावर परिणाम होणार नाही.

तरी, या बॅंकांच्या ग्राहकांनी घाबरून अथवा गोंधळून जाऊ नये. ही एक सुधारणेची प्रक्रिया असून, बॅंकेस आवश्‍यक ते सहकार्य करावे, जेणेकरून आपली बॅंक आर्थिकदृष्ट्या लवकरात लवकर सक्षम होऊ शकेल.

Web Title: arthavishwa news government bank locker, d-mat account