भारतात गुंतवणुकीसाठी आग्रह!

भारतात गुंतवणुकीसाठी आग्रह!

दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये या फोरमच्या सह- अध्यक्षा म्हणून माणदेशी बॅंकेच्या व माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. फोरममधील विविध प्रमुख बैठकातील चर्चेत सहभागी होत भारतामध्ये विशेषतः महिलांसाठी गुंतवणूक करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या फोरममध्ये चेतना सिन्हा यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे खास ‘सकाळ’च्या वाचकांसाठी...

स्वित्झर्लंडमधील दावोस या शहरामध्ये गेली ४७ वर्षांपासून वर्ल्ड इकॉनॉमिनक फोरम भरते. या वेळी दावोसमध्ये वीस वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान आले होते. त्यांच्या हस्ते फोरमचे उद्‌घाटन झाले. दावोसची यावेळची विशेषता म्हणजे याच्या सहअध्यक्षपदावर सातही महिला होत्या आणि त्यापैकी मी एक होते. माझ्याबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तीन लगार्ड, नॉर्वेच्या पंतप्रधान इमा सोलबर्ग, ‘आयटीयूसी’च्या प्रमुख शॅरन बवोव, युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्‍लिअर रिसर्चच्या मुख्य फॅबिओला गियनोत्ती, इनजी ग्रुपच्या मुख्य इसाबेला कोचर आणि आयबीएनच्या प्रमुख गिनी रोमेट्टी यांनी सहअध्यक्षपद भूषविले. यावर्षी दावोसमध्ये भारताची विशेष उपस्थिती होती. एक तर भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन होते आणि सहअध्यक्ष पदावर भारताची एक महिला होती. माझी भूमिका होती दावोसमध्ये होणाऱ्या सर्व बैठकींचा अजेंडा ठरविणे आणि बैठकीची संकल्पना ठरविणे. दरवेळी दावोसमध्ये सगळ्या जागतिक कंपन्यांचे सीईओ उपस्थित असतात. बिल गेट्‌स, वॉरन बफे, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष, भारतातून नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी, आनंद महेंद्र, राहुल बजाज, आदी गोदरेज असे कॉर्पोरेट जगतातले सर्व सीईओ असतात आणि त्याचबरोबर सगळ्या देशांचे प्रमुखही असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विशेष उपस्थिती होती. 

मी येथे उद्‌घाटन समारंभावेळी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्याचबरोबर मी दावोसमध्ये महिला उद्योजकांकडून गुंतवणूक होण्यासाठी एक फंड स्थापन केला आणि त्या फंडमध्ये माणदेशी बॅंकेबरोबर ‘आयएफएमआर’ भागीदारी करणार आहेत. सध्या रिझर्व्ह बॅंकेत सदस्य असलेले नचिकेत मोर हे ‘आयएफएमआर’चे संस्थापक आहेत. त्याचबरोबर माझी मीटिंग माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबरोबर झाली. भारतात फायनान्शिअल इन्क्‍लुजन कसे करावे, हा त्या चर्चेचा विषय होता. माझी नॉर्वेच्या पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली. नॉर्वेमध्ये शेतीसाठी फंड आहे. भारतामध्ये नॉर्वेचा दूतावासही त्यासाठी काम करतो. तो निधी आपल्या भागात म्हणजे माणसारख्या दुष्काळी भागात कसा आणता येईल, याबाबत त्यांच्याशी मी चर्चा केली. भारतातील दुष्काळी भागात पाण्यावर खूप काम सुरू आहे.

आपण दुष्काळी भागात बंधारे बांधतोय आणि ‘एचएचपीसी’चे खूप पाठबळ आहे. ‘एचएचपीसी’च्या प्रमुखांबरोबरदेखील मी चर्चा केली. येथे एक मोठी सभा भरून चर्चा होते, त्याठिकाणीही मी मतप्रदर्शन केले. अनेक वाहिन्यांवरही या चर्चा, मुलाखती दाखविल्या गेल्या. सुरेश प्रभू, मी, ‘सीएनबीसी’चे पत्रकार झकेरिया आणि स्टेट बॅंकेचे अध्यक्ष असे आम्हा चौघांचे एक पॅनेल होते. भारताला काय पाहिजे, हे सांगणे आमचे प्रमुख काम होते. भारतामध्ये गुंतवणुकीची गरज असल्याचे सुरेश प्रभूंनी सांगितले त्या गुंतवणुकीसाठी लोकांना आवाहन केले. त्या पॅनेलमध्ये भारतातील उद्योजक तर होतेच; पण दुबईचे वगैरे देशांमधील इतर उद्योजकसुद्धा होते. 

शाश्‍वत विकास हे संयुक्त राष्ट्रसंघाचे लक्ष्य आहे. ‘सर्वांना शिक्षण’, ‘महिलांचे सबलीकरण’ या उद्दिष्टांसाठी जागतिक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरही गुंतवणूक कशी आणायची, याबाबत पॅनेलमध्ये चर्चा झाली. पॅनेलमध्ये डेन्मार्कचे पंतप्रधानही होते. या वेळी मी भारतात गुंतवणुकीची गरज आणि त्यातही ग्रामीण भागात, कृषी क्षेत्रात हवी, यावर भर दिला. तसेच, ग्रामीण भागातील युवकांना काम मिळायला हवे म्हणून कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस, ॲग्रिकल्चर लॅब या सगळ्या गोष्टींवर भर दिला पाहिजे, असे माझे मत मांडले. सुरेश प्रभूंबरोबर आणि अर्थमंत्र्यांच्या सचिवांबरोबर चर्चा करताना मी, प्रत्येक ठिकाणाहून नाशवंत शेतीमाल न्यायला सरकार एसटी बसची व्यवस्था करतात तशी व्यवस्था झाली पाहिजे आणि शेतीमध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे, असे सांगितले. भारताचे पंतप्रधान सांगतात, की शेतीतून मिळणारे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे. असे होईल तरच तरुणांना नोकऱ्या मिळतील. काही तरुणांना शेती करायची नाही. पण मग असे तरुण व्हेटर्नरी डॉक्‍टर होऊ शकतात. मृदा प्रयोगशाळा चालवू शकतात. ब्राझील आणि इस्राईलचे पंतप्रधान तिथेच होते, त्यांच्याकडून आपण शिकू शकतो. माझी शेवटची मीटिंग ट्रम्प यांच्याबरोबर होती.

समारोपाच्या कार्यक्रमाला ट्रम्प उपस्थित होते. यंदा भारताला खूप महत्त्व मिळाले. या वेळी स्पष्ट दिसून येत होते, की यावेळच्या फोरममध्ये भारत चॅंपियन होता.

माणदेशी महिलांना भेटायचे आहे
युरोपियन सेंट्रल बॅंकेच्या महासंचालिका क्रिस्टिना यांच्याशीही माझी चर्चा झाली. भारतामधील महिलांसाठी गुंतवणूक करण्यासाठी त्यांनीही रस दाखविला. क्रिस्टिना यांनी भारतातून दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. आता त्या मुली एकोणीस वर्षांच्या आहेत. भारताशी माझे विशेष संबंध आहेत, भारतासाठी काम करायला आवडेल, असे त्या म्हणाल्या. त्या भारतात येणार आहेत आणि मी त्यांच्याकडे जर्मनीत जाणार आहे. त्यांना माणदेशी महिलांना भेटायची खूप इच्छा आहे. 

(शब्दांकन - श्रीकांत कात्रे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com