म्युच्युअल फंडांना वाढती पसंती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पुणे - गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षभरात स्थावर मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा वित्तीय संपत्तीमध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत केले आहे. पारंपरिक गुंतवणूक पर्यायांचा परतावा कमी झाल्यामुळे २०१७ मध्ये छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी गुंतवणूक केली असून, ‘एसआयपी’ (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा सर्वाधिक पसंतीचा मार्ग असल्याचा निष्कर्ष आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाने नोंदविला आहे. 

आयसीआयसीआय आणि प्रुडेन्शिअल यांच्यातील भागीदारीला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल फंडाच्या रिटेल व्यवसाय विभागाचे प्रमुख अमर शहा येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी विभागीय प्रमुख राहुल जवंजाळ हेही उपस्थित होते.

शहा म्हणाले, की सोने, रिअल इस्टेट आणि इतर पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमधून मिळणाऱ्या परताव्याला ओहोटी लागल्याने गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडाच्या पर्यायाला अधिक पसंती दिल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 

गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडामधील ॲसेट बेस गेल्या वर्षी ७.७ लाख कोटी रुपयांवर पोचला. २०१६ मध्ये तो ४.७ लाख कोटी रुपये होता. २०१७ मध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी ५३ हजार कोटी रुपये ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतविले. विक्रमी गुंतवणूक आकड्यांपैकी हा एक आहे. त्याचबरोबर २०१७ मध्ये दर महिन्याला सरासरी नऊ लाख ‘एसआयपी’ अकाउंटची भर पडत राहिली. हा ‘ट्रेंड’ असाच चालू राहील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. शेअर बाजाराने घेतलेली उसळी पाहता, जे गुंतवणूकदार प्रथमच गुंतवणुकीचा विचार करीत आहेत, त्यांनी शक्‍यतो बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडामध्ये गुंतवणूक करणे हिताचे ठरेल, असा सल्ला देऊन ते पुढे म्हणाले, की हा फंड त्यांना रोखे आणि समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. शेअर बाजारात घसरण झाल्यास, रोख्यांमुळे संरक्षण मिळते. त्यामुळे जोखीम कमी होते आणि दीर्घकालीन चांगला परतावा मिळू शकतो.

Web Title: arthavishwa news mutual fund demand investment