फिनटेक  : युपीआय विरुद्ध पेटीएम

googlepay-paytm
googlepay-paytm

बऱ्‍याच लोकांचा युपीआय, पेटीएम, गुगल पे, फोनपे अशा शब्दांमुळे पुरता गोंधळ उडून जातो. या सर्व गोष्टी एकसारख्याच आहेत, असे त्यांना वाटणे स्वाभाविकसुद्धा आहे. म्हणूनच याचा नेमका खुलासा होणे आवश्यक आहे. 

‘युपीआय’विषयी आपण बोललो आहोतच. गुगल पे, फोनपे, भीम ही सगळी ‘युपीआय’ तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी अॅप्स झाली. म्हणजेच आपल्या फोनमध्ये यामधील कोणतेही अॅप असेल तर आपल्या फोनमध्ये ‘युपीआय’ आले. ते वापरून आपल्याला आपल्या बॅंकेतून इतर कोणाच्याही बॅंक खात्यात पैसे पाठवणे किंवा इतर कोणाच्याही बॅंक खात्यातून आपल्या खात्यात पैसे स्वीकारणे शक्य होते. ही सर्व अॅप्स हेच काम आपल्याला साध्य करून देतात. त्यांचा वापर करताना आपल्याला त्यांच्यात काही फरक जाणवतील; पण म्हणून त्यांच्या कामाच्या स्वरूपात अजिबात फरक पडत नाही.

‘युपीआय’हून ‘पेटीएम’ वेगळे आहे. ‘युपीआय’ हे थेट आपल्या बॅंक खात्याला जोडलेले असते; पण ‘पेटीएम’ मात्र स्वत:चे ‘वॉलेट’ तयार करते. त्या ‘वॉलेट’चा आपल्या बॅंक खात्याशी काहीही संबंध नसतो. म्हणजेच ‘युपीआय’ ही आपल्या बॅंक खात्याला जोडलेली एक जोडणी असे आपण मानले, तर ही जोडणी ‘पेटीएम’ला अजिबात नसते. उलट, आपण आपल्या बॅंक खात्यातून ऑनलाइन पैसे काढून ते आपल्या ‘पेटीएम वॉलेट’मध्ये भरतो. या फरकामुळे काय घडते? समजा, आपण कोणाला ऑनलाइन पैसे पाठवू इच्छित असलो, तर ‘युपीआय’ वापरून हे पैसे आपण ते आपल्या बॅंक खात्यातून भरू शकतो; पण ‘पेटीएम’ वापरायचे तर त्यासाठी आधी आपल्या ‘पेटीएम वॉलेट’मध्ये पैसे असले पाहिजेत. तसेच कोणी आपल्याला ‘युपीआय’ आयडीवर पैसे पाठवले तर ते थेट आपल्या बॅंक खात्यात येतील; पण जर ते आपल्या ‘पेटीएम’ आयडीवर पाठवले तर ते आपल्या ‘पेटीएम वॉलेट’मध्ये येतील.

एकूण काय; तर ‘युपीआय’ वापरून थेट बॅंकांचे व्यवहार शक्य होत असत आणि ‘पेटीएम’ वापरून ते शक्य होत नसत. यामुळे ‘पेटीएम’चा वापर कमी होत असल्याचे लक्षात घेऊन ‘पेटीएम’ने आपले धोरण बदलले. आता ‘पेटीएम’चा वापर करताना आधीप्रमाणेच ‘पेटीएम वॉलेट’ वापरायचे, की ‘पेटीएम’ वापरत असूनही आपले बॅंक खाते वापरायचे, हे आपण निवडू शकतो. थोडक्यात, म्हणजे ‘पेटीएम’ने आता ‘वॉलेट’बरोबरच ‘युपीआय’चीसुद्धा सोय करून दिली आहे. त्यामुळे ‘युपीआय’ आणि ‘पेटीएम’ यांच्यामधील फरक आता अगदी धूसर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com