म्युच्युअल फंड योजनेची निवड कशी कराल? 

अरविंद परांजपे 
Sunday, 16 August 2020

कोणती योजना सर्वोच्च परतावा देईल,हे आधी कोणालाही सांगता येत नाही.मागील काळात उत्तम कामगिरी आहे म्हणून पुढेही होईल,असेही सांगता येत नाही.तसेच 5वर्षांपेक्षा जास्त मागील कामगिरीला फारसे महत्त्व देऊ नये.

स्वत: अभ्यास करून शेअर्स घेणे हे सोपे नसते, हे अनेक गुंतवणूकदारांच्या लक्षात येत नाही. शिवाय आपल्याला नक्की किती वार्षिक परतावा (फायदा/तोटा) मिळाला याचा ते हिशेबही करीत नाहीत. त्यामुळे गुंतवणूक योग्य होते का नाही, हे त्यांना कळत नाही. याशिवाय शेअरच्या भावावर जे घटक परिणाम करतात, ज्यांचा वेध घेणे सर्वसामान्य माणसाच्या आटोक्‍याच्या बाहेरील बाब असते. त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सोयीचा आणि लाभदायी पर्याय आहे. पण त्यासाठीही अभ्यासाची गरज आहेच. 2018 मध्ये "सेबी'ने केलेल्या योजनांच्या वर्गवारीची मदत घेऊन तुम्हाला "ऍसेट ऍलोकेशन' करता येते. त्याच्या पायऱ्या कशा असताता, ते पाहूया. 

अ) पोर्टफोलिओमधील इक्विटी/ डेट/ बॅलन्स्ड प्रकाराचे प्रमाण ठरवणे. (उदा. 50 : 30 : 20) 

ब) इक्विटी विभागातील 10 आणि हायब्रीड विभागात 6, डेट विभागातील 16 आणि अन्य विभागातील 4 मधून योग्य तो मुख्य प्रकार निवडणे. (उदा. इक्विटीमध्ये लार्ज कॅप) 

लार्ज कॅप प्रकारात सध्या 35 योजना आहेत. या योजनांच्या कामगिरींमध्येही लक्षणीय तफावत असल्याने योग्य योजनेची निवड करणे सुद्धा सोपे नाही. 

हेही वाचा : अस्थिरतेतही आकर्षण अल्पबचत योजनांचे 

योग्य योजनेची निवड करण्याचे निकष 
- म्युच्युअल फंड कंपनीची एकूण कामगिरी व त्यांचे व्यवस्थापन- विश्वासार्हता, चोख व्यवस्थापन, राबवत असलेल्या प्रक्रिया आदी निकषांवर 40 पेक्षा जास्त कंपन्यांमधील योग्य फंड कंपनीची निवड करता येते. 

- म्युच्युअल फंड राबवत असलेली शेअर्सची निवड करण्याची प्रक्रिया- त्यांच्याकडे किती विश्‍लेषक आहेत आणि ते कशा पद्धतीने कंपन्यांची निवड करतात. 

- योजनेच्या फंड मॅनेजरची कामगिरी - फक्त स्टार फंड मॅनेजरवर विश्‍वास ठेवू नये. कारण अनेकदा नाव मोठे, पण कामगिरी सुमार, असा अनुभव येतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- निर्देशांकाच्या आणि त्या श्रेणीतील योजनांच्या सरासरीच्या तुलनेत योजनेची कामगिरी बघणे महत्त्वाचे आहे. कारण आपण निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनेने तुलनेला असलेल्या बेंचमार्कपेक्षा (उदा. निफ्टी/बीएसई 100) सरस कामगिरी केलेली असली पाहिजे. 

- योजनेच्या परताव्यातील सातत्य - सर्वांत जास्त परतावा दिलेली योजना चांगली हा गैरसमज आहे. त्यासाठी जोखीम किती आहे, हे बघितले पाहिजे. शेअर बाजाराच्या चढत्या आणि पडत्या काळातही योजनेची तुलनात्मक कामगिरी सरस आहे का, हे तपासले पाहिजे. यासाठी "रोलिंग रिटर्न्स' कसे आहेत, हे बघावे. कोणतीही योजना दीर्घकाळासाठी "टॉप'वर राहू शकत नाही. मात्र, कामगिरीच्या दृष्टीने निवडलेल्या निष्कर्षावरून पहिल्या दोन गटांमध्ये ती असावी. उदा. एकूण 35 योजनांमध्ये तिची कामगिरी पहिल्या 10 मध्ये नेहमी असावी. योजनेचा परतावा त्यात असलेल्या शेअर्सच्या कामगिरीवर अवलंबून असतो. अनेकदा थोडेच शेअर चांगली कामगिरी करतात. त्यामुळे असे शेअर नसलेल्या योजना त्या शेअर्सचा समावेश असलेल्या योजनांपुढे फिक्‍या पडतात. परंतु, हे चित्र बदलत राहत असल्याने लगेचच आपली योजना बदलण्याची घाई करू नये. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- योजनेच्या पोर्टफोलिओतील "कॉन्सट्रेशन' - खूप कंपन्यांचे शेअर असले तरी जोखीम कमी होतेच, असे सांगता येत नाही. तसेच थोड्या सेक्‍टरमध्येच जास्त गुंतवणूक आहे का, हे बघावे. अर्थात वॉरन बफेंच्या म्हणण्याप्रमाणे, कमी कंपन्या असलेला पोर्टफोलिओ चांगला परतावा देऊ शकतो, हे पण लक्षात ठेवावे. 

- फंड मॅनेजरचा विश्‍वास ग्रोथ किंवा व्हॅल्यू यापैकी कशावर आहे, हे बघणे जरुरीचे आहे. कारण या दोन्ही पद्धतींना वेगवेगळ्या काळात यश मिळू शकते. 

- "एसआयपी'साठी अधिक जोखीम असलेल्या योजनेची निवड करता येऊ शकते. 

अर्थातच महत्त्वाची बाब म्हणजे कोणती योजना सर्वोच्च परतावा देईल, हे आधी कोणालाही सांगता येत नाही. मागील काळात उत्तम कामगिरी आहे म्हणून पुढेही होईल, असेही सांगता येत नाही. तसेच पाच वर्षांपेक्षा जास्त मागील कामगिरीला फारसे महत्त्व देऊ नये. योजनेची निवड चुकली तर दीर्घकाळात आणि/किंवा मोठ्या रकमेवर जास्त नुकसान होऊ शकते. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी योजनांचा आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल केले पाहिजेत. 

(लेखक म्युच्युअल फंड सल्लागार आहेत.) 

पुणे 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind paranjpe writes article about mutual fund plan