चला ‘फिनटेक’च्या दुनियेत!

चला ‘फिनटेक’च्या दुनियेत!

अर्थकारण (फायनान्स) आणि तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) यांचा संगम घडवून आणणाऱ्‍या संकल्पनेला ‘फिनटेक’ असे म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून अर्थकारण अत्याधुनिक करण्याबरोबरच जास्तीत जास्त ग्राहकस्नेही करण्याच्या दृष्टीने ‘फिनटेक’ने खूप महत्त्वाचे काम केले आहे. आपल्या मोबाईल फोनचा वापर करून घरबसल्या बॅंक, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा, गुंतवणूक, कर्ज अशासारख्या असंख्य गोष्टी आता ‘फिनटेक’मुळेच शक्य होतात. या ‘फिनटेक’मुळे किमान शहरी भागांमधील बहुसंख्य लोकांचे आणि ग्रामीण भागातील काही लोकांचं आयुष्य एकदम सुकर केले आहे. अर्थात, याच्या जोडीला ‘फिनटेक’च्या वापरासंबंधी असंख्य अडचणीसुद्धा आहेत. 

‘पैसा’ ही संकल्पना माणसाला तशी नवी नाही. अगदी पूर्वीच्या काळी वस्तूंच्या देवाणघेवाणीचा प्रकार चालत असे. त्यानंतर धातूंची नाणी आली आणि कागदी नोटाही आल्या. अलीकडच्या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांचा वापरही मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. इंटरनेटच्या लोकप्रियतेमुळे या कार्डांची लोकप्रियता तर वाढलीच; पण अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स, यूपीआय यांच्यासारख्या सोयींमुळे पैशांचे व्यवहार आणखीनच सोपे झाले. काही दशकांमध्ये पैशांच्या स्वरूपात झालेली ही स्थित्यंतरे एकदम थक्क करून सोडणारी आहेत. काही काळापूर्वी पैशांचे व्यवहार करणे काहीसे गैरसोयीचे वाटायचे; पण आता हे व्यवहार अक्षरश: चुटकीसरशी होतात.

‘सकाळ’च्या वाचकांना या सगळ्या विश्वाची एक झलक दाखवावी, त्यामधील क्लिष्ट वाटणाऱ्‍या गोष्टी सोप्या करून सांगाव्यात, या संदर्भात कानांवर आदळणाऱ्‍या अनेक नवनव्या शब्दांचा नेमका अर्थ समजावून सांगावा, असे या सदराचे उद्दिष्ट आहे. कोणत्याही वयोगटामधील माणूस आता ‘फिनटेक’चा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणूच शकत नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे अंधारात चाचपडत यूपीआय, गुगल पे, फोन पे, पेटीएम, ब्लॉकचेन, बिटकॉइन, क्रिप्टो करन्सी, आरटीजीएस, वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, शाखाविरहित बॅंका अशांसारख्या असंख्य गोष्टींशी सुरू असलेला आपला झगडा काही अंशी कमी व्हावा, असाही या सदराचा प्रयत्न आहे. 

स्मार्टफोन खरोखरच स्मार्टपणे वापरून ‘फिनटेक’च्या जगात आपण आत्मविश्वासाने वावरण्यासाठी त्याचा थोडाफार हातभार लागला तरी हे सदर यशस्वी झाले, असे म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com