‘अर्थ’विशेष : वॉरन बफे जीवेत शरद: शतम् !

आज, ३० ऑगस्ट २०२१ रोजी जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि गुंतवणूक गुरु वॉरन बफे आपल्या वयाची ९१ वर्षे पूर्ण करून ९२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
Warren Buffett
Warren BuffettSakal

आज, ३० ऑगस्ट २०२१ रोजी जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि गुंतवणूक गुरु वॉरन बफे आपल्या वयाची ९१ वर्षे पूर्ण करून ९२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या वयात सुद्धा ते बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीच्या एका शेअरचा भाव ४,३५,००० डॉलर असून, ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ ६५५ अब्ज डॉलर एवढे प्रचंड आहे! या कंपनीचे उपाध्यक्ष चार्ली मंगर हे ९८ वर्षांचे आहेत. अशा या दोन ‘तरुणांनी’ गुंतवणूक कशी करावी आणि आयुष्य कसे जगावे, याचा एक आदर्श सर्वांपुढे घालून दिला आहे.

वॉरन बफे यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी ओमाहा, नेब्रास्का येथे झाला. त्यांचे वडील स्टॉक ब्रोकर होते. त्यांच्या कार्यालयातील वर्तमानपत्रे, शेअरची भावपत्रके, ‘स्टॅंडर्ड अँड पुअर’ची मासिके चाळण्याचा लहानग्या वॉरनला छंद होता. ज्या वयात लहान मुले परिकथा वाचतात, त्या वयात या मुलाचे आवडते पुस्तक होते ‘१००० डॉलर्स कमविण्याचे १००० मार्ग’! वयाच्या सहाव्या वर्षीच कोकाकोला विकण्याचा उद्योगही या चिमुरड्याने केला. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ हा पेपर पाचशे घरात टाकण्याचे कष्टप्रद काम सुद्धा वॉरनने आनंदाने केले. पुढे या दोन्ही कंपन्यांचे भरपूर शेअर खरेदी करून त्यांनी याच कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्थान पटकाविले. वयाच्या ११व्या वर्षी स्वकमाईतून शेअर, तर १४ व्या वर्षी ४० एकराचा प्लॉट १२०० डॉलरला खरेदी केला.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी कोलंबिया विद्यापीठात त्यांचे गुरू बेंजामिन ग्रॅहॅम यांच्याकडून ‘सिक्युरिटी ॲनालिसिस’ आणि ‘व्हॅल्यु इन्व्हेस्टिंग’चे धडे गिरवले. नंतर ‘बफे पार्टनरशिप’ या नावाने व्यवसाय सुरू करून भागीदारांना दहा वर्षे उत्कृष्ट परतावा मिळवून दिला. १९६५ मध्ये त्यांनी ‘बर्कशायर हॅथवे’ नावाची आर्थिक संकटात सापडलेल्या वस्त्रोद्योगातील कंपनी खरेदी केली. या कंपनीमार्फत वेळोवेळी कोकाकोला, मॅकडोनाल्ड, वॉशिंग्टन पोस्ट, बॅंक ऑफ अमेरिका, अमेरिकन एक्सप्रेस, ॲपल यासारख्या बलाढ्य कंपन्यांत मोठा हिस्सा खरेदी करून गुंतवणूकदारांना गेली ५५ वर्षे २० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला!

वॉरन बफे यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे आज त्यांची नेटवर्थ १०० अब्ज डॉलर असूनसुद्धा त्यांची राहणी साधी आहे. १९५८ मध्ये ३१,५०० डॉलरला खरेदी केलेल्या घरात ते आजही राहतात. ते म्हणतात, ‘माझ्या गरजा अगदी कमी आहेत. वयाच्या चाळीसाव्या वर्षी ज्या गोष्टी मला आनंद द्यायच्या, त्याच गोष्टी वयाच्या नव्वदाव्या वर्षी सुद्धा आनंद देतात. माझ्या पैशाची, माझ्यापेक्षा समाजाला गरज जास्त आहे.’ त्यामुळेच त्यांनी आपल्या प्रचंड संपत्तीपैकी ५० टक्के संपत्ती दान केली आहे व उरलेल्या ५० टक्क्यांपैकी ४९ टक्के संपत्तीसुद्धा आपल्या हयातीत दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे.

१९७७ पासून, आपल्या कंपनीच्या भागधारकांना लिहिलेल्या वार्षिक पत्राद्वारे त्यांनी ज्ञानाचा खजिनाच गुंतवणूकदारांसाठी खुला केला आहे. त्यांच्या गुंतवणूक पद्धतीवर जेवढी पुस्तके लिहिली गेली आहेत, तेवढी कोणत्याच गुंतवणूक पद्धतीवर लिहिली गेली नाहीत आणि त्यातील अनेक पुस्तके ही ‘इंटरनॅशनल बेस्टसेलर’ ठरली आहेत. ते स्वतः या वयातसुद्धा रोज सुमारे चारशे ते पाचशे पाने वाचतात.

आज वॉरन बफे यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वेळोवेळी गुंतवणूकदारांना दिलेला अमूल्य आणि जगावेगळा सल्ला पाहूया -

  • गुंतवणुकीचे केवळ दोनच नियम आहेत! एक, कधीही पैसा गमावू नका आणि दोन, नियम क्रमांक एक कधीच विसरू नका!

  • अर्थव्यवस्थेची चिंता करू नका, उत्कृष्ट कंपन्या निवडण्यावर भर द्या.

  • शेअरची खरेदी केल्यानंतर बाजाराकडे दुर्लक्ष करा, तो काही वर्षे बंद पडला तरीसुद्धा काळजी करू नका.

  • शेअर खरेदी न करता व्यवसाय खरेदी करतो आहोत, अशी कल्पना करा.

  • नेहमी दीर्घ मुदतीसाठी म्हणजे काही दशकांसाठी गुंतवणूक करा.

  • आपल्या पोर्टफोलिओमध्ये खूप कंपन्यांचे शेअर जमवून ठेवू नका.

  • शेअर बाजारातून पैसे कमविण्याचे रहस्य हेच, की जेव्हा सर्व गुंतवणूकदार घाबरलेले असतात तेव्हा तुम्ही लोभी बना आणि सर्व जण लोभी बनलेले असतील, तेव्हा तुम्ही घाबरून राहा!

गुंतवणूक कशी करावी आणि आयुष्य कसे जगावे, याचा आदर्श जगापुढे ठेवणाऱ्या गुंतवणुक गुरूंना म्हणूयात-

जीवेत शरद: शतम्!

(लेखक गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com