'बंधन बॅंके'च्या आयपीओला चांगला प्रतिसाद 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

खाजगी क्षेत्रातील बॅंक असलेल्या 'बंधन बॅंके'च्या प्राथमिक समभाग (आयपीओ) विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 15 मार्चरोजी खुला झालेल्या  'बंधन बॅंके'च्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे.

कोलकाता: खाजगी क्षेत्रातील बॅंक असलेल्या 'बंधन बॅंके'च्या प्राथमिक समभाग (आयपीओ) विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 15 मार्चरोजी खुला झालेल्या  'बंधन बॅंके'च्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी 1.64 पट सबस्क्राइब झाला आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून सुमारे 11.92 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे.

कंपनीचा आयपीओ 15 ते 19 मार्चदरम्यान खुला होता. कंपनीने आयपीओसाठी रु.370 ते रु.375 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता.

रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखाद्या बँकेने बँकिंग व्यवसायाला सुरवात केल्याच्या तीन वर्षांत स्वत: शेअर बाजारात शेअरची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. बंधन बँकेने ऑगस्ट 2015 पासून बँकिंग क्षेत्रात कार्य सुरू केले.

तळागाळातील लोकांना आर्थिक साह्य करण्याच्या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी बंधन बॅंक सुरू करण्यात आली. बॅंकेच्या प्रारंभीच्या सात महिन्याच्या कालावधीत 275 कोटींचा नफा झाला होता, मात्र आता बॅंकेचा 1 हजार 111 कोटी 95 लाख रुपयांवर पोचला आहे. तसेच बॅंकेला निव्वळ व्याजातून मिळालेले उत्पन्न 2 हजार 403 कोटी 50 लाख रुपये आहे. तसेच बॅंकेकडे 23 हजार 288 कोटी 66 लाख ठेवी आहेत. बॅंकेने या कालावधीत तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांवर भर दिला. बॅंकेची व्याप्ती वाढली असून बॅंकेने आता डिजिटायझेशनमध्येही पाऊल टाकले आहे.

बंधन बॅंकेच्या 33 राज्यांमध्ये 840 शाखा आहेत. तसेच 2443 घरपोच सेवा आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बॅंकेने 184 शाखा सुरू केल्या होत्या. या आर्थिक वर्षात बॅंकेने एक हजार शाखा उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Web Title: Bandhan Bank IPO Subscribed 1.64 Times