बॅंक कर्मचारी संपावर ठाम

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉइज फेडरेशनचे तब्बल पाच लाख कर्मचारी मंगळवारी (ता. २२) संपावर जाणार आहेत.

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉइज फेडरेशनचे तब्बल पाच लाख कर्मचारी मंगळवारी (ता. २२) संपावर जाणार आहेत.

बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनांना दोनदिवसीय संपातून माघार घेण्यास भाग पाडले असले, तरी कर्मचारी संघटना विलीनीकरणाविरोधात आक्रमक आहेत. त्यामुळे मंगळवारी कर्मचाऱ्यांकडून देशभरात सरकारविरोधात निदर्शने, धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, भारतीय स्टेट बॅंक आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक वगळता सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याचे सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

केंद्र सरकारने दहा बॅंकांचे एकत्रीकरण करून त्यातून चार बॅंका कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण आणि देना, विजया आणि बॅंक ऑफ बडोदा यांच्या विलीनीकरणानंतर देशभरातील दोन हजार शाखा बंद करण्यात आल्या असून, नव्या एकत्रीकरणातून हा धोका वाढला असल्याचे बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव विजय आरोस्कर यांनी सांगितले. सरकारकडून सार्वजनिक बॅंकांचे खच्चीकरण केले जात असून, खासगी बॅंकांना प्रोत्साहन दिले जात आहे. मागील काही काळामध्ये स्मॉल फायनान्स बॅंकांना मोठ्या संख्येने परवाने देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. बॅंकांमधील खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. एसबीआय आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक वगळता इतर सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजाला झळ बसेल, असे आरोस्कर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank employees firmly on strike