संपामुळे बॅंकिंग व्यवहार कोलमडले

bank
bank

मुंबई - केंद्र सरकारच्या प्रस्तावित बॅंक एकत्रीकरणाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाने मंगळवारी (ता. २२) बॅंकिंग व्यवहार ठप्प झाले. सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन राष्ट्रीय संघटनांनी या संपाची हाक दिली होती. यात तीन लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. यामुळे हजारो कोटींचे धनादेश वटू शकले नाहीत. या संघटनांचे प्राबल्य असलेल्या बॅंकांच्या शाखा आणि एटीएम सेवेवर मोठा परिणाम झाला. 

ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन आणि बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांनी या संपाची हाक दिली होती. या संपाला ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशनसह इतर कामगार संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक वगळता सार्वजनिक क्षेत्रातील इतर बॅंकांच्या कामकाजाला मोठा फटका बसला. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील १० बॅंकांचे एकत्रीकरण करून त्यातून चार बॅंका करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित एकत्रीकरणाला कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. 

‘‘बॅंकिंग व्यवहारांमध्ये कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे आजच्या संपातून स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बॅंकांमध्ये आलेले धनादेश पुढील प्रक्रियेसाठी ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन’कडे पोचू शकले नाहीत. बॅंकांमध्ये विलीनीकरण किंवा एकत्रीकरणाचा मुद्दा सरकार रेटू पाहत असून, यामुळे बुडीत कर्ज वसुलीचा मुद्दा दुर्लक्षित झाला आहे. बॅंकिंग सेवेचा विस्तार आवश्‍यक असताना एकत्रीकरणामुळे बॅंकांच्या शाखांवर गंडांतर येईल. हे धोरण चुकीचे आणि अनावश्‍यक आहे,’’ असे मत ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचेलम यांनी सांगितले.

राज्यात ४० हजार कर्मचारी सहभागी  
महाराष्ट्रातील जवळपास ४० हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. मुंबईतील आझाद मैदानात जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बॅंकांच्या एकत्रीकरणामुळे किमान पाच हजार शाखा बंद होतील, अशी भीती या वेळी व्यक्त करण्यात आली. आंदोलनात ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनचे देवीदास तुळजापूरकर, एन. शंकर, अनिल प्रभू, प्रल्हाद पाटील, संदीप करमकर, रत्नाकर वानखेडे आदी उपस्थित होते.

प्रमुख राज्यांतील बॅंकिंग सेवेला फटका
आजच्या संपाचा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये परिणाम दिसून आला. बंगळूर, चेन्नई, पाटणा, कोलकता आदी शहरांमधील बॅंकिंग व्यवहार ठप्प होते. मध्य प्रदेशमधील २० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले. यामुळे या राज्यातील ७ हजार ४०० पैकी ४ हजार ८०० शाखांच्या कामकाजावर परिणाम झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com