छप्परफाड ऑफर! 20 वर्षांसाठी 0 टक्के व्याजदराने बँक देतेय होम लोन

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

तुम्हाला घर घ्यायचंय तर 0 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल, असं बँकेने म्हणल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल

नवी दिल्ली- तुम्हाला घर घ्यायचंय तर 0 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल, असं बँकेने म्हणल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल किंवा काहीतरी गडबड असल्याची शंका तुमच्या मनात येईल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण डेन्मार्क असा देश आहे, जेथे 20 वर्षांसाठी 0 टक्के व्याज दराने तुम्हाला होम लोन मिळते. आहे की नाही कमाल. 

डेन्मार्कचा निगेटिव्ह बँक दरांचा इतिहास राहिला आहे. 2012 पासून डेन्मार्क निगेटिव्ह बँक रेट ऑफर करत आला आहे. असं सर्वाधिक काळापर्यंत करणारा डेन्मार्क जगात एकमेव देश आहे. डेन्मार्कमधील नॉर्डिया बँक एबीपीने Nordea Bank Abp आपल्या ग्राहकांना कर्जावर 0 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हे होम लोन तब्बल 20 वर्षांसाठी असणार आहे. 

खुशखबर! रेल्वेनं घेतला महत्वाचा निर्णय; अखेर ९ महिन्यांनंतर प्रवाशांना मिळणार...

जगभरातील अनेक बँका आपला बँक रेट वाढवण्यापासून कचरत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता कोणतीही बँक आपला रेट 2021 संपेपर्यंत वाढवण्याचे चिन्ह नाहीत. त्यातच डेन्मार्कच्या बँकेने मोठे पाऊल उचलत ग्राहकांना शून्य टक्क्यांवर 20 वर्षांसाठी होम लोन देण्याचा निर्णय घेतला. डेन्मार्कमधील अनेक बँकाही नॉर्डिया बँक एबीपीला पॅकेज पुरवण्यासाठी मदत करत आहेत. 

नॉर्डिया बँक एबीपीच्या पाऊलावर पाऊल ठेवत डॅनसेक या डेन्मार्कमधील सर्वात मोठ्या बँकेनेही 0 टक्के दराने होम लोन देण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकांनी 0 टक्के व्याज दराचे 20 वर्षाचे बाँड बाजारात आणले आहेत. दरम्यान, अनेकांचे नवीन घर घेण्याचे स्वप्न असते, पण जास्तीच्या व्याजामुळे अनेक जण रेंटच्या घरातच राहणे पसंद करतात. शून्य टक्के दराने कर्ज मिळत असल्यास तुम्हीही घर घेण्याचा विचार कराल. पण, त्यासाठी तुम्हाला डेन्मार्कचा नागरिक व्हावं लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banks offering 20 year home loans at a fixed interest rate of zero