नोटा बदलताना बोटांना शाई लावणार: शक्तिकांत दास

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

काही लोक वेगवेगळ्या शाखांमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा पैसे बदलून घ्यायला जात आहेत. अनेक लोक आपला काळा पैसा पांढरा करीत असून, असे पैसे बदलून घेण्यासाठी वेगवेगळे गट निर्माण केले जात आहेत.

नवी दिल्ली: रोख पैशांसाठी बँकांमधील वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी आलेल्या व्यक्तींच्या बोटाला निवडणुकांप्रमाणे शाई लावली जाईल, अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. 

"काही लोक वेगवेगळ्या शाखांमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा पैसे बदलून घ्यायला जात आहेत. अनेक लोक आपला काळा पैसा पांढरा करीत असून, असे पैसे बदलून घेण्यासाठी वेगवेगळे गट निर्माण केले जात आहेत. यावर उपाय म्हणून निवडणुकांप्रमाणे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बोटाला कॅश काऊंटवर शाई लावली जाईल. देशातील प्रमुख शहरांमध्ये आजपासून याची अंमलबजावणी केली जाईल", असे दास पत्रकार परिषदेत म्हणाले.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्याऐवजी पाचशे रुपयांची व दोन हजार रुपयांची नवी नोट सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांनी बँकांमध्ये वैध चलन मिळविण्यासाठी गर्दी केली आहे. यामुळे बँकिंग यंत्रणेवरील ताणदेखील वाढत असून सर्वच नागरिकांची गैरसोय होत आहे. 

लोकांनी या निर्णयामुळे घाबरुन जायचे कारण नाही. परिस्थिती हळुहळु सुधारत आहे. केंद्र सरकार सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगत या योजनेविषयी सोशल मिडीयावर फिरत असलेल्या मेसेजेसवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. मोठ्या प्रमाणावर जमा रोखीचा योग्य साठा करण्यासाठी व त्यासंबंधी काम करण्यासाठी बँकांकडून विशेष समितीची स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

Web Title: Banks to use inedible ink to deter unscrupulous people from making multiple withdrawals