गुंतवणुकीला देऊया ‘गोल्डन टच’ 

investment
investment

परदेशी गुंतवणूक संस्थांच्या वाढत्या निधीमुळे तेजीचा कल दर्शवत गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ४६,९६० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १३,७६० अंशांवर बंद झाला. तसेच नवनव्या ‘आयपीओं’चे शेअर बाजारात जोरदार स्वागत होत आहे. एकीकडे शेअर बाजार नवे शिखर गाठत असताना मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी वर्षात ‘न भूतो न भविष्यति’ असा अर्थसंकल्प जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. 

तेजीचा बोलबाला सुरू असताना गुंतवणूकदारांनी आगामी काळासाठी कशा पद्धतीने गुंतवणूक करावी, याचा विचार करूया. 

शेअर बाजारात जोरदार तेजी असते, तेव्हा सर्व काही अत्यंत सोपे दिसते. डोळ्यावर तेजीची झापड येऊन झटपट भरपूर नफा कमवण्याचा मार्ग म्हणून शेअर बाजाराकडे पाहिले जाऊ लागते. तेजीच्या काळात फंडामेंटली असक्षम असणाऱ्या कंपन्यांचे शेअरमध्ये देखील तेजीचे बुडबुडे तयार होत असतात. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी जागरूक राहून संयमाने फंडामेंटली सक्षम अशाच निवडक कंपन्यांच्या शेअरमध्येच गुंतवणुकीचे धोरण स्वीकारणे फायदेशीर ठरल्याचा इतिहास आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘पिडीलाईट’मध्ये तेजीचे संकेत 
शेअर बाजाराचा विचार करता इन्फोसिस, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, पिडीलाईट, पेज इंडस्ट्रीज आदी अनेक कंपन्यांचे शेअर आलेखानुसार तेजीचा कल दर्शवीत आहेत. पिडीलाईट या कंपनीमार्फत फेविकॉल, डॉक्टर फिक्सिट, एम सील, फेविक्विक आदी अनेक नामवंत उत्पादनांची निर्मिती होते. चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये ‘फेविकॉल’ या लोकप्रिय उत्पादनाचा हिस्सा ७० टक्के आहे. कर्ज आणि भांडवलाचा विचार करता, पिडीलाईट ही कर्जमुक्त कंपनी आहे. कंपनी स्वतः धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवीत आहे. आलेखानुसार, १७०९ या पातळीच्या वर शुक्रवारी रु. १७३१ बंद भाव देऊन पिडीलाईटच्या शेअरने मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. ‘पिडीलाईट’च्या शेअरचा भाव रु. १४९९ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीत आणखी वाढ दर्शवू शकेल. 

‘पेज इंडस्ट्रीज’त मध्यम अवधीत तेजी 
‘जॉकी’ या नामवंत ब्रँडच्या कपड्यांची भारतात निर्मिती आणि वितरण करणाऱ्या पेज इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरनेदेखील आलेखानुसार इंग्रजी अक्षर डब्ल्यू (w) सारखा आकार तयार करत रु. २६,८८२ या पातळीच्या वर रु. २८,२१७ ला शुक्रवारी बंद भाव देऊन मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार, या कंपनीच्या शेअरचा भाव रु. १९,४४९ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीत आणखी तेजी येणे अपेक्षित आहे. ज्या गुंतवणूकदारांना अशा भावाने महाग; परंतु भविष्यात वाढ दर्शवू शकणाऱ्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी करणे शक्य आहे, ते पेज इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरचा विचार करू शकतात. आगामी काळात १३ जानेवारी २०२१ रोजी इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे निकाल जाहीर होणार आहेत. निकालपूर्व काळात या कंपनीच्या शेअरने अल्पावधीच्या आलेखानुसार रु. ११८६ या पातळीच्या वर रु. ११८९ ला बंद भाव देत तेजीचे संकेत दिले आहेत. या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ११०० पातळीच्या वर आहे, तोपर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये देखील आणखी भाववाढ होणे अपेक्षित आहे. 

सोने तुम्हाला तारू शकते! 
प्रसिद्ध गुंतवणूक गुरु रे डॅलिओ म्हणतात, ‘जर तुमच्या गुंतवणुकीच्या ताफ्यात सोने नसेल, तर तुम्हाला इतिहास आणि अर्थशास्त्र दोन्हीची जाण नाही.’ कधी शेअर बाजार वाढ दर्शवितो, तर कधी सोने नवे उच्चांक गाठत चकाकत असते. शेअर बाजार नवे शिखर गाठत असताना ‘व्हॅल्युएशन’नुसार महाग झाल्याने शेअर बाजारातील गुंतवणुकीबरोबर, समतोल साधत गुंतवणूकदारांनी शेअरसारख्या खरेदी-विक्री करता येणाऱ्या ‘गोल्डबीज’ या एक्सचेंज ट्रेडेड फंडात अर्थात ‘गोल्डबीज’च्या स्वरूपात सोन्यातदेखील टप्प्याटप्प्याने खरेदी करणे आगामी काळासाठी फायदेशीर ठरू शकेल. अशा प्रकारे एकंदरीत शेअर बाजारात तेजीचा बोलबाला असताना गुंतवणूकदाराने उत्तम व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्येच टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याबरोबर सोन्यामध्ये देखील खरेदीचे धोरण ठेवून समतोल साधत गुंतवणुकीला ‘गोल्डन टच’ देणे हितावह ठरू शकेल. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे. 
(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com