शुभमुहूर्त दीर्घकालीन गुंतवणुकीचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhushan Godbole writes about Auspicious long term investment share market finance

गेल्या वर्षभरात शेअर बाजाराने जवळपास उणे तीन टक्के परतावा दिला

शुभमुहूर्त दीर्घकालीन गुंतवणुकीचा

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५९,३०७ अंशांवर तर ‘निफ्टी’ १७,५७६ अंशांवर बंद झाले. अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने गेल्या शुक्रवारी ७४८ अंशाची तेजी दर्शविल्याने या आठवड्याची सुरवात तेजीने होऊ शकते. आज २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजारात तासाभराचे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र होणार आहे. हिंदू नववर्ष अर्थात विक्रम संवत २०७९ चे स्वागत या निमित्ताने बाजाराकडून केले जाईल. यावेळी गुंतवणूकदारांनी कशा प्रकारे गुंतवणूक करावी हे आपण पाहूया. ‘मुहूर्त ट्रेडिंग’चा विचार करता सर्वप्रथम ज्या गुंतवणूकदारांनी यापूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करून सध्या नफा मिळविला आहे, त्यांनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवरील नफा हा काही प्रमाणात लक्ष्मीच्या रूपाने घरी आणणे योग्य ठरेल.

शुभमुहूर्तावर करा दीर्घावधीसाठी गुंतवणूक :

गेल्या वर्षभरात शेअर बाजाराने जवळपास उणे तीन टक्के परतावा दिला आहे. अल्पावधीमध्ये कोणत्याही कंपनीच्या शेअरचे भाव हे भावनाप्रधान होऊन मोठ्या प्रमाणात चढउतार दर्शवू शकतात. मात्र दीर्घावधीमध्ये कंपनीच्या गुणवत्तेवर तसेच कंपनीने केलेल्या आर्थिक प्रगतीचा बाजार वेध घेत असतो. यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घावधीमधील व्यवसाय वृद्धीची क्षमता आणि शक्यता लक्षात घेऊन खालील कंपन्यांचा शेअरमध्ये दीर्घावधीसाठी जोखीम लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीच्यादृष्टीने विचार करणे योग्य ठरू शकेल.

एचडीएफसी बँक (बंद भाव : रु. १४३८)

एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. इक्विटीवर उत्तम परतावा मिळवत सातत्यपूर्ण व्यवसाय वृद्धीसह विविध आर्थिक चक्रांमध्ये कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार एचडीएफसी बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली असून, तो १०,६०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने नमूद केल्यानुसार या तिमाहीत १२१ शाखांची भर पडली असून, आगामी काळात ५००हून अधिक शाखा उघडण्यात येणार आहेत. यापूर्वी जाहीर झालेल्या घोषणेनुसार आगामी काळात एचडीएफसी लिमिटेड आणि खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक एचडीएफसी बँक यांचे विलिनीकरण होणे अपेक्षित आहे. प्रस्तावित विलिनीकरणाला मंजुरीसाठी भागधारकांची बैठक आयोजित करण्यास ‘एनसीएलटी’ने मान्यता दिली आहे. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी बैठक बोलावली जाईल. एचडीएफसी म्हणजे हाउसिंग डेव्हलेपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनला गृहवित्त वितरणाचे भांडवल जमवण्यासाठी ठेवींवर अवलंबून राहावे लागते. मात्र एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांच्या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँकेकडे कमी व्याजाच्या ठेवींचा वाटा असल्याने एकत्रित होणाऱ्या व्यवसाय वृद्धीचा दोन्ही संस्थांना फायदा होणे अपेक्षित आहे. एकूणच बँकिंग क्षेत्रातील होणारी प्रगती, विलिनीकरण आणि व्यवसाय वृद्धीचा विचार करता एचडीएफसी बँकेच्या (शुक्रवारचा बंद भाव रु. १,४३८) शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

बर्जर पेंट्स (बंद भाव : रु. ५८५)

बर्जर पेंट्स ही भारतातील दुसरी सर्वांत मोठी पेंट कंपनी आहे. बर्जर तिच्या टॉपलाइन म्हणजेच एकूण विक्री पैकी ८० ते ८५ टक्के महसूल सजावटीच्या पेंट्समधून मिळवते. उर्वरित भाग औद्योगिक विभागातून येतो. पेंट्सबरोबरच ‘वॉटर प्रूफिंग अँड बिल्डिंग केमिकल’श्रेणीवर लक्ष केंद्रित करून महसूल वाढ करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेवून गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवत कंपनीने सातत्यपूर्ण व्यवसाय वृद्धीसह चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक लाभदायी ठरू शकेल.

बजाज फायनान्स लिमिटेड (बंद भाव : रु. ७,१९२ )

बजाज फायनान्स ही कंपनी मुख्यतः कर्ज देण्याच्या व्यवसायात गुंतलेली कंपनी आहे. जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार बजाज फायनान्स लि. या कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली असून तो २,७८१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने नमूद केल्यानुसार जानेवारी २०२३ पर्यंत कंपनी अॅपवरील सर्व उत्पादने आणि सेवांवर पूर्णपणे डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. प्रतिवर्ष सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत ही कंपनी कर्ज वितरणात गेल्या १० वर्षांमध्ये सर्वांत वेगाने वाढणारी कंपनी आहे. कंपनीच्या व्यवसाय वृद्धीची क्षमता आणि नवीन युगाच्या फिन-टेकमध्ये रूपांतरित होण्यासाठी कंपनी करत असलेली वाटचाल लक्षात घेता, सध्या हा शेअर किमतीच्या दृष्टीने महाग वाटत असला, तरी दीर्घावधीसाठी यातून उत्तम फायदा मिळू शकेल.