esakal | शेअर मार्केट : तिमाही निकालानंतर तेजीचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर मार्केट : तिमाही निकालानंतर तेजीचे संकेत

अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल देखील जाहीर होत आहेत, तर काही कंपन्यांबाबतीत ‘ब्रेकिंग न्यूज’देखील येऊन धडकत आहेत. अशा वेळेस कशा पद्धतीने ‘ट्रेडिंग’ किंवा गुंतवणूक करावी?

शेअर मार्केट : तिमाही निकालानंतर तेजीचे संकेत

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५१,५४४ अंशावर, तर ‘निफ्टी’ १५,१६३ अंशांवर बंद झाला. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी; तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतुदी पूरक ठरतील, असा विश्वास गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत व्यक्त केला. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडवारीनुसार, जानेवारीत महागाई दरात घसरण झाली आहे, तर डिसेंबरमधील औद्योगिक उत्पादन दराने  सुधारणा झाल्याचे लक्षात येत आहे. 

आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ४६,१६० ही ‘सेन्सेक्स’साठी महत्त्वाची आधार पातळी आहे. शेअर बाजार नवनवे उच्चांक गाठत आहे. अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल देखील जाहीर होत आहेत, तर काही कंपन्यांबाबतीत ‘ब्रेकिंग न्यूज’देखील येऊन धडकत आहेत. अशा वेळेस कशा पद्धतीने ‘ट्रेडिंग’ किंवा गुंतवणूक करावी?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले, तर मॅग्मा फिनकॉर्प लि. या कंपनीच्या शेअरचा भाव मे २०२० मध्ये फक्त रु. १२ च्या आसपास होता. पण गेल्या आठवड्यात या शेअरचा भाव रु. ९८ झाला. या कंपनीमध्ये आदर पूनावाला यांची कंपनी नियंत्रणाएवढी मोठी हिस्सेदारी घेण्याचा व्यवहार करीत असल्याचे वृत्त जाहीर झाल्यांनतर तर या शेअरचा भाव उड्या मारत ‘अप्पर सर्किट’ लावत वर गेला आहे. पूनावाला यांची व्यवहारपूर्ती झाल्यानंतर या कंपनीच्या भांडवलात लाक्षणिक वाढ होईल. या भांडवलाचा व्यवसायवृद्धीसाठी कंपनी कशाप्रकारे उपयोग करते, यावर कंपनीची आगामी काळातील वाटचाल अवलंबून असेल.

सक्सेस स्टोरी : उघडले ‘मोबाईल वॉलेटचे’ द्वार!

तेजीचा कल कोठे दिसतो?
आलेखानुसार, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी) लि., मुथूट फायनान्स या कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत.

एचडीएफसी लि. या कंपनीच्या शेअरने १३ जानेवारी २०२१ पासून मर्यादित पट्ट्यात चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात रु. २७७७ या अडथळा पातळीच्या वर रु. २७९१ ला बंद भाव देत मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. जोपर्यंत या शेअरचा भाव रु. २३६० या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते. तिमाही निकालानुसार कंपनीचा नफा रु. २९२५ कोटींवर पोचला आहे. आगामी काळात कंपनी देत असलेल्या गृहकर्जांत वाढ होणे अपेक्षित आहे. उत्तम व्यवसायवृद्धी केलेल्या; तसेच शेअरधारकांना देखील उत्तम परतावा दिलेल्या या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी दीर्घावधीसाठी मर्यादित गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुथूट फायनान्स या गोल्ड लोन वितरण क्षेत्रातील दिग्गज कंपनीने तिमाही निकालानुसार अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केल्याने गेल्या आठवड्यात या कंपनीच्या शेअरने जोरदार तेजी दर्शविली. आलेखानुसारदेखील रु. १२९८ या पातळीच्या वर रु. १३१५ ला बंद भाव देऊन या शेअरने तेजीचे संकेत दिले आहेत. जोपर्यंत या शेअरचा भाव रु. ९९९ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात रु. १४०५ या पातळीच्या वर देखील बंद भाव दिल्यास शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे सद्यस्थितीमध्ये तेजीचे व्यवहार करताना आलेखानुसार; तसेच फंडामेंटल्सप्रमाणे गुणवत्ता दर्शविणाऱ्या शेअरमध्ये ‘टेक्नो-फंडामेंटल ॲप्रोच’ ठेऊन मर्यादित गुंतवणूक करणे योग्य ठरू शकेल. 

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image