‘सेन्सेक्स’मध्ये गुंतवणूक कशी करावी?

‘सेन्सेक्स’मध्ये गुंतवणूक कशी करावी?

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ने अखेर ५०,००० अंशांना गवसणी घातली. आजवरच्या ‘सेन्सेक्स’च्या एकूण प्रवासाचा विचार करता, एक जानेवारी १९८६ रोजी स्थापन झालेल्या या निर्देशांकाने जानेवारी २०२१ मध्ये ५०,००० अंशांपर्यंत मजल मारली. गेल्या ३५ वर्षांत जवळजवळ ९१ पट म्हणजेच ९००० टक्के परतावा देणारी ही विक्रमी वाढ आहे. यामुळे गुंतवणूकदारांना याची भूल न पडली तरच नवल! मात्र, अशा विक्रमी वाढ दर्शविणाऱ्या ‘सेन्सेक्स’ किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी कोणते मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे, ते पाहू या. 

सर्वप्रथम गेल्या ३५ वर्षांत शेअर बाजारात झालेली वाढ ही दरवर्षी निर्धारित असा परतावा देत एका सरळ रेषेत झालेली नाही. कधी जोरदार तेजी, तर कधी मोठ्या प्रमाणात मंदी दर्शवत ही वाढ झालेली आहे. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना संयम; तसेच धैर्य असणे आवश्यक आहे. मागील ३, ५, १०, २० वर्षे अशा वेगवेगळ्या कालावधीमध्ये निर्देशांकाने वेगवेगळा परतावा दिला आहे. यामुळे फक्त मागील एका वर्षाचा किंवा तीन वर्षांचा विचार करून पुढील ३ ते ५ वर्षांसाठी गुंतवणुकीचे नियोजन करणे धोकादायक धरू शकते. 

‘व्हॅल्युएशन’ पाहूनच गुंतवणूक हवी 
दीर्घावधीत कंपन्यांच्या मिळकतीमध्ये होणाऱ्या वाढीला अनुसरून शेअर बाजार वाढ दर्शवत असला तरी मध्यम; तसेच अल्पावधीमध्ये शेअर बाजार भावनाप्रधान होऊन मिळकतीपेक्षा अतिवाढ किंवा अतिघसरण देखील दाखवतो. यामुळे आपण कोणत्या ‘व्हॅल्युएशन’ला गुंतवणूक करीत आहोत, यावर देखील परताव्याचे प्रमाण बदलते. 

जानेवारी २००८ मध्ये ‘सेन्सेक्स’ २१,४०० च्या आसपास होता. जानेवारी २००८ ते जानेवारी २०२१ पर्यंत ‘सेन्सेक्स’ने दुपटीपेक्षा जास्त परतावा दिल्याचे लक्षात येते. मात्र, २००८ च्या ऑक्टोबरमध्ये ‘सेन्सेक्स’ ८५०० अंशांवर होता. तेथून पाहिले, तर निर्देशांकाने पाच पट परतावा दिला आहे. जानेवारी २००८ मध्ये बाजार महाग ‘व्हॅल्युएशन’ला होता, तर ऑक्टोबर २००८ मध्ये बाजार स्वस्त ‘व्हॅल्युएशन’ला होता. जानेवारी २०२० मध्ये बाजाराचे ‘व्हॅल्युएशन’ महाग होते. ‘सेन्सेक्स’ ४१,१६३ अंशांवर होता. तेथून बाजाराने जानेवारी २०२१ पर्यंत ५०,००० अंशांपर्यंत मजल मारून २१ टक्के परतावा दिला आहे. मात्र, मार्च २०२० मध्ये ‘सेन्सेक्स’ सुमारे २५,००० ला असताना मध्यम ‘व्हॅल्युएशन’ला होता. तेथून बाजाराने जानेवारी २०२१ पर्यंत केवळ दहा महिन्यांत दुप्पट परतावा दिला आहे. यामुळे शक्य असल्यास ‘व्हॅल्युएशन’चा अभ्यास करून गुंतवणूक करावी आणि शक्य नसल्यास वॉरेन बफे म्हणतात, त्याप्रमाणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी बाजाराचा अंदाज घेत बसण्यापेक्षा दरमहा ‘सेन्सेक्स’ किंवा ‘निफ्टी’मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ‘इंडेक्स फंडा’त दीर्घावधीसाठी गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल. 

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com