Success Story: ‘ट्रॅक्टर क्वीन’मल्लिका श्रीनिवासन!

सुवर्णा येनपुरे-कामठे
Monday, 18 January 2021

खऱ्या आयुष्यातील ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहेत मल्लिका श्रीनिवासन! या ट्रॅक्टर चालविणाऱ्या नव्हे, तर ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ‘ट्रॅक्टर अँड फॉर्म इक्विपमेंट्स’ (टॅफे) या कंपनीच्या अध्यक्षा आहेत.

ट्रॅक्टर चालविणारी आर्ची पाहिल्यानंतर सर्वच ‘सैराट’ झाले होते. आर्चीचा तो लुक आजही आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र, खऱ्या आयुष्यातील ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहेत मल्लिका श्रीनिवासन! या ट्रॅक्टर चालविणाऱ्या नव्हे, तर ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ‘ट्रॅक्टर अँड फॉर्म इक्विपमेंट्स’ (टॅफे) या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्या देशातील सर्वांत प्रभावी महिलांपैकी एक आहेत. मल्लिका यांनी वाजवी दरात दर्जेदार ट्रॅक्टरची निर्मिती करीत जागतिक स्तरावर ख्याती मिळविली आहे. 

१९ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या मल्लिका या दक्षिण भारतातील उद्योजक ए. शीवसैलम यांच्या मोठ्या कन्या आहेत. मद्रास विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर, त्यांच्या वडीलांनी त्यांना ‘लिटरेचर’ शिकण्याचा सल्ला दिला. परंतु, स्वतःची वेगळी स्वप्न असणाऱ्या मल्लिका यांनी ‘लिटरेचर’ला प्रवेश न घेता, पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले. 

Success Story:आईस्क्रीम, बिस्कीट आणि मिसेस बेक्टर!

भारतात परतल्यानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी ‘टॅफे’मध्ये ‘जनरल मॅनेजर’ पदावर काम करायला सुरवात केली. त्या म्हणतात, ‘कौटुंबिक व्यवसायात प्रवेश कर, असा कोणताही दबाव माझ्यावर नव्हता. परंतु, मला त्यासाठी प्रोत्साहन मिळाले होते, हे निश्‍चित!’

कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सहजसोप्या रणनीती आखल्या. सुरवातीला त्यांनी शेतकऱ्यांना कसे ट्रॅक्टर हवे आहेत, हे जाणून घेतले. त्यासाठी त्यांनी देशभरात ग्राहक सेवा केंद्रे सुरू केले आणि ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद गांभीर्याने घेत, उत्पादनात बदल केला. मल्लिका या बाबतीत म्हणतात, की भारतीय शेतकरी आपला पैसा खूप विचारपूर्वक खर्च करतो. त्यामुळे आमच्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे ट्रॅक्टरचे अनेक वर्षांचे तंत्रज्ञान, डिझाइन आणि मॉडेल बदलणे. त्यांच्यामध्ये नवी वैशिष्ट्ये जोडणे, परंतु किंमत वाढू न देणे. नव्वदीच्या दशकात ट्रॅक्टर क्षेत्र मंदीच्या भोवऱ्यात सापडले. त्यावेळी इतर कंपन्यांनी ट्रॅक्टरची विक्री वाढविण्यासाठी डिलर्सवर दबाव आणला. परंतु, मल्लिका यांनी नफा पणाला लावून उत्पादन कमी केले. मंदीच्या काळातही कंपनी टिकवून ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हा कंपनीची उलाढाल ८६ कोटी रुपये होती, सध्या ती ९३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. ही देशातील दुसरी, तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर बनविणारी कंपनी आहे. जी कंपनी १९८५ मध्ये दरवर्षी केवळ ४००० ट्रॅक्टर बनवत होती, ती कंपनी सध्या १,५०,००० हून अधिक ट्रॅक्टर वर्षाला बनवीत आहे. मल्लिका यांच्या कार्यासाठी २०१४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरविण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story Tractor Queen is Mallika Srinivasan