बफे नीती यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhushan Godbole writes share market investment Buffett Strategy is key to successful investing

अल्पावधीतील कठीण काळात टिकून ज्या कंपन्या दीर्घावधीमध्ये मिळणाऱ्या संधीचा लाभ घेत व्यवसायवृद्धी करतात, अशा कंपन्यांसाठी गुंतवणूक गुरू वॉरन बफे म्हणतात

बफे नीती यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५८, ८३३ अंशावर तर ‘निफ्टी’ १७,५५८ अंशांवर बंद झाले. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी चलनवाढ रोखण्यासाठी गरजेनुसार व्याजदर वाढवत ठेवण्याचे संकेत दिल्याने गेल्या शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डो जोन्स’ने एकाच दिवसात तब्बल १००८ अंशांची घसरण दर्शविली. त्यामुळे या आठवड्याच्या आरंभी आतंरराष्ट्रीय बाजारातून मंदीचे संकेत मिळू शकतात. आगामी काळात बाजारात घसरण झाल्यास दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणुकीची संधी ओळखून भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने खरेदीचे धोरण स्वीकारणे योग्य ठरू शकेल. येत्या ३० ऑगस्टला दिग्गज गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सध्याच्या परिस्थितीमध्ये गुंतवणूक करताना वॉरन बफे यांच्या ‘बफे नीती’चा विचार करूया.

‘आम्ही कमी किंवा कोणतेही कर्ज नसताना इक्विटीवर चांगला परतावा मिळवणाऱ्या व्यवसायांना प्राधान्य देतो. तसेच व्यवसाय चांगला चालला तर शेअर व्यवसाय वृद्धीचे अनुकरण करतो.

-वॉरन बफे

गेल्या १० ते १५ वर्षांचा विचार करता एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, अॅस्ट्रल, पी आय इंडस्ट्रीज, डिव्हीज लॅब, टायटन आदी अनेक कंपन्यांनी कर्जाचे प्रमाण कमी ठेवून व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसाय वृद्धी केली. अशाप्रकारे व्यवसाय वाढवलेल्या कंपन्यांच्या शेअरनीदेखील दीर्घावधीमध्ये उत्तम परतावा दिल्याचे लक्षात येते. कर्ज वितरण तसेच वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरनी दीर्घकाळात व्यवसाय वृद्धी, बुक व्हॅल्यू ग्रोथ म्हणजेच प्रति शेअर पुस्तकी मूल्यात होणाऱ्या वाढीचे अनुसरण केल्याचे सहज लक्षात येते. यामुळे दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना बाजारात अल्पावधीमध्ये होणारी पडझड ही दीर्घावधीसाठी संधीच निर्माण करत असते.

अल्पावधीतील कठीण काळात टिकून ज्या कंपन्या दीर्घावधीमध्ये मिळणाऱ्या संधीचा लाभ घेत व्यवसायवृद्धी करतात, अशा कंपन्यांसाठी गुंतवणूक गुरू वॉरन बफे म्हणतात, की वेळ हा उत्तम कंपनीचा मित्र असतो. व्हॅल्युएशनचा विचार करता वॉरन बफे नीतीनुसार स्वस्त किमतीत वाजवी कंपनी घेण्यापेक्षा वाजवी किमतीत उत्तम कंपनी विकत घेणे फार चांगले आहे. १९८५ मध्ये बफे यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रानुसार, यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली म्हणजे भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करत असलेल्या कंपन्यांचे शेअर जेव्हा अंतर्निहित व्यावसायिक मूल्यांपेक्षा सवलतीवर मिळत असतात तेव्हा खरेदी करणे.

बाजारात अस्थिरतेचे वातावरण असताना केवळ शेअरच्या किमतीमधील चढ-उतारांकडे बघून गोंधळून जाण्यापेक्षा त्या कंपनीच्या व्यवसायातील प्रगतीचा आढावा घेणे अत्यंत आवश्यक असते. सर्वप्रथम कंपनीची दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची संधी लक्षात घेऊन कंपनीचे मूल्याकंन करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर शेअर बाजारात मूल्यांकनाच्या तुलनेत कंपनीच्या शेअर मुबलक मार्जिन ऑफ सेफ्टीसह स्वस्त दरात मिळत असल्यास गुंतवणुकीची संधी मिळते.

या शेअरचा विचार करा...

सध्या दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शक्यता लक्षात घेता पोर्टफोलिओमध्ये एचडीएफसी बँक लिमिटेड (शुक्रवारचा बंद भाव रु. १४६५), सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड (शुक्रवारचा बंद भाव रु. ४८२), पीआय इंडस्ट्रीज (शुक्रवारचा बंद भाव रु. ३३७६), बर्जर पेंट्स (शुक्रवारचा बंद भाव रु. ६६०), डिव्हीज लॅब (शुक्रवारचा बंद भाव रु.३५८८), बजाज फायनान्स (शुक्रवारचा बंद भाव रु.७०६२) आदी कंपन्यांच्या शेअरचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Web Title: Bhushan Godbole Writes Share Market Investment Buffett Strategy Is Key To Successful Investing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..