लांडगा आला रे शेवटी...! 

भूषण महाजन
Monday, 25 January 2021

शेअर बाजार कोसळणार, असे भाकीत ‘सेन्सेक्स’ ४३,००० पार केल्यापासून रोजच वर्तविले जात होते. शेअर बाजार मात्र या तज्ज्ञांकडे पूर्ण दुर्लक्ष करून वरचे टप्पे ओलांडत होता.

गेले दोन महिने लांडगा आल्याची आवई उठत होती. सर्व गुणोत्तरे ओरडून सांगत होती, की भारतीय शेअर बाजार आता स्वस्त राहिले नाहीत. किंमत/उपार्जन (पीई, पीबी) अति महाग होत चालले आहे. वॉरेन बफे सूचक (मार्केट कॅप टू जीडीपी रेशो) नवी खरेदी करताना सावधानतेचा इशारा देत होता. शेअर बाजार कोसळणार, असे भाकीत ‘सेन्सेक्स’ ४३,००० पार केल्यापासून रोजच वर्तविले जात होते. शेअर बाजार मात्र या तज्ज्ञांकडे पूर्ण दुर्लक्ष करून वरचे टप्पे ओलांडत होता. सर्वसामान्य गुंतवणूकदारही तेजीला निर्ढावला होता. अशा वेळी ‘सेन्सेक्स’ने ५०,००० ची महत्त्वाची पातळी ओलांडली आणि त्याच्या फटाक्यांचा आवाज विरायच्या आतच बाजार कोसळला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विक्रमी पातळी गाठल्यानंतर शेअर बाजार घसरू लागला. आता ‘सेन्सेक्स’ पुन्हा २५,००० वर येणार, की तेजीमध्ये हमखास येणारे हे ‘करेक्शन’ आहे? आता संपलं का सगळं?’ या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आहे ‘इंडिया व्हिक्स’! म्हणजे बाजाराची अस्थिरता किंवा मंदीवाल्यांचे वर्चस्व यांचे मोजमाप करणारा निर्देशांक. शेअर बाजारात मोठी वध-घट होते, तेव्हा ‘इंडिया व्हिक्स’ वाढू लागते (विशेषतः घट होते तेव्हा). या निर्देशांकाची पातळी ३० अंशांपार गेली तर तो लाल दिवा समजावा, असे इतिहास सांगतो (शुक्रवारचा बंद २२.४ आहे). बाजारात गेले दोन दिवस झालेली पडझड ही नफावसुली, ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला लागलेली आग व त्यामुळे पसरलेली घबराट याचे मुख्य कारण असू शकते. याचा अर्थ सोमवारी शेअर बाजार खाली येतील का... तर येऊ शकतात, येतीलच असे नाही. पण पुन्हा वरही जाऊ शकतात. कारण हा महत्त्वाचा निर्देशांक अजूनही मोठी घसरण दर्शवीत नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज माझ्याकडचे सर्व शेअर किंवा म्युच्युअल फंड विकतो व बाजार खाली आला, की पुन्हा विकत घेईन, असे म्हणणेही तेवढेच फोलपणाचे आहे. तसे करण्यासाठी लागणारे कौशल्य आपल्याकडे आहे का, हा पहिला प्रश्न! सर्व गुंतवणूकदारांच्या एकत्रित बुद्धीकौशल्यावर शेअर बाजार नेहमीच मात करतो. अशावेळी पश्चात्ताप होण्याची शक्यताच अधिक असते. 

सर्वप्रथम आपल्या गुंतवणुकीतील प्रत्येक शेअरचा लेखाजोखा घेत, आपण ते का घेतले आहेत, हे तपासले पाहिजे. ज्या अपेक्षेने किंवा जे लक्ष्य (टार्गेट) मनात होते, ते आले असल्यास अधिक लोभ न धरता नफा वसूल करावा. त्यातील दीर्घकाळासाठी घेतलेले, चांगले व्यवस्थापन व गुणवत्ता असलेले शेअर बाजूला करावेत, कारण त्यातूनच मोठी संपत्ती निर्माण होणार आहे. उलट, बाजाराची घसरण काही काळ टिकली, तर त्यात प्रत्येक खालच्या भावाला खरेदीच करावी. अल्पकाळासाठी किंवा ‘ट्रेडिंग’साठी अथवा ‘टीप’मधून घेतलेले शेअर ‘स्टॉपलॉस’ झाल्यास अथवा ‘टार्गेट’ गाठल्यास थोडा नफा/तोटा सहन करून विकून टाकावेत. बाजाराच्या या पातळीवर ‘फ्युचर्स’च्या नादी न लागणे सर्वोत्तम! 

शेअर बाजार खाली येऊ शकतो का? 
- महागाईचा दर वाढल्यास. 
- ‘जीडीपी’चा वृद्धी दर कमी होत आहे, हे लक्षात आल्यास. 
- कोरोना विषाणूसारखा असाच एखादा ‘ब्लॅक स्वॉन’ इव्हेंट पुन्हा झाल्यास. 

पण या तिन्ही शक्यता धूसर आहेत. त्यामुळे कदाचित थोडीफार घसरण होईल (५ ते १० टक्के); पण मोठी मंदी येणार नाही, हे गृहीत धरावे. युरोप व जपानचे व्याजदर शून्याखाली आहेत. तेथील मोठा पैसा हा अधिक परताव्यासाठी भारत किंवा चीनकडे वळणारच. सतत येणारा पैसा, जगातील शून्य व्याजदर आणि आपल्याकडील सरकारी प्रोत्साहनाने सुधारणारी अर्थव्यवस्था हे शेअर बाजार वर जाण्यासाठी योग्य रसायन आहे. 

बाजाराची चाल सतत बदलत असते. हा बाजार सतत नवे मोहरे शोधत असतो. २००८ मध्ये आपला शेअर बाजार अत्युच्च पातळीवर असताना (८ जानेवारी) हिरो मोटर्स रु. ६५०, सन फार्मा रु. १०५ आणि लुपिन रु. १२१ होता. पुढे बाजार कोसळला, पण पुढील ३-४ वर्षांत हिरो मोटर्स रु. ३०००, सन फार्मा रु. १२०० आणि लुपिन रु. २००० ला जाऊन पोचले. 

मथितार्थ असा, की आपण ठराविक आकर्षक कंपन्यांत व त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवितो, अख्ख्या शेअर बाजारात नाही. याची जाणीव असली तर शेअर बाजाराच्या पातळीची व नेमेची येणाऱ्या अल्प ‘करेक्शन’ची भीती वाटणार नाही. 

तेव्हा, बेभानपणे नाही; पण सावधपणे शेअर बाजाराकडे बघायला काय हरकत आहे? 
(लेखक शेअर बाजाराचे ज्येष्ठ विश्लेषक आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan mahajan writes article about share market