संशय का न मनी यावा?

शेअर बाजारात भरपूर नफा मिळण्याच्या आशेने छोटे गुंतवणूकदार आपली सर्व कमाई घालत असतात, मात्र शेअर बाजारातील व्यवहारांचा त्यांचा सखोल अभ्यास असतोच असे नाही.
Share Market
Share Marketsakal
Summary

शेअर बाजारात भरपूर नफा मिळण्याच्या आशेने छोटे गुंतवणूकदार आपली सर्व कमाई घालत असतात, मात्र शेअर बाजारातील व्यवहारांचा त्यांचा सखोल अभ्यास असतोच असे नाही.

शेअर बाजारात भरपूर नफा मिळण्याच्या आशेने छोटे गुंतवणूकदार आपली सर्व कमाई घालत असतात, मात्र शेअर बाजारातील व्यवहारांचा त्यांचा सखोल अभ्यास असतोच असे नाही. त्यामुळे अनकेदा शेअर बाजारातील खेळींचा त्यांना अंदाजही येत नाही. बहुतेकांची मानसिकता ‘मुकी बिचारी कुणीही हाका’, अशी असते. कोणताही संशय न घेता ते गुंतवणूक करत असतात आणि त्यात त्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना सतर्कता बाळगणे महत्त्वाचे असते.

शेअर बाजारात ‘सेंटिमेंट’ अत्यंत महत्त्वाचे आहे, हे आपण जाणतोच. एक चांगली बातमी किंवा वाईट बातम्यांचा अतिरेक मंदीचे तेजीत रुपांतर करतो आणि एकदा का तेजीचे रसायन पक्के जमले, की कुठलाही आपपरभाव न ठेवता सारा बाजारच वरचे भाव दाखवायला लागतो. सर्वसामान्य गुंतवणूकदार अडकतो तो येथेच. हर्षद मेहताच्या काळात फक्त त्याचा स्पर्श पुरायचा. मग मागचा-पुढचा विचार न करता पंटर्स त्यात स्वत:ला झोकून द्यायचे. कर्नाटक बॉल बेअरिंग्ज, माझदा लीझिंग किती नावे सांगावीत? नुकत्याच मराठीत भाषांतरित झालेल्या ‘द स्कॅम’ या पुस्तकात सर्व सविस्तर माहिती आहे.

थोडक्यात काय, बंद पडलेल्या कंपन्या, शेअर बाजारात धूळ खात असलेले त्यांचे भाव, याकडे स्वस्त म्हणून जत्रेतील खेळण्यासारखे गुंतवणूकदार आकृष्ट व्हायचे. हे मर्म हर्षद व त्याच्या विश्वासातील ब्रोकर ओळखून होते. मग सुरू व्हायचे सर्क्युलर ट्रेडिंग आणि शेअरचा भाव वाढवण्याचा प्रवास. बरेचदा यात प्रवर्तकही सामील असायचे. सतत वरचे सर्कीट लागून शेअरचे भाव वर जायचे आणि ते का लागत आहे, याचा विचार न करता, ‘मुकी बिचारी कुणी हाका’, या मेंढरांच्या मानसिकतेने छोटा गुंतवणूकदार या गारुडाच्या मागे धावत असे. प्रवर्तकांचा किंवा ऑपरेटरचा योग्य भाव आला, की सर्कीट उठायचे, गुंतवणूकदार दिवसभर शेअर मिळाले याचा आनंद साजरा करायचे आणि दुसऱ्या दिवसापासून खालचे सर्कीट सुरू व्हायचे. या चक्रातून भरडला गेल्यावर पुन्हा तो गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे बघायचादेखील नाही. प्रवर्तकही अनेक क्लृप्त्या वापरायचे. भाव अस्मानात गेला, की लाभांशासाठी बुक बंद जाहीर करायचे. शेअरची प्रमाणपत्रे कागदी असल्यामुळे नावावर चढवायला कंपनीकडे पाठवायला लागायचे. वाघाच्या गुहेत गेलेला ससा एकवेळ परत येईल, पण असे शेअर भाव वर असेपर्यंत गुंतवणूकदाराच्या हाती पडत नसत.

शेअर बाजारामध्येही ‘बी’ ग्रुपच्या शेअरची डिलिव्हरी पटावट (दर पंधरा दिवसांनी विकलेल्या व घेतलेल्या शेअरची देवाणघेवाण) १०० टक्के होत नसे. दरम्यान, २००४ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शेअरविक्रीतून होणारा दीर्घकालीन नफा करमुक्त केला व हा दीर्घकालावधीही एक वर्षावर आणला. मग काय? प्रचंड मोठा काळा पैसा स्वच्छ करण्याचे एक दालनच खुले झाले. भारतीय हुशारीला आणि जुगाडाला जगात तोड नाही. अधिक तपशिलात जात नाही, पण शेअर बाजार काही मोजक्या मंडळींच्या हातातले खेळणे झाला. मात्र, त्यातही विचारपूर्वक शेअर निवडून नफा मिळवणारे गुंतवणूकदार होतेच. पुढे ‘सेबी’ आली, अनेक कायदे आले व पुढील केतन पारेखच्या शेअर गैरव्यवहारानंतर ते अधिक कडक झाले. कागदी शेअर जाऊन इलेक्ट्रॉनिक (डी-मॅट) शेअर आले. आठवड्याची पटावट संपली. रोजच्या रोज व्यवहार पूर्ण करण्याची सक्ती आली. त्यामुळे पूर्वीच्या नव्वद टक्के गैरव्यवहारांना आळा बसला. पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात तेच खरे. आजही अत्यंत कल्पक अशी पळवाट शोधून शेअरचे भाव वर नेणे, त्यातील स्वत:चे भांडवल काढून घेणे हे उद्योग चालू आहेतच.

याबाबतीतील वाचकांच्या स्मरणात असतील अशी दोन उदाहरणे येथे देत आहे-

मनपसंद बेव्हरेजेस -

पहिली कंपनी डोळ्यासमोर येते ती मनपसंद बेव्हरेजेस. एकेकाळी गुंतवणूकदार व फंड्स दोघांचा लाडका असलेला हा शेअर आता दैन्यावस्थेत ५.५ रुपयांना मिळत आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये ५०० रुपयांवर असलेला याचा भाव इतका खाली कसा व का आला? शीतपेयांच्या बाजारात किती स्पर्धा आहे ते नव्याने सांगायला नकोच. कोक व पेप्सी हे प्रमुख स्पर्धक तर आहेतच, पण अजूनही पार्ले टिकून आहे. पार्लेची मक्तेदारी अजून पूर्णपणे मोडीत निघालेली नाही. ‘कोक’ला थम्स-अप, लिम्का यासारखे ब्रँडस विकल्यावरही ‘फ्रुटी’च्या जोरावर पार्ले आज उभी आहे. शीतपेयाच्या बाजारपेठेत ७० टक्के हिस्सा कोक व पेप्सीचा आहे. उर्वरित ३० टक्के बाजारात पार्लेखेरीस, मनपसंदही कार्यरत आहे. वरुण बेव्हरेजेस ही कंपनी पेप्सीसाठी शीतपेये तयार करते व विकते आणि त्यांचे चांगले चालले आहे.

बडोदास्थित मनपसंद, मँगो सीप व फ्रुट्स अप या नावाने शीतपेये विकते (किंवा विकत असे, असे म्हणूया) २०१२ ते २०१६ या दरम्यान कंपनीची विक्री ८५ कोटींवरून ५५० कोटींवर गेली. कंपनीने २०१५ मध्ये प्राथमिक समभाग विक्रीतून ४०० कोटी रुपये जमा केले. पार्लेच्या फ्रुट ज्यूसची विक्री तुलनेने १२९० कोटी होती. मनपसंदची नोंदीत विक्री वाढत वाढत मार्च १८ मध्ये ९४८ कोटींवर गेली व त्याबरोबर शेअरही. पण ‘दाल मे कुछ काला है’ हे बाजाराला समजायला सुरवात झाली होती. शेअर जुलै १८ पर्यंत १५० रुपये झाला होता. डिलरना पार्लेहून १० टक्के अधिक कमिशन देऊनही मनपसंद आपल्या शीतपेयांची विक्री कुठे व कशी करते हे गुलदस्त्यात होते. बाजारात कुठेही मँगो सीपची जाहिरात दिसायची नाही की कुठे मिळते, तेही कळायचे नाही. पार्ले, कोक, पेप्सीसारख्या भल्याभल्यांनाही जे जमले नाही ते या नव्या कंपनीने जमवले असे भासले. खोलात जाऊन चौकशी केल्यावर, कंपनीने सांगितले, की आमचा माल ग्रामीण भागात खपतो आणि आयआरसीटीसीचे टेंडरही आम्हाला मिळाले आहे. प्रत्यक्षात तिथली विक्रीही नगण्यच होती. प्राथमिक समभाग विक्रीनंतर लागलीच वाढत्या बाजाराचा फायदा घेऊन कंपनीने ‘क्युआयपी’ करून अजून ५०० कोटी रुपये जमा केले. हे पैसे आम्ही आमच्या मर्जीनुसार कंपनीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खर्च करू, असे थातुरमातुर कारण पैसे उभे करताना कंपनीने दिलेले होते.

संपूर्ण पर्दाफाश झाल्यावर पुढील दोन वर्षांत विक्री ९४८ कोटींवरून ४१ कोटींवर आली आणि शेअर १०० रुपयांवर. त्याआधीच प्रवर्तकांनी हंसराज नावाच्या कंपनीत हीच शीतपेये विकायला सुरवात केली होती. खरेतर छोट्या गुंतवणूकदाराला काही तोटा नोंदवून येथेही बाहेर पडता आले असते. पण दीर्घ पल्ल्यात ‘सर्वच’ शेअर वर जातात हे मिथक प्राणापलीकडे जपल्यामुळे, आपला तोटा कुरवाळत गुंतवणूकदार सहानुभूती शोधत फिरत आहे. असो. मुख्य मुद्दा आपण डोळे उघडे ठेऊन गुंतवणूक करणे हा आहे.

पीसीजे ज्वेलर्स -

दुसरे उदाहरण आहे सोने-चांदी-हिऱ्यांचा उद्योग असलेली कंपनी पीसीजे ज्वेलर्स. दिल्लीतील करोलबाग येथे कंपनीने एप्रिल २००५ मध्ये प्रथम शोरूम उघडून व्यवसायात पदार्पण केले. त्यानंतर शिल्पा शेट्टी, रवीना टंडन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या हातून नव्या नव्या शोरूमचे उदघाटन करून ही कंपनी सतत चर्चेत राहिली. आम्ही १७ राज्ये आणि ६७ शहरांतून ग्राहकसेवा देणार आहोत, हे मिशन त्यांनी जाहीर केले! २०१५ मध्ये ‘नॅस्डॅक’ येथे सूचीबद्ध असलेल्या ब्लू नाईल या ऑनलाइन कंपनीबरोबर भागीदारी करीत असल्याचे त्यांनी कळवले. ब्लू नाईलचा शेअर आजही ४० डॉलरला मिळतो, पण कंपनीच्या संकेतस्थळावर ‘पीसीजे’चा उल्लेख नाही.

आता कंपनीचा भाव बघू. २०१३ मध्ये ७७-७८ रुपयाला मिळणारा हा शेअर निरनिराळ्या बातम्यांच्या पाठीवर स्वार होऊन जानेवारी १८ मध्ये ५८७ रुपयांचा उच्चांक गाठता झाला. याचे दर्शनी कारण म्हणजे २०१३ मध्ये २९१ कोटी रुपये असलेला नफा २०१८ मधे ५३७ कोटींवर गेला. आता तुम्ही म्हणाल, यात काय संशय घेण्यासारखे आहे? नफा वाढला तसा बाजारभाव वाढला. नफा वाढला असला तरी व्यवस्थापनाने लाभांश चार टक्क्यांवर आणला होता. हे त्यांनी २०१७ च्या वार्षिक निकालानंतर निव्वळ नफा ४२१ कोटी असतानाच केले होते, पण कुणालाही कुठलीही शंका आली आली नाही. त्या एका वर्षात (२०१७-१८) भाव दुप्पट झाला, २५१ रुपयांवरून ५०० च्या वर गेला. गुंतवणूकदार बातम्यांपलीकडे जात नाहीत हेच खरे.

खरी मेख यापुढे आहे. मार्च १७ नंतर मार्च १८ मध्ये नफा ४२१ कोटींवरून ५३६ कोटींवर जाऊनही लाभांश चार टक्केच होता. मार्च १७ रोजी कंपनीने ताळेबंदात ४१८७ कोटी आणि मार्च १८ मध्ये ५२५८ कोटींचा स्टॉक दाखवला. पाच हजार कोटींचे हिरे-जवाहीर कसे दिसते, ते म्या पामराला कळत नाही. ही अलिबाबाची गुहाच असावी. त्यावर्षीची विक्री ८-९ हजार कोटी आणि सोन्यानाण्याचा जवाहिरांचा साठा ५००० कोटी? कसा कोणाचा विश्वास बसला कळत नाही. लेखा परीक्षक, कर्ज देणाऱ्या बँका (११०० कोटींचे कर्ज होते त्यावेळेस) या सर्वांनी हे पाहिलेच असेल. त्यानंतर ५८७ रुपयांवरून हा शेअर गडगडत खाली येऊन जून २० मध्ये १६ रुपयांवर येऊन थांबला व आता पुन्हा रोज वर जात आहे. आजही म्युच्युअल फंडांकडे १.५ टक्के भांडवल आहे. कदाचित कंपनीचे व्यवहार आता जास्त पारदर्शक झाले असावेत. ‘सेबी’ने कंपनीशी संबंधित चार व्यक्तींवर कारणे दाखवा नोटीस बजावून दंड वसूल केला आहे व तो गुंतवणूकदार संरक्षण निधीत जमा केला आहे. असे असूनदेखील बाजारभाव १६ वरून आज ६९ रुपयांपर्यंत पोचला आहे. आता संशय घ्यायचा नाही तर केव्हा? स्वत:च्या जबाबदारीवरच येथे नफा-तोटा खिशात टाकायचा की नाही, ते ठरवावे. सुज्ञास अधिक काय सांगावे?

अशी अनेक संशयास्पद उदाहरणे आहेत. वक्रांगी,ऑप्टो सर्किट्स, सदर्न हर्बल्स किती नावे घ्यावी? छोट्या गुंतवणूकदारांनी मिड व स्मॉल कॅप शेअर गुंतवणुकीसाठी शोधतांना सूक्ष्मपणे अभ्यास करायलाच हवा. आजकाल ‘गुगल’मुळे माहितीचा अतिरेक झाला आहे. दिवसभर दृकश्राव्य माध्यमांच्या नादी लागण्यापेक्षा काही वेळ माहिती संग्रहित करण्यात घालवलेला इष्ट! किमान निरागसतेमुळे झालेला तोटा तरी टळेल.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी काही सावधगिरीच्या सूचना

१. व्यवस्थापन चोखच हवे. प्रवर्तकांचे नाव नवे असल्यास त्या नावाचा इतिहास बघावा. आजकाल इंटरनेटवर सर्व माहिती मिळते.

२. नवीन समभागविक्री असल्यास येणाऱ्या भांडवलाचे कंपनी व प्रवर्तक काय करणार आहेत, ते बघितलेच पाहिजे.

३. कंपनी जोरदार नफा दाखवत आहे, पण लाभांश देत नाही, हा लाल सिग्नल आहे. बरेचदा कंपन्या लाभांशाऐवजी बोनस शेअर देतात. हा देखील ‘संशय का न यावा’ असाच प्रकार आहे. हे प्रमेय सहकारी बँकांनाही लागू आहे.

४. विक्री वाढत असेल आणि त्याच प्रमाणात येणेकरीही वाढत असतील किंवा मालाचा स्टॉक वाढत असेल तरी लाल सिग्नल समजावा. (सदर्न हर्बलची सर्व विक्री दीर्घ कालावधीच्या क्रेडिटवर होती. जेवढी विक्री तेवढेच डेटर)

५. नफ्याचे रुपांतर रोखीच्या प्रवाहात होते आहे अथवा नाही हे बघायला हवे, पण ते प्रत्येकच गुंतवणूकदाराला जमेलच असे नाही. किमान भांडवल धंद्याखेरीज कुठे इतरत्र वळवले आहे का, हे तरी बघावे.

६. परदेशी कंपनीचे आग्रहण हा भांडवल कंपनीबाहेर उपसण्याचा एक मार्ग आहे. व्यवस्थापनात मान्यवर नाव नसेल तर संशय आलेला बरा!

७. वरील संशयास्पद बाबी असूनदेखील शेअर रोज नवे वरचे सर्कीट लावत असेल तर ते लाल निशाणच आहे. किंबहुना रोज वरचे सर्कीट लावणाऱ्या शेअरपासून दूर राहणे (कितीही मोह झाला तरी) आर्थिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहे.

८. प्राईस डिस्कव्हरी अत्यंत महत्त्वाची आहे. (रोजच्या खरेदी-विक्रीतून दिवसअखेरपर्यंत शेअर बाजार त्यादिवशीची शेअरची किंमत ठरवीत असतो) वरचे सर्कीट लागले तर विक्री करणारा सर्वसामान्य माणूस एक दिवस थांबायचे ठरवतो, त्यामुळे प्राईस डिस्कव्हरी होत नाही.

या विषयावर बरेच काही लिहिता येईल. काही प्रवर्तक स्वत:च्याच कंपनीला ओरबाडून आपला खिसा भरतात, हे सत्य समजून घेतले व त्यापासून दूर राहिले तर पदरी निराशा येणार नाही. याबाबतीत व्यवस्थापनाला एकदा डाग लागला तर तो कायमचाच समजला पाहिजे. येथे कुणीही वाल्याचा वाल्मिकी होत नाही.

(लेखक भांडवली बाजाराचे विश्लेषक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com