#BoycottTanishq ट्रेंडमुळे टायटनच्या शेअर्समध्ये घसरण

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

ऑक्टोबर महिना मोठा सणासुदीचा आहे. या पार्श्वभूमीवर तनिष्क त्याच्या नव्या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तनिष्कच्या जाहिरातीचा व्हिडिओ येताच बरेच नेटकरी त्याच्यावर तुटून पडले होते.

नवी दिल्ली: मंगळवारी सोशल मिडीयावरील #BoycottTanishq ट्रेंडने टायटन कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. या ट्रेंडमुळे टायटनच्या शेअरच्या किंमतीत 2.58 टक्क्यांची घसरण होऊन कंपनीचे शेअर्स 1224.35 पर्यंत आले होते. 

तनिष्क हा टाटा समूहाचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड आहे. यापुर्वीच्या सत्रात टायटनच्या शेअरची किंमत 1256 वर बंद झाली होती. पण #BoycottTanishq ट्रेंडमुळे ही किंमत मंगळवारी 1224 खाली येऊन बंद झाली होती. टायटनचे बाजार भांडवल 1.09 लाख कोटी रुपये आहे. पण बुधवारी भांडवली बाजारात टायटनचे शेअर सौम्य प्रमाणात वाढून 1230 पर्यंत गेले आहेत.   

ऑक्टोबर महिना मोठा सणासुदीचा आहे. या पार्श्वभूमीवर तनिष्क त्याच्या नव्या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तनिष्कच्या जाहिरातीचा व्हिडिओ येताच बरेच नेटकरी त्याच्यावर तुटून पडले होते. या व्हिडओला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. तनिष्कच्या या जाहिरातीत एक हिंदू मुलगी एका मुस्लिम कुटुंबात लग्न करताना दाखवण्यात आली आहे. ही जाहिरात 45 सेकंदांची आहे.

सासू सुनेचे प्रेम ठरले लव जिहादचे कारण; तनिष्कच्या  ''त्या'' जाहिरातीवर बंदी

या जाहिरातीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर #BoycottTanishq ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला होता. त्यामुळे कंपनीचे शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसले आहे. मात्र, हा वाद वाढल्यानंतर तनिष्कने हा व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवरून काढून टाकला आहे. वादग्रस्त जाहिरात मागे घेतल्यानंतर कंपनीने नंतर ट्विटरवर याची माहितीही दिली आहे.

...आणि भाजपवाले म्हणाले, तुम्ही Dream-11 वर टीम बनवा, आपची खोचक टीका

एक महिला आपल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी तयार होऊन जात असून तिला तिची सासू सगळ्यांसमोर घेऊन येते. तिच्य़ा सासूने सलवार परिधान केला आहे. अशावेळी तिची सून तिला तुमच्या घरात अशाप्रकारचा कार्यक्रम करण्याची रील नसेल हे सांगते. त्यावेळी तिची सासू तिला असे जरी नसले तरी मुलीला आनंदी ठेवण्याची रीत तर प्रत्येक घरातच असते. असे सांगते. हे या जाहिरातीत दाखविण्यात आले आहे. मात्र ही जाहिरात लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावरुन #BoycottTanishq चा इशारा दिल्याने  आता ही जाहिरात युट्युबवरुन काढून टाकण्यात आली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott Tanishq trend on social media impacts on shares of Titan Company