शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'

पीटीआय
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पातील भांडवली नफ्यावरील कराच्या घोषणेमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स शुक्रवारी 839 अंशांनी कोसळला. सेन्सेक्‍समध्ये एक दिवसात झालेली ही अडीच वर्षांतील सर्वांत मोठी घसरण आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 10 हजार 800 अंशांच्या पातळीखाली बंद झाला. 

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पातील भांडवली नफ्यावरील कराच्या घोषणेमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स शुक्रवारी 839 अंशांनी कोसळला. सेन्सेक्‍समध्ये एक दिवसात झालेली ही अडीच वर्षांतील सर्वांत मोठी घसरण आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 10 हजार 800 अंशांच्या पातळीखाली बंद झाला. 

केंद्रीय अर्थसंकल्पात काल (ता.1) शेअर बाजारातील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर दहा टक्के कर आकारण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, म्युच्युअल फंडांतील प्राप्तिवरही दहा टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. याचे पडसाद कालच शेअर बाजारात उमटले होते. शेअर बाजारात काल सुरू झालेला विक्रीचा मारा आजही कायम राहिला. यातच पतमानांकन संस्था 'फिच'ने कर्जाच्या जादा बोजामुळे भारताच्या पतमानांकनात सुधारणा करणे अवघड असल्याचे सूतोवाच केल्याने गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले. 

सेन्सेक्‍स आज 839 अंश म्हणजेच 2.34 अंशांनी घसरून 35 हजार 66 अंशांवर बंद झाला. मागील अडीच वर्षांत सेन्सेक्‍समध्ये एक दिवसात झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. याआधी 24 ऑगस्ट 2015 रोजी सेन्सेक्‍समध्ये 1 हजार 624 अंशांची घसरण झाली होती. प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभगांवर आज विक्रीचा दबाव राहिला. निफ्टीही 256 अंश म्हणजेच 2.33 अंशांनी घसरून 10 हजार 760 अंशांवर बद झाला. आज दिवसभरात निफ्टी 10 हजार 736 या नीचांकी पातळीपर्यंत खाली आला होता. 
काल अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तुटीचे उद्दिष्ट एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) 3.5 टक्‍क्‍यांवर नेले. याआधी हे उद्दिष्ट 3.2 टक्के होते. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 358 कोटी रुपयांचे समभाग विकले, तर परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1 हजार 99 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते.

घसरगुंडी... 

  • सलग आठ आठवड्यांची शेअर बाजारातील तेजी संपुष्टात 
  • गुंतवणूकदारांनी गमावले 4.5 लाख कोटी 
  • सेन्सेक्‍समधील अडीच वर्षांतील सर्वांत मोठी घसरण 
  • याआधी 24 ऑगस्ट 2015 रोजी सेन्सेक्‍समध्ये 1624 अंशांची घसरण 
  • चालू आठवड्यात सेन्सेक्‍समध्ये 983 अंशांची घसरण 
  • चालू आठवड्यात निफ्टीत 309 अंशांची घसरण 

वित्तीय तुटीचे उद्दिष्ट कमी करण्याऐवजी उधळपट्टी करणाऱ्या अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली. यातच रिझर्व्ह बॅंक आगामी पतधोरणात कठोर भूमिका घेण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
- आनंद जेम्स, चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस 

जागतिक पातळीवरही घसरण 
आशिया देशांमध्ये जपानच्या निक्केई निर्देशांकात 0.90 टक्के, हॉंगकॉंगच्या हॅंगसेंग निर्देशांकात 0.12 टक्के घसरण झाली. याचवेळी चीनच्या शांघाय निर्देशांकात 0.44 टक्के वाढ झाली. युरोपीय देशांतील शेअर बाजारात सुरवातीच्या सत्रात घसरणीचे चित्र होते. जर्मनीच्या डॅक्‍स निर्देशांकात 1.33 टक्के, फ्रान्सच्या सीएसी निर्देशांकात 1.23 टक्के आणि ब्रिटनच्या एफटीएसई निर्देशांकात 0.28 टक्के घसरण झाली.

Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley Lok Sabha 2019 Bombay Stock Exchange