घाऊक चलनवाढ फेब्रुवारीत मंदावली

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

नवी दिल्ली - घाऊक चलनवाढ फेब्रुवारी महिन्यात २.४८ टक्‍क्‍यांवर आली असून, ही मागील सात महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. अन्नपदार्थ आणि भाज्यांच्या भावातील घसरण याला कारणीभूत ठरली आहे. 

नवी दिल्ली - घाऊक चलनवाढ फेब्रुवारी महिन्यात २.४८ टक्‍क्‍यांवर आली असून, ही मागील सात महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. अन्नपदार्थ आणि भाज्यांच्या भावातील घसरण याला कारणीभूत ठरली आहे. 

घाऊक चलनवाढ निर्देशांक जानेवारी महिन्यात २.८४ टक्के आणि मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ५.५१ टक्के होता. या वर्षी फेब्रुवारीत तो २.४८ टक्‍क्‍यांवर आला असून, हा मागील सात महिन्यांतील नीचांक आहे. याआधी गेल्या वर्षी जुलैमध्ये घाऊक चलनवाढ १.८८ टक्के या नीचांकी पातळीवर आली होती. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांची महागाई फेब्रुवारीमध्ये कमी होऊन ०.८८ टक्‍क्‍यांवर आली. ती जानेवारीत ३ टक्के होती. भाज्यांची महागाई कमी झाली असून, वार्षिक महागाई फेब्रुवारीत १५.२६ टक्‍क्‍यांवर आली. त्याआधीच्या महिन्यात ती ४०.७७ टक्के होती. 

फेब्रुवारीत डाळींची महागाई उणे २४.५१ टक्के असून, तृणधान्ये आणि गव्हाची महागाईही उणेमध्ये आहे. अंडी, मासे आणि मांस यांची महागाईही उणे आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई कमी होऊन ३.८१ टक्‍क्‍यांवर आली आहे. उत्पादित वस्तूंची महागाई मात्र वाढली आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये किरकोळ चलनवाढ ४.४४ टक्के या चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर आली आहे. अन्नधान्यांची कमी झालेली महागाई आणि इंधनाचे कमी झालेले दर याला कारणीभूत ठरले.

घाऊक चलनवाढ  
जानेवारी : २.८४ 
फेब्रुवारी : २.४८ 
फेब्रुवारी २०१७ : ५.५१
(आकडे टक्‍क्‍यांमध्ये)

Web Title: business news market Growth inflation