esakal | अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचेय? हे आहेत पर्याय...
sakal

बोलून बातमी शोधा

Buying gold for Akshaya tritiya this is option

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोनेखरेदीचे प्रमाण तुलनेने जास्त असते. लग्नसराईचा हंगाम आणि शेतीचे पीक निघाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करीत असतात. मात्र, यावर्षी ही परंपरा खंडित होण्याची शक्‍यता आहे. 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचेय? हे आहेत पर्याय...

sakal_logo
By
प्रवीण कुलकर्णी

पुणे : सोने खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, लॉकडाउनच्या कारणास्तव सराफी दुकाने बंद असल्याने ग्राहकांना यावर्षी हा मुहूर्त साधता येणार की नाही, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त रविवारी आल्याने शेअर बाजार बंद आहे. परिणामी प्रत्यक्ष सोने खरेदीला पर्याय असणाऱ्या गोल्ड ईटीएफमधील ट्रेडिंग आणि बॅंका बंद असल्याने ई-फॉर्मचा पर्याय देखील उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांसाठी ऑनलाईन सोनेखरेदीचा पर्याय काही सराफी दुकानदारांनी पुढे आणला आहे. 

ई-व्हाउचर्स आणि प्युअर प्राईस ऑफर

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करता यावे यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे आकर्षक ऑफर सादर करण्यात आली आहे. त्यानुसार सुवर्ण वेढण्यांसाठी ई-व्हाउचर्स आणि प्युअर प्राईस ऑफर सादर करण्यात आली आहे. प्युअर प्राईस ऑफरअंतर्गत ग्राहकांना भावावर पूर्णपणे संरक्षण प्रदान करीत लॉकडाउननंतर सोन्याचा भाव वाढला तरी प्रत्यक्ष सोने घेताना बुकिंग केलेल्या दिवशीचा भाव मिळणार आहे. त्याचप्रमाणे हा भाव खाली आला तर खालच्या भावानुसारच सोने घेता येईल. त्यामुळे ग्राहकांना लाभ मिळणार असल्याची माहिती पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी दिली. त्याचप्रमाणे रांका ज्वेलर्सने देखील ग्राहकांना भावावर संरक्षण देत ऑनलाईन आणि फोनद्वारे सोने बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. ग्राहकांना 24 कॅरेट शुद्ध सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 45,500 रुपयांनुसार सोने खरेदी करता येणार आहे. तसेच लॉकडाउन संपल्यानंतर ग्राहकांना वेढणी किंवा दागिने स्वरूपात प्रत्यक्ष सोने घेता येणार असल्याचे रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी म्हटले आहे. 

ऑनलाईन सोनेखरेदीचा पर्याय

भारतातील सर्वांत मोठी स्टॉक कस्टोडियन आणि डिपॉझिटरी असलेल्या "स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या (SHCIL) वेबसाईटवर जाऊन "गोल्डरश' खाते सुरू करून किमान 100 रुपये किंवा 100 रुपयांच्या पटीत ऑनलाईन सोनेखरेदी करता येऊ शकेल. तसेच अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मिळणाऱ्या खास सवलतींचा लाभ देखील ग्राहकांना घेता येणार आहे.

अक्षय तृतीया : हा आहे सोन्याची खरेदी करण्याचा पर्याय; होणार इतक्‍या कोटींची उलाढाल ठप्प

डिजिटल गोल्ड

मेटल्स ऍण्ड मिनरल ट्रेडिंग कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया आणि स्वित्झर्लंडचा सराफा ब्रॅंड PAMP SA यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवस्थापित असलेल्या डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा पर्याय पेटीएम, गूगल पे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, एचडीएफसी सिक्‍युरिटीजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्यानुसार किमान 100 ते 500 रुपयांपासून सोनेखरेदी करता येते. तसेच अटी आणि शर्थीची पूर्तता करून खरेदी केलेल्या सोन्याची प्रत्यक्ष डिलिव्हरी देखील घेता येते. त्यामुळे बाजार बंद असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येत नसल्याने डिजिटल गोल्ड देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. 

सोने आणि अक्षय्य तृतीया

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोनेखरेदीचे प्रमाण तुलनेने जास्त असते. लग्नसराईचा हंगाम आणि शेतीचे पीक निघाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करीत असतात. मात्र, यावर्षी ही परंपरा खंडित होण्याची शक्‍यता आहे. 

एका वर्षात सोने 52 हजारांवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढत आहेत, तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होत असल्याने एक वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्याच्या भावात 13 ते 14 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित आहे. पुढील अक्षय्य तृतीयेपर्यंत सोने 52 हजारांपर्यंत जाण्याची शक्‍यता असल्याचे प्रसिद्ध कमॉडिटी तज्ज्ञ अमित मोडक यांनी म्हटले आहे. जागतिक पातळीवर अनेक प्रगत देशांच्या केंद्रीय बॅंकांनी मोठी आर्थिक पॅकेजेस जाहीर केलेली आहेत. त्यामुळे निर्माण होणारी लिक्विडीटी सोन्यामध्येच पार्क होण्याची शक्‍यता अधिक असल्याने आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात वर्ष अखेरीपर्यंत सोन्याचे भाव ऐतिहासिक 1920 डॉलर प्रति औंसचा टप्पा पार करतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

वर्षाखेरीपर्यंत सोने प्रति ग्रॅम 5000 रुपयांवर 
आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. देशांतर्गत पातळीवर मागील अक्षय्य तृतीयेच्या वेळी 3200 ते 3300 रुपये प्रति ग्रॅम असलेले सोने आज 4600 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचले आहे. मागील वर्षभरात सोन्याचे भाव तब्बल 43 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. कोविड 19च्या पार्श्वभूमीवर सोन्यामधील वाढ कायम राहण्याची चिन्हे असून, वर्षाखेरीपर्यंत सोने प्रति ग्रॅम 5000 रुपयांवर जाऊ शकते. 
- शेखर भंडारी, प्रेसिंडेंट ग्लाेबल बॅकिंग ट्रान्झॅक्शन, कोटक महिंद्रा बॅंक

सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले 
राजकीय, आर्थिक अनिश्‍चिततेदरम्यान किंवा कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीत सोने एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक म्हणून ओळखले जाते. अडचणीच्या काळात सोन्याची तरलता हा आणखी एका महत्त्वाचा भाग असल्याने गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा असतो. सोने चलनवाढीविरूद्ध बचाव म्हणून काम करते. त्यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 
- नीश भट्ट, 
संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मिलवूड केन इंटरनॅशनल

सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर 
अनिश्‍चिततेच्या काळात आर्थिक पातळीवर होणारे नुकसान कमी करण्यासाठी म्हणून सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते. यावेळी देखील कोविड 19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. विकसित देश कोरोनामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक वाढवतील, तसेच विकसनशील देशांच्या चलनात घसरण झाल्याने सोन्याच्या भावात वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे गुंतवणुक पोर्टफोलिओत गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 
- पंकज बोबडे, 
फंडामेंटल रिसर्च हेड, ऍक्‍सिस सिक्‍युरिटीज

वर्षभरात सोने 52 हजारांवर पोहोचेल 
कोविड 19मुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. लॉकडाउनमुळे जगातील प्रमुख देशातील व्यवहार ठप्प झाल्याने पुरवठा आणि मागणीची साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक पेपर गोल्ड, ईटीएफ, डिजिटल गोल्ड (एमई-गोल्ड) मध्ये गुंतवतील किंवा जोखीम क्षमतेनुसार थेट वायदे बाजारात सोन्याचे ट्रेडिंग करतील. त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. वर्षभरात सोने 52 हजारांवर पोहोचेल, तर आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात सोने 2000 डॉलर प्रति औंसावर पोहोचेल. 
- नवनीत दमानी, 
व्हीपी-कमॉडीटी रिसर्च, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस

loading image
go to top