काय सांगता! सोने खरेदी जोमात, धनत्रयोदशीला भाववाढीच्या भीतीने पूर्वनोंदणी 

Citizens are booking gold for Dhantrayodashi
Citizens are booking gold for Dhantrayodashi

नागपूर  ः दसऱ्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने व चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता आणि कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने अनेकांनी विक्रेत्यांकडे सोने चांदीच्या दागिन्यांची पूर्वनोंदणी सुरू केलेली आहे.  यंदा सराफा बाजारात २५० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू आहे. गेल्या महिनाभरात सोने प्रतितोळा १७०० रुपयांनी वाढले. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात लग्नसोहळे, सण आणि उत्सव हातून गेला आहे. त्यात गुढीपाडवा, रक्षाबंधन, अक्षयतृतीया यासारख्या अनेक सणांचाही समावेश आहे.

त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, आता दिवाळीच्या निमित्ताने कोरोनाच्या सावटाखाली बाजारपेठ खुल्या झाल्या असून, ग्राहकांची खऱेदीसाठी वर्दळ वाढली आहे. दिवाळीच्या सणात सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. 

त्यासाठी अनेक जण दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करतात. सोन्याच्या दरात दररोज वाढ होऊ लागली आहे. सोन्याचा दर ५२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. मागील महिन्यात याच तारखेला सोने ५०,७०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. सणासुदीच्या काळ आणि लग्न सराईचा मोसम पुढे असल्याने सोन्याला मागणी वाढलेली आहे. 

त्यामुळे देशांतर्गत सोन्याला चकाकी आलेली आहे. कोरोना संकटाने अडचणीत आलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करतील, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गुंतवणूकदार सोने खरेदी करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

५४ हजारांचा आकडा करणार पार

दरवर्षीच धनत्रयोदशीला सोन्याचे दरात वाढ झालेली आहे. २०१० ते २०१० या दहा वर्षाच्या काळात ३२ हजार ५०० रुपयांची प्रति दहा ग्रॅममध्ये वाढ झालेली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने प्रति दहा ग्रॅम ५४ हजार रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी व्यक्त केली.

चांदी महागली

सोने- चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसापासून सतत दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसापासून चांदीचा दर प्रति किलो ६४, ५०० रुपयावर स्थिरावलेला आहे. महिन्याभराच्या तुलनेत पाच हजार रुपयाची ही वाढ आहे.

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com