कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील 15 क्षेत्र धोक्यात

Economics-Field
Economics-Field

* डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचा 'सेक्टर व्ह्यूज ड्युरिंग कोविड19' अहवाल
* एनबीएफसी, बँकिंग, रिटेल, टेक्सटाईल, आयटी, रिअल इस्टेट, ऑटो आणि मेटल्स या क्षेत्रांवर मोठा परिणाम
* दूरसंचार, ऊर्जा, फार्मा आणि कृषी क्षेत्राला तुलनेने कमी फटका

मुंबई - देशाच्या विविध भागांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराचा मोठा परिणाम दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेतील 15 क्षेत्र धोक्यात आहे, असे डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सच्या 'सेक्टर व्ह्यूज ड्युरिंग कोविड19' या अहवालात सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा  

अहवालानुसार, एनबीएफसी, बँकिंग, रिटेल, टेक्सटाईल, आयटी, रिअल इस्टेट, ऑटो आणि मेटल्स ही क्षेत्र प्रचंड परिणामांच्या कक्षेत आहेत. या क्षेत्रावर कोरोनामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर, दूरसंचार, ऊर्जा, फार्मा आणि कृषी क्षेत्रावर सुक्ष्म परिणाम होईल. कन्झ्युमर स्टेपल, मीडिया, कन्झ्युमर ड्युरेबल्स/इलेक्ट्रिकल्स, केमिकल्स आणि विमा या क्षेत्रांवर माफक परिणाम होईल.

दूरसंचार क्षेत्र -
सध्याच्या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम झालेले एक क्षेत्र म्हणून दूरसंचार क्षेत्र उदयास येईल. या काळात जगभरात डेटा ट्रॅफिकमध्ये 20-30 टक्के वाढ झाली आहे. दूरसंचार कंपन्यांच्या सबस्क्राइबरच्या वाढीत या काळात प्रचंड घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, सबस्क्राइबर्सकडून कंपनी बदलली जाण्याचे प्रमाणही कमी होईल. 

ऊर्जा क्षेत्र -
ऊर्जा क्षेत्रात सर्वाधिक मागणीच्या काळात आणि 'बेस डिमांड'मध्ये वीजेची मागणी 25-30 टक्क्यांनी घसरली. मात्र सप्टेंबर 2020 पर्यंत मागणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या कमी किमती, विशेषत: कोळशाच्या किमती कमी झाल्याने ही तफावत भरून निघण्यास साह्य होईल. मागणी आणि पुरवठा यातील समतोल साधारण वर्षभराने पुढे जाईल. आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत ऊर्जेच्या पुरवठ्यात घट होईल (आर्थिक वर्ष 22-23च्या तुलनेत), असा डीएसपीआयएमचा अंदाज आहे.

फार्मा क्षेत्र -
अत्यावश्यक सेवा म्हणून फार्मा क्षेत्रावर फारच कमी परिणाम झाला आहे आणि कोविड-19 च्या या संकटाचा सगळ्यात कमी परिणाम होणारे हे क्षेत्र असेल. काही काळ खंडित झाल्यानंतर आता चीनमधून होणारा कच्च्या मालाचा पुरवठाही सुरळित झाला आहे आणि त्यामुळे महसुलावर फारसा परिणाम होणार नाही. 

आर्थिक वर्ष 20 च्या चौथ्या तिमाहीत दमदार स्थितीमुळे या क्षेत्रात प्रचंड वाढ होईल आणि आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत रुग्णांची संख्या कमी झाल्याने या काळात वाढ काहीशी सौम्य असेल.

कृषी क्षेत्र -
कृषी क्षेत्रही अत्यावश्यक सेवा मानले गेले आहे. शिवाय, यंदा पावसाचा अंदाजही चांगला असल्याने या क्षेत्रावर सौम्य परिणाम होईल. शिवाय, विविध राज्य आणि जिल्हा प्रशासनाने लॉजिस्टिकला प्राधान्य दिल्याचाही फायदा होईल. अखेर, शेतकऱ्यांसाठी एकूणच रब्बीचा हंगाम लाभकारक ठरेल. खरीप हंगामात पाण्याची उपलब्धता आणि चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राची कामगिरी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

ऑटो क्षेत्र -
चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत एकूण उत्पादनात (जीडीपी) मोठी घसरण झाल्याने तसेच लॉकडाऊनचा मागणी, पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाला आहे. आर्थिक परिणाम पाहता ऑटो क्षेत्राला सावरण्यासाठी आर्थिक वर्ष 2022 पर्यंत वाट बघावी लागण्याची शक्यता आहे. 

सिमेंट उद्योग -
सध्याच्या संकटाचा प्रचंड परिणाम पाहता आर्थिक वर्ष 2021 मध्ये सिमेंट क्षेत्रात दोन आकडी घसरण होण्याची चिन्हे आहेत. अनेक सिमेंट कंपन्यांनी नुकतीच क्षमता वृद्धी केलेली आहे. तरी त्यांचा ताळेबंद बराच बऱ्या स्थितीत आहे. मात्र सगळीकडे बांधकाम थांबल्याने मागणी कमी झाली आहे. शिवाय रिअल इस्टेट क्षेत्र अडचणीत असल्याने त्याचा परिणाम सिमेंट उद्योगावर होणार आहे.

आयटी क्षेत्र -
मंदीच्या काळात जे घडले त्याउलट आताच्या मंदीमध्ये आयटी क्षेत्रात मागणी आणि पुरवठा अशा दोन्हीवर परिणाम होत आहे. आयटीमधील 30 टक्के खर्च चंगळवादी मानला जातो आणि आता हे खर्च रद्दच केले जातील किंवा तात्पुरते थांबविण्यात येतील.

तर, उर्वरित 70 टक्के खर्चांमध्येही प्रचंड ताण जाणवेल. चौथ्या तिमाहीत अनेक आयटी कंपन्यांच्या महसूल मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची शक्यता आहे. तर, पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत महसुलात प्रचंड घसरण होईल. आर्थिक घसरणीमुळे चंगळवादी खर्चावर नियंत्रण येईल.

कन्झ्युमर ड्युरेबल्स
कन्झ्युमर ड्युरेबल्समधील मागणी बी2बी आणि बी2सी या दोन्ही वर्गांमध्ये आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत थंडावलेली राहील. बी2सी अधिक वेगाने सावरेल. मात्र, बी2बी क्षेत्रात अधिक काळ धडपडावे लागेल. खासगी कॅपेक्सचे व्यवहार लांबणीवर पडणे आणि सरकारकडून होणाऱ्या खर्चात हळूहळू सुधारणा यामुळे हा वेळ लागेल.

बँकिंग आणि एनबीएफसी क्षेत्र -
बँकिंग आणि एनबीएफसी क्षेत्रात मंदावलेली आर्थिक प्रगती आणि उत्पन्न अंदाज यामुळे अधिक ताण येणार आहे. बँकिंग क्षेत्र हे उत्तम अर्थव्यवस्थेचे द्योतक असते. सध्या कर्जांची घटलेली मागणी, रिटेल क्रेडिटमधील बुडीत कर्जाचे वाढलेले परिणाम आणि नोटबंदी, जीएसटीनंतर काहीशा तणावातच असणाऱ्या कॉर्पोरेट क्षेत्राकडून वसुली होण्यातील विलंब सहन करावा लागणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका आणि एनबीएफसीला दीर्घकाळात काही घटलेले उत्पन्न, कर्जाची कमी मागणी आणि वाढत्या बुडीत कर्जाचा सामना करावा लागेल.

मागील 18 महिन्यांत एनबीएफसी/एचएफसी क्षेत्रात खेळत्या भांडवलाची समस्या निर्माण झाली आहे.   बदललेल्या व्यवसाय पद्धती आणि घाऊक कर्ज आणि धोरणात्मक क्रेडिट पोर्टफोलिओमधील ताण ही यामागची कारणे आहेत.

रिटेल क्षेत्र -
नजीकच्या काळात सोशल डिस्टंसिंगमुळे रिटेल क्षेत्राला जबरदस्त फटका बसणार आहे. विविध प्रकारच्या रिटेल व्यवसायांमध्ये सर्वाधिक परिणाम कपड्यांच्या व्यवसायावर होईल. त्यापाठोपाठ फूड रीटेलर (रेस्तराँ) वर परिणाम होईल. वाणसामानाच्या दुकानांना सर्वात कमी झळ बसेल.
टेक्सटाइल कंपन्यांचे बहुतांश ग्राहक रिटेलर्स आहेत. कपड्यांच्या अनेक रिटेलर्ससमोर लॉकडाऊनमुळे आव्हाने उभी आहेत. त्यामुळे इतर कंपन्यांनाही मागणी घटल्याचे परिणाम भोगावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com