मंदीत तेरावा महिना; ऍटोमोबाईल क्षेत्राकडून सवलतींची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

देशातील वाहन उद्योगाने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आपले कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. वाहन उत्पादक कंपन्या आणि त्यांच्याशी निगडित उद्योग-व्यवसायाला लॉकडाऊन ३.० मध्ये पूर्ण सवलत देण्यात यावी, या क्षेत्रावर कोणतीही बंधने नसावी, त्यांना कामकाज सुरू करता यावे अशी मागणी केली आहे. एप्रिल महिन्यात देशातील वाहन उद्योगांनी शून्य विक्री नोंदवली होती. वाहन उद्योगाने भारत सरकारला यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

- एप्रिलमध्ये वाहन उद्योगाने इतिहासात पहिल्यांदाच नोंदवली शून्य विक्री
- आधीच मंदीचा सामना करणाऱ्या वाहन उद्योगासमोर मोठे संकट
- वाहन उद्योगाशी निगडित सर्वच घटकांचे कामकाज सुरू करण्याची संघटनांची मागणी
- वाहन उद्योगातून प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे ३.७ कोटी रोजगारांची निर्मिती 

देशातील वाहन उद्योगाने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आपले कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. वाहन उत्पादक कंपन्या आणि त्यांच्याशी निगडित उद्योग-व्यवसायाला लॉकडाऊन ३.० मध्ये पूर्ण सवलत देण्यात यावी, या क्षेत्रावर कोणतीही बंधने नसावी, त्यांना कामकाज सुरू करता यावे अशी मागणी केली आहे. एप्रिल महिन्यात देशातील वाहन उद्योगांनी शून्य विक्री नोंदवली होती. वाहन उद्योगाने भारत सरकारला यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

अर्थविश्व क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे  क्लिक करा 

'ऑटोमोटिव्ह चेन ही खूप गुंतागुंतीची आहे. ती एकमेकांशी जोडलेली आणि परंस्परांवलंबी आहे. जोपर्यत उत्पादनासाठी लागणारे सर्व सुटे भागांचे उत्पादन करणाऱ्या सर्वच कंपन्यांचे कामकाज सुरू होत नाही तोपर्य  एखादी वाहन उत्पादक कंपनी आपले कामकाज सुरू करू शकत नाही', असे मत गृहसचिव अजय भल्ला यांना संयुक्तपणे लिहिलेल्या पत्रात सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स, ऑटोमोटीव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन या तीन संघटनांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने देशभरातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी पुढे नेत  १७ मे पर्यत वाढवला आहे. त्याचबरोबर ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी सरकारने काही घटकांना कामकाज करण्याची मुभाही दिली आहे. वाहन उद्योगाला मात्र आपली सर्वच यंत्रणा कार्यरत ठेवण्याची मुभा हवी आहे. वाहन उद्योगासाठी सुटे भाग बनवणारे कारखाने किंवा कंपन्या, सर्व वाहन उत्पादन कंपन्या, त्यांच्या डिलरशीप यांना संपूर्ण देशभरात एकाच वेली आपले कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी म्हणजे हे क्षेत्र पुन्हा एकदा कार्यरत होऊ शकेल अशी मागणी देशातील वाहन उद्योगाने केली आहे. जर डिलर्सना वाहन विक्रीची परवानगी नसली आणि वाहन उत्पादक कंपन्यांनाच फक्त कामकाज सुरू करण्याची परवानगी दिली तर त्यांच्याकडे तयार वाहनांचा साठा पडून राहील. यामुळे या कंपन्यांच्या खेळत्या भांडवलाचाही प्रश्न निर्माण होईल. जर या क्षेत्रातील एकाही घटकाला कामकाज सुरू करता आले नाही तर हे क्षेत्र कार्यरत होऊ शकणार नाही, असेही वाहन उद्योगाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

'एप्रिल महिना हा असा होता की वाहन उद्योगाला तो लवकरात लवकर विसरावा वाटेल आणि आशा आहे की पुन्हा या क्षेत्रावर भविष्यात अशी वेळ येणार नाही. वाहन उद्योगाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती की जेव्हा विक्री शून्यावर आली आहे. वाहन उद्योगासाठी ही अत्यंत कठीण वेळ आहे. लॉकडाऊनमधून मार्ग काढत लवकरच या क्षेत्राचे कामकाज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे', असे मत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी व्यक्त केले आहे.

देशाच्या जीडीपीमध्ये वाहन उद्योगाचा ७ टक्के वाटा आहे. मॅन्युफॅक्चरिंग जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाट ४९ टक्के आहे. तर जीएसटीमध्ये १५ टक्के हिस्सा या क्षेत्राचा आहे. हे क्षेत्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ३.७ कोटी लोकांना रोजगार देते. मागील १५ महिन्यांपासून आधीच हे क्षेत्र मंदीचा सामना करते आहे. कोविड-१९ महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे या क्षेत्राचे कंबरडेच मोडले आहे. देशातील वाहन उद्योग दररोज २,३०० कोटी रुपयांचा महसूल गमावते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown automobile sector demand for remove restrictions