कोरोना इफेक्ट : 'विस्तारा' एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना फटका

Vistara-Airlines
Vistara-Airlines

विस्तारा या देशातील आघाडीच्या विमानसेवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना महिन्यातील चार दिवसांचे वेतन मिळणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. विस्तारामधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मे आणि जून महिन्यात सक्तीच्या विनावेतन रजेवर (लीव विदाऊट पे) जावे लागणार असल्याची माहिती विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेस्ली थॅंग यांनी दिली आहे. सद्याच्या कठीण परिस्थितीत कंपनीकडील रोकड राखून ठेवण्यासाठी विस्तारा एअरलाईन्सने हा निर्णय घेतला आहे.

रोकड सांभाळण्याचा प्रयत्न
कोविड-१९च्या प्रादूर्भावानंतर जगातील अनेक देशात लॉकडाऊन सुरू झाल्याचा प्रंचड मोठा फटका हवाई वाहतूक क्षेत्राला आणि विमानसेवा कंपन्यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे महसूल जवळपास ठप्प झाल्यासारखा असल्यामुळे आगामी काळातील खडतर परिस्थितीला सामोरे जाताना हाती रोकडची उपलब्धता असावी यासाठी कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करत त्यांना मे आणि जून महिन्यात सक्तीची चार दिवसांची विनावेतन रजा देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

एप्रिल महिन्यात विस्ताराने वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सहा दिवसांपर्यत विनावेतन रजा घेण्याची सक्ती केली होती. सक्तीच्या विनावेतन रजेचा परिणाम कंपनीच्या १,२०० वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कंपनीच्या केबिन क्रू आणि विमानतळावरील कामकाज सांभाळणाऱ्या २,८०० कर्मचाऱ्यांना मात्र या निर्णयाचा फटका बसणार नाही. कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी त्यांच्या वेतनात कपात करण्याचा कठीण निर्णय आम्हाला घ्यावा लागणार आहे, असे मत विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी थंग यांनी व्यक्त केले आहे. मे आणि जून महिन्यात १अ आणि १ब प्रकारातील पायलट आणि कर्मचारी सोडून इतरांना सक्तीने विनावेतन रजा देण्यात येणार आहे.  मे आणि जून महिन्यात पायलटना दर महिन्याच्या उड्डाणांसाठी दिला जाणाऱ्या भत्त्यात दरमहिन्याला २० तासांची कपात करण्यात आली आहे. याआधी पायलटना दरमहिन्याला ७० तासांचा फ्लायिंग भत्ता दिला जात होता. 

कोविड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरू आहे. विमानांच्या उड्डाणांवरही निर्बंध घालण्यात आले आहे. मागील वर्षभरापासून अडचणीत असलेले हवाई उड्डाण क्षेत्र आणि विमानसेवा कंपन्या यामुळे आणखीच संकटात सापडल्या आहेत. याआधी कर्जबाजारी झाल्यामुळे जेट एअरवेजने आपले कामकाज थांबवले होते. तर विजय मल्ल्यांची किंगफिशर एअरलाईन्सचा आर्थिक संकटात सापडली होती. एअर इंडियासारखी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीदेखील कर्जाच्या डोंगराला सामोरी जाते आहे.

सरकारने एअर इंडियाचे १०० टक्के खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. संकटात सापडलेल्या विमानसेवा कंपन्यांना आता लॉकडाऊनसारख्या प्रचंड मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे या क्षेत्राचे भवितव्य अस्थिर झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com