देशाची अर्थव्यवस्था धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criticism Rahul Gandhi meeting of Bharat Jodo Yatra economy crisis narendra modi

देशाची अर्थव्यवस्था धोक्यात

भोपाळा फाटा (ता. नायगाव) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे, अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील दुसरा दिवस पार पडला. यात्रेत सकाळीच काँग्रेस सेवादलाचे मध्यप्रदेशचे प्रभारी कृष्णकुमार पांडे (वय ८०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे नायगाव तालुक्यातील भोपळा येथे कोपरा बैठकीऐवजी शोकसभा घेण्यात आली.

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशातील तरुण लाखो रुपये खर्चून उच्च शिक्षण घेत आहेत, इंजिनिअर होत आहेत, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे कुणी टँक्सी चालवून तर कुणी मजुरी करुन उपजीविका भागवत आहेत, हे देशाचे दुर्दैव आहे. शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण करण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबर रोजी ‘काला धन’ असे म्हणत नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर जीएसटी लागू केला. मात्र, या दोन्ही निर्णयाने देशातील व्यापारी, शेतकरी व युवक उद्ध्वस्त झाले. याचे परिणाम आजही देश भोगत आहे,’’ असेही ते म्हणाले.

त्यांचे विचार काश्‍मीरपर्यंत पोचवू

‘‘आमचा असा प्रयत्न होता की, माझ्यासोबतचे सर्व भारत यात्री शेवटपर्यंत सोबत हवेत पण, दुर्दैवाने आमचा एक निष्ठावंत आम्हाला सोडून गेला, याचे दुःख वाटते. पण त्यांचे विचार जम्मू-काश्मीरपर्यंत आमच्या सोबत राहतील,’’ असे भावोद्गार कृष्णकुमार पांडे यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी काढले.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने तुमच्या मनातील दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांशी आणि तरुणांशी बोललो यावेळी शेतकरी म्हणतात मोठ्या व्यापाऱ्याचे कर्ज पाच मिनिटांत माफ होते. आम्ही वर्षानुवर्षे चकरा मारुनही माफ होत नाही, शेत मालाला हमी भाव मिळत नाही आमची काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित करतात.

- राहुल गांधी, काँग्रेस नेते