संचालकपदावरून मिस्त्रींची हकालपट्टी?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

मुंबई: 'टाटा' समूहाच्या विविध कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केलेले सायरस मिस्त्री यांची संचालक मंडळातूनही हकालपट्टी करण्याबाबतची व्यूहरचना टाटा सन्सच्या संचालक मंडळाने केली आहे. त्यासाठी 13 डिसेंबरला विशेष सर्वसाधारण सभा बोलावली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई: 'टाटा' समूहाच्या विविध कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केलेले सायरस मिस्त्री यांची संचालक मंडळातूनही हकालपट्टी करण्याबाबतची व्यूहरचना टाटा सन्सच्या संचालक मंडळाने केली आहे. त्यासाठी 13 डिसेंबरला विशेष सर्वसाधारण सभा बोलावली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यातील वादात रोज नवीन घडामोडी होत असून, यातून कॉर्पोरेट क्षेत्र हादरून गेले आहे. 24 ऑक्‍टोबरला झालेल्या टाटा सन्सच्या बैठकीत सायरस मिस्त्रींची अध्यक्षपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करून या वादाला सुरवात झाली. टाटा सन्स, टीजीबीएल, टीसीएस आदी कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

सध्या "टाटा सन्स'च्या संचालक मंडळावर अंतरिम अध्यक्ष रतन टाटा, नितीन नोहरिया, विजय सिंग, फरिदा खंबाटा, वेणू श्रीनिवासन, अजय पिरामल, अमित चंद्रा, एन. चंद्रशेखरन, राल्फ स्पेथ यांचा समावेश आहे. 

बैठकांना मिस्त्रींची दांडी 
टाटा सन्सच्या संचालकांची समूहातील कंपन्यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी झालेल्या बैठकीला सायरस मिस्त्री यांनी दांडी मारली. त्याचबरोबर "टाटा कन्सल्टन्सी'मधील संचालकांची इशात हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीलाही मिस्त्री अनुपस्थित होते. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

या कंपन्यांवरूनही हकालपट्टी 
सध्या टाटा समूहाच्या टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, टाटा टॅली आदी कंपन्यांच्या अध्यक्षपदावर मिस्त्री अद्यापही कायम आहेत. मिस्त्री स्वत:हून या कंपन्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ "टाटा'च्या संचालक मंडळाने बांधली आहे; मात्र तरीही त्यांनी राजीनामा न दिल्यास त्यांची हकालपट्टी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Cyrus Mistry to be removed from board of directors of Tata group