टाटा समूहाच्या प्रमुखपदी पुन्हा सायरस मिस्त्री

Cyrus-Mistry
Cyrus-Mistry

नवी दिल्ली - टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांना कायम ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादाने (एनसीएलएटी) दिला आहे. याचवेळी लवादाने टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची झालेली नियुक्तीही बेकायदा ठरविली आहे. 

टाटा समूहाविरोधात तीन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर मिस्त्री यांना अखेर दिलासा मिळाला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना 24 ऑक्‍टोबर 2016 रोजी तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते. टाटा समूहाला लवादाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे. यामुळे मिस्त्री यांना टाटा समूहाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कायम ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी चार आठवड्यांनंतर होईल. 

रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, ऑक्‍टोबर 2016 मध्ये मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर काही काळ हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. रतन टाटा यांच्यानंतर एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 

लवादाचा आधीचा निर्णय काय होता? 
टाटा समूहाने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) याचिका दाखल केली होती. त्यावर लवादाने 9 जुलै 2018 रोजी टाटा समूहाच्या बाजूने निकाल दिला. लवादाने मिस्त्री यांची याचिका फेटाळून लावत टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा आणि इतर संचालकांवर केलेले आरोपदेखील अमान्य केले. मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून काढून टाकण्याचा टाटा सन्सच्या संचालक मंडळाला अधिकार असल्याचा निर्णय लवादाने दिला होता. या निर्णयाला मिस्त्री यांनी "एनसीएलएटी'कडे आव्हान दिले होते. 

आजचा निर्णय काय? 
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर "एनसीएलएटी'ने "एनसीएलटी'चा निर्णय रद्द केला. तसेच, मिस्त्री यांच्या बाजूने निकाल देत मिस्त्री हेच टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष असतील. एन. चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून केलेली निवड बेकायदा असल्याचा निर्णय दिला आहे. 

टाटा समूहाचे समभाग कोसळले 
"एनसीएलएटी'ने मिस्त्री यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर दुपारच्या सत्रात टाटा समूहातील काही कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली. टाटा मोटर्सचा समभाग 2.89 टक्‍क्‍यांनी घसरत 175 रुपयांवर बंद झाला. त्यापाठोपाठ टाटा कॉफीच्या समभागात 3.62 टक्‍क्‍यांची घसरण होऊन तो 91.65 रुपयांवर बंद झाला. टाटा ग्लोबल बेव्हरेजच्या समभागामध्ये 3.66 टक्‍क्‍यांची घसरण होत तो 313 रुपयांवर स्थिरावला. टाटा पॉवरच्या समभागामध्ये 1 टक्का घसरण झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com