मिस्त्रींचा अध्यक्षपदाचा राजीनामा नाही?

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

टाटा समूह आणि मिस्त्रींमधील वाद विकोपाला गेल्याने बहुतांश कंपन्यांमधील वरिष्ठांना नेमके कोणाचे ऐकावे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नव्या अध्यक्षाची चार महिन्यांत निवड केली जाणार आहे.

मुंबई : टाटा समूहाच्या संचालक मंडळाने पदच्युत केले असले, तरी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत सायरस मिस्त्रींनी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. याउलट शुक्रवारी (ता. 4) टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स लिमिटेडच्या तिमाही निकालासंदर्भातील बैठकीस मिस्त्री अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

टाटा समूहातील टाटा स्टील, टीसीएस, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, टाटा केमिकल्स, टाटा इंडस्ट्रीज आणि टाटा टेलिसर्व्हिस या नऊ कंपन्यांचे मिस्त्री अध्यक्ष आहेत. मिस्त्री यांची 24 ऑक्‍टोबरला हकालपट्टी झाल्यानंतर ते अध्यक्षपदावरून पायउतार होतील, असा आशावाद टाटा समूहाने बाळगला होता. मात्र गेल्या आठ दिवसांत मिस्त्रींनी पद सोडण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याऐवजी पदावर कायम राहणे पसंत केले असून, दुसऱ्या तिमाही निकालासदर्भात इंडियन हॉटेल्सच्या संचालकांची आज बैठक होणार आहे.

पुढील आठवड्यात 10 नोव्हेंबरला टाटा केमिकल्सच्या बैठकीला ते अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. कायद्यानुसार आवश्‍यकता असेल तेव्हा मिस्त्री अध्यक्षपदाचा त्याग करतील, असे मिस्त्रींच्या निकटवर्तीय सूत्रांनी म्हटले आहे. टाटा समूह आणि मिस्त्रींमधील वाद विकोपाला गेल्याने बहुतांश कंपन्यांमधील वरिष्ठांना नेमके कोणाचे ऐकावे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नव्या अध्यक्षाची चार महिन्यांत निवड केली जाणार आहे.

Web Title: Cyrus Mistry likely to attend Tata Sons's board meetings