मारुतीची डिझेल वाहने बंद

पीटीआय
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

१ एप्रिल २०२० पासून डिझेल वाहनांची निर्मिती थांबविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भविष्यात ‘बीएस-६’ डिझेल वाहनांना मागणी राहिली तर, त्यांच्या निर्मितीचा विचार केला जाईल. 
- आर. सी. भार्गव, अध्यक्ष मारुती सुझुकी इंडिया

नवी दिल्ली - एप्रिल २०२० पासून डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांची निर्मिती थांबवणार असल्याची घोषणा देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती-सुझुकी इंडियाने गुरुवारी (ता. २५) केली. भारतात सध्या या कंपनीच्या विक्री होत असलेल्या गाड्यांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे प्रमाण २३ टक्के आहे. मात्र  ही कंपनी आता डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी पेट्रोल तसेच सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या उत्पादनावर भर देणार असल्याचे समजते.

कंपनीने गुरुवारी चौथ्या तिमाहीतील कामगिरीचा निकाल जाहीर केला. त्यावेळी कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी ही माहिती दिली. कंपनीला यंदा २१,४५९ कोटींचा महसूल मिळाला आहे.  त्यात गतवर्षीच्या तुलनेत १.३९ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

तत्पूर्वी नफ्यात घट झाली असतानाही कंपनीने गेल्या वर्षीइतकाच म्हणजे प्रतिशेअर ८० रुपये इतका लांभांश देण्याची घोषणा केली. २०१८-१९ या आर्थिक वर्षात कंपनीला एकूण ७५०० कोटींचा नफा झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात २.९ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. 

रुपयातील अवमूल्यन, कमोडिटी किमती, गुजरातमध्ये सुरू केलेला दुसरा प्रकल्प तसेच जाहिरातींवरील मोठा खर्च यांचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर झाला आहे. कंपनीने एकूण ४ लाख ५८ हजार ४७९ वाहनांची विक्री केली असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात ०.७ टक्के घट झाल्याचे कंपनीने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

कारण काय?
वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एप्रिल २०२०पासून देशात बीएस-६ उत्सर्जन नियम लागू होणार आहेत. त्याचसोबत डिझेल कारसंदर्भातील सरकारच्या नव्या नियमामुळे कंपनीला सर्व डिझेल कारचे अद्ययावतीकरण करावे लागते. त्यासाठी कंपनीला अधिक गुंतवणूक करावी लागते. दुसरीकडे, बीएस-६ मानकांचे पालन करणारे डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांचे उत्पादन करण्यास सुरुवात झाल्यानंतर गाड्यांच्या किमतीत दीड ते दोन लाख रुपयांनी वाढतील. या गाड्यांच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांच्या किमतीपेक्षा अधिक असतील. त्याचा परिणाम विक्रीवर होऊ शकतो. त्यातच पेट्रोल व सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Diesel Vehicle Production Close by Maruti Suzuki India