esakal | आयुर्विमा पॉलिसीवरील बोनस 
sakal

बोलून बातमी शोधा

आयुर्विमा पॉलिसीवरील बोनस 

बॅंकेत वा पोस्टात ठेवलेल्या ठेवींवर आपल्याला व्याजाच्या रूपात परतावा मिळतो, शेअरमधील गुंतवणुकीवर लाभांश मिळू शकतो. आयुर्विमा पॉलिसीतील गुंतवणुकीवर बोनसच्या रूपात परतावा मिळतो.

आयुर्विमा पॉलिसीवरील बोनस 

sakal_logo
By
दिलीप बार्शीकर

आपण बॅंकेत वा पोस्टात ठेवलेल्या ठेवींवर आपल्याला व्याजाच्या रूपात परतावा मिळतो, शेअरमधील गुंतवणुकीवर लाभांश मिळू शकतो. त्याचप्रमाणे आयुर्विमा पॉलिसीतील गुंतवणुकीवर बोनसच्या रूपात परतावा मिळतो. आज या बोनस विषयी थोडीशी माहिती घेऊ या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बोनसपात्र पॉलिसी 
सरसकट सर्व पॉलिसीवर बोनस देय होत नाही. ज्या पॉलिसी दस्तावेजावर 'नफ्यासहित' (विथ प्रॉफिट) असे नमूद केलेले असते अशाच पॉलिसी बोनससाठी पात्र ठरतात. सर्वसामान्यपणे एन्डोव्हमेंट, मनी बॅक, होल लाइफ या वर्गातील पॉलिसीना बोनस मिळू शकतो. टर्म इन्शुरन्समध्ये फक्त जोखीम संरक्षणासाठी लागणारा अत्यल्प प्रिमियम आकारलेला असतो. त्यामुळे अशा पॉलिसीवर बोनस देण्याचा प्रश्नच येत नाही. युलिप्समध्ये विमाधारकाने दिलेला प्रिमियम त्याच्याच पसंतीच्या फंडात गुंतविला जातो. यातून होणारे नफा/नुकसान सर्वस्वी विमाधारकाचेच असते. त्यामुळे त्याला पुन्हा नफ्यात वाटा (बोनस) देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे पॉलिसी घेतानाच विमाधारकाने बोनस पात्रतेविषयी माहिती करून घ्यावी. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बोनस केव्हा, कसा जाहीर केला जातो? 

विमा कायद्यानुसार प्रत्येक विमा कंपनीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेरीस 'गणिती मूल्यांकन' (actuarial valuation) करून घेणे बंधनकारक आहे. विम्याचे गणित अनेक गृहितावर आधारित असते. पॉलिसीच्या कालावधीत किती विमाधारकांचा मृत्यु होऊ शकेल, प्रिमियमच्या रूपाने मिळालेली रक्कम गुंतविल्यावर कोणत्या दराने, किती व्याज मिळू शकेल, विमा व्यवस्थापनासाठी किती खर्च होऊ शकेल अशा गोष्टींचे कंपनीने अंदाज बांधलेले असतात. या अंदाजी आकड्यांचा किंवा गृहितांचा प्रत्यक्ष येणाऱ्या अनुभवाशी कितपत ताळमेळ बसतो हे मूल्यांकनाद्वारे तपासून पाहिले जाते. प्रत्यक्ष अनुभव हा अनुकूल असेल (उदा. अंदाजापेक्षा प्रत्यक्षात कमी मृत्यू झाले किंवा गुंतवणुकीवर अंदाजापेक्षा अधिक व्याज मिळाले वगैरे) तर कंपनीला 'नफा' होईल. विम्याच्या भाषेत त्याला 'सरप्लस' म्हणतात. (विम्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून उत्पन्न- खर्च= नफा असे सरळसोट समीकरण येथे मांडता येत नाही) या 'सरप्लस'मधून जरूर तर काही रक्कम राखीव म्हणून बाजूला काढून 'सरप्लस' उघड केला जातो आणि यातील किमान 90 टक्के रक्कम विमाधारकांना बोनस म्हणून वाटण्यात येते. थोडक्‍यात, आर्थिक वर्षाखेरीस मूल्यांकनानंतर बोनसचे दर जाहीर केले जातात. एन्डोव्हमेंट, मनी बॅक, होल लाइफ अशा वेगवेगळ्या वर्गातील पॉलिसींचे बोनस दरही वेगवेगळे असतात. 

बोनसची रक्कम विमाधारकांना केव्हा अदा केली जाते? 
बोनस जाहीर झाला की, तो विमाधारकाच्या पॉलिसी वर जमा होतो, पण तो त्याला मुदतपूर्ती, मृत्युदावा किंवा सरेंडर अशावेळी अंतिम विमा रकमेबरोबरच मिळत्‌े. या वार्षिक बोनस शिवाय दीर्घ मुदतीच्या पॉलिसीवर (साधारण 15 वर्षे किंवा अधिक काळ पॉलिसी चालू अवस्थेत असेल तर) एक जादा एकरकमी बोनस मुदतपूर्ती किंवा मृत्यू दाव्याच्या वेळी दिला जाऊ शकतो, ज्याला 'अंतीम अतिरिक्त बोनस' ( फायनल ऍडिशनल बोनस) म्हणतात. 

एक छोटेसे उदाहरण पाहू. नचिकेतने एन्डोव्हमेंट प्रकारातील 20 वर्षे मुदतीची,एक लाख विमा रकमेची पॉलिसी घेतलेली आहे. समजा, पहिल्या वर्षाखेरीस कंपनीने दर हजारी विमा रकमेवर रु.40 असा बोनस दर जाहीर केला ( इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बोनसचा दर हा विमा रकमेवर जाहीर केला जातो, भरलेल्या प्रिमियमच्या रकमेवर नव्हे). आता नचिकेतच्या खात्यावर चार हजार रुपये इतका बोनस जमा होईल. दुसऱ्या वर्षी बोनस दर रु.50 असेल तर पाच हजार रुपये इतका बोनस दुसऱ्या वर्षी जमा होईल. 

समजा, मुदतपूर्तीपर्यंत अशाप्रकारे जाहीर झालेल्या 20 वर्षांच्या बोनसची एकूण रक्कम एक लाख 20 हजार रुपये येत असेल तर नचिकेतला मूळ विमा रक्कम एक लाख अधिक बोनस एक लाख 20 हजार रुपये असे एकूण दोन लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम मुदतपूर्तीचा 'क्‍लेम' म्हणून मिळेल. यात समजा कंपनीने वीस हजार अंतिम अतिरिक्त बोनस जाहीर केला असेल तर हीच क्‍लेम रक्कम वाढून 2 लाख 40 हजार इतकी होईल. 

समजा, एखाद्या विमाधारकाचा पॉलिसी घेतल्यापासून आठ वर्षांनी मृत्यु झाला तर विमाधारकाला मूळ विमा रक्कम एक लाख अधिक आठ वर्षांचा बोनस इतकी रक्कम मृत्यू दावा म्हणून मिळेल. 

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट 
बोनससाठी पात्र होण्यासाठी नियमितपणे प्रिमियम भरून पॉलिसी चालू स्थितीत ठेवणे आवश्‍यक आहे. प्रिमियम भरला नाही तर पॉलिसी बंद स्थितीत जाऊन विमा रकमेचे तर नुकसान होतेच पण बोनस जमा होणेही बंद होते. 

लेखक निवृत्त विमा अधिकारी आणि प्रशिक्षण सल्लागार आहेत.

loading image
go to top