पीएमसी बॅंकेचे नेमके झाले तरी काय? जाणून घ्या... 

ज्ञानेश्‍वर बिजले
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदारांचे साडेअकरा हजार कोटी रुपये अडकले असताना, त्यांच्या मदतीला सध्या कोण पुढाकार घेणार? 

पुणे: सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदारांचे साडेअकरा हजार कोटी रुपये अडकले असताना, त्यांच्या मदतीला सध्या कोणीही पुढाकार घेत नाही, ही आहे पंजाब ऍण्ड महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह (पीएमसी) बॅंकेची सद्यस्थिती. रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्याने, आता खातेदारांना रक्कम मिळणार नाही, तर पुढे कोणती कारवाई होणार, त्याची माहिती कोणीही देत नाही, अशी खातेदारांची अवघड स्थिती. 

पुण्यात साडेसहा वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने रुपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक निर्बंध घातले. अद्यापही लोकांचे सुमारे एक हजार कोटी रुपये अडकून पडले आहेत. त्यावेळी रुपी ही राज्यातील सहकारी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बॅंक होती. पीएमसी बॅंकेची सध्याची उलाढाल ही रुपीच्या तुलनेत दहापट मोठी आहे. ती देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी सहकारी बॅंक आहे. 

मल्टीस्टेट शेड्युल बॅंक असलेल्या पीएमसी बॅंकेच्या 137 शाखा सहा-सात राज्यात असल्या, तरी त्यापैकी 103 शाखा या महाराष्ट्रात आहेत. मुंबईत सुमारे 85 शाखा असल्यामुळे, तेथे या बॅंकेच्या खातेदारांना उद्रेक मोठ्या प्रमाणात जाणवतो. बॅंकेची उलाढालही वीस हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. पीएमसी बॅंकेने लेखापरीक्षणात खरे तर 118 कोटी रुपये नफा दाखविला होता. अशा वेळी अचानक आर्थिक निर्बंध लागू झाल्याने खातेदार चिंताग्रस्त झाले आहे. या बॅंकेचे व्यवस्थापन मंडळ तसे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. 

एका कर्ज प्रकरणाने बॅंकेवर निर्बंध 

राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे रिझर्व्ह बॅंकेच्या टास्क फोर्स फॉर अर्बन कोऑपरेटीव्ह बॅंक (टॅफकब) चे सदस्य आहेत. अनास्कर पीएमसी बॅंकेसंदर्भात म्हणाले, ""हाऊसिंग डेव्हलपमेंट इंडिया लिमीटेड (एचडीआयएल) या कंपनीचे 2500 कोटी रुपयांचे कर्ज खाते आहे. पीएमसी बॅंकेच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार ते स्टॅडर्ड खाते असून, त्याचे कर्ज परतफेड नियमित आहे. मात्र, एचडीआयएल कंपनीने अन्य बॅंकांकडूनही कर्ज घेतले आहे. बॅंक ऑफ इंडियाने एचडीआयएलचे 530 कोटी रुपयांचे कर्जखाते थकित राहिल्याने कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली. ते लक्षात येताच, रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेला या कंपनीचे खाते अनुत्पादक कर्ज म्हणून दाखवा, तसेच तो तोटा म्हणून दाखविण्यास सांगितले. शंभर कोटी रुपयांचा नफा असताना इतका मोठा तोटा कसा धरायचा, या मुद्‌द्‌यांवर वाद होता. कर्जाची परतफेड नियमाने होत असून, कर्ज सिक्‍युअर असल्याचा बॅंकेचा मुद्दा आरबीआयने बाजूला ठेवला आणि आर्थिक निर्बंध लावले.'' 

""पीएमसी बॅंकेच्या ऑडीटरने नफा दाखविला, तर आरबीआयच्या तपासणीत मोठा तोटा दाखविला. अशा प्रकारच्या फरकाचे प्रमाण वीस टक्‍क्‍यापेक्षा अधिक असल्यास, त्याबाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी लवाद नेमावा, अशी सूचना आम्ही नागरी बॅंक असोसिएशनमार्फत केली आहे,'' असे अनास्कर यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""बॅंकेवर मोठी कारवाई झाल्यास, सहा महिन्यांनी बॅंक पुन्हा सुरू केली, तर लोक रक्कम काढून घेतील. त्यामुळे बॅंकेचा तोटा वाढेल. त्यामुळे कारवाईपूर्वी त्या बॅंकेचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. हा एकप्रकारे नागरी सहकारी बॅंकींग संपविण्याचाच घाट आहे.'' 

पीएमसी बँकेचे माजी व्यवथापकीय संचालक जॉय थॉमस म्हणाले,'' बँकेची आर्थिक स्थिती चांगली असून चार हजार कोटी रुपयांची लिक्विडीटी आहे. खातेदारांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे. 

पीएमसी बॅंकेची स्थिती 
(आकडे कोटी रुपयांमध्ये) 
ठेवी 11,617 
कर्ज 8,402 
नफा 118 
स्वनिधी भांडवल 1,226 
एकूण अनुत्पादित कर्जे(एनपीए) 2.55 टक्के 
खातेदार 17 लाख 
सभासद 51,600 
शाखा 137 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijale write article on PMC bank financial restrictions issue