esakal | रिअल इस्टेट - गुंतवणुकीची हीच योग्य वेळ!

बोलून बातमी शोधा

"रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्‍ट'विषयी खास एकदिवसीय कार्यशाळा

घर घेण्यासाठी सर्व जण आपल्या आयुष्यात एक योग्य संधी शोधतात. अशीच संधी सध्या उपलब्ध असून, गृहखरेदीधारकांनी या संधीचे सोने करून घ्यायला हवे.

रिअल इस्टेट - गुंतवणुकीची हीच योग्य वेळ!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गेल्या सोमवारच्या अंकात ‘गुंतवणुकीसाठी घर घेताय?’ या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यात गुंतवणुकीसाठी घर घेणे कितपत फायदेशीर पडते, याचा ऊहापोह करण्यात आला होता. यावर वाचकांबरोबरच काही बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांच्या मागणीनुसार या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ आणि संधी कशी आहे, यावर भाष्य करणारा हा लेख.

घर घेण्यासाठी सर्व जण आपल्या आयुष्यात एक योग्य संधी शोधत असतात. अशीच संधी सध्या उपलब्ध असून, गृहखरेदीधारकांनी या संधीचे सोने करून घ्यायला हवे. भविष्याचा विचार केला तर इतर कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणुकीपेक्षा बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक हा एक सर्वसमावेशक व उत्कृष्ट पर्याय आहे. इतकेच नव्हे, तर गुंतवणूकदाराला विक्रीबरोबरच मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यामधूनदेखील वेळोवेळी फायदा मिळविता येतो. त्यामुळे अनेकवेळा आर्थिक मंदीच्या काळातदेखील बांधकाम क्षेत्राने गुंतवणूकदाराला तारले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

रिअल इस्टेट ही एक ‘फिजिकल ॲसेट’ असल्याने ती हरवू किंवा चोरीला जाऊ शकत नाही. जर योग्य प्रकारे त्याची काळजी घेतल्यास अगदी पुढच्या काही पिढ्यांसाठी देखील ती ‘रिअल ॲसेट’ ठरते. याबरोबरच जर स्वतःसाठी त्याचा वापर होत नसेल तर भाडेतत्त्वावर देऊनदेखील यामधून खात्रीशीर उत्पन्न मिळण्याची शाश्वती असतेच. २०१० मध्ये ३० लाख रुपये किंमत असलेल्या घराची सध्याच्या बाजारभावाची किंमत ही किमान एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, यावरून या क्षेत्राचे सरासरी वाढते दर आणि त्यामागील फायदा आपल्या लक्षात येईल.

सध्याच्या जागतिक महासाथीच्या पार्श्वभूमीवर लाखो नागरिकांना घरामुळेच एक आधार मिळाला आहे. अनेक नागरिकांना घरानेच सुरक्षित ठेवले आणि म्हणूनच असंख्य नागरिकांना स्वतःचे घर असण्याचे फायदे याच काळात प्रकर्षाने जाणवले. घराचे हे महत्त्व अधोरेखित होत असताना ‘नाईट फ्रँक इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार पुण्यासह भारतातील आठ शहरांत गृहखरेदीमध्ये मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये तब्बल ४४ टक्के वाढ झालेली पाहायला मिळाली. मात्र, कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे हा दर पुन्हा कमी होऊ शकतो. पण असे असले तरीही गुंतवणुकीसाठी इतर क्षेत्रांपेक्षा बांधकाम क्षेत्र हे जास्त फायद्याचे आहे, असे आपण म्हणू शकतो.

हेही वाचा: क्रेडिट कार्डवर कर्ज घेताय? मग 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

जागतिक महासाथीचा फटका हा बांधकाम व्यवसायालादेखील बसला असून, आजवर सर्वांत कमी दरांमध्ये गृहप्रकल्पांची विक्री केली जात आहे. याबरोबरच गृहकर्जावरील आजपर्यंतचा सर्वांत कमी व्याजदर सध्या आकारला जात आहे. यापेक्षा व्याजदर कमी होतील, असे वाटत नाही. तसेच महिलेच्या नावावर घरखरेदी केल्यास मुद्रांक शुल्कातसुद्धा सवलत देण्यात येत आहे. शिवाय, कर्जावरील मुद्दल आणि व्याजाच्या रकमेवर करसवलत मिळत असल्याने सध्या गृहखरेदीच्या व गुंतवणुकीच्या दृष्टीने अगदी योग्य वेळ आहे.

‘महारेरा’च्या कायद्यांमुळे आता गृहखरेदी व त्यामधील गुंतवणूक ही आणखी सुरक्षित झाली असून, बांधकाम व्यवसायिकांना दिलेल्या वेळेत घरे हस्तांतरित करावी लागत आहेत. दुसऱ्या बाजूला इंटरनेट, चॅनल पार्टनर यांमुळे गृहखरेदीची प्रक्रिया सोपी झाली आहे. नोंदणीसाठी आवश्यक सर्व बाबी बांधकाम व्यवसायिक आणि चॅनल पार्टनर पाहात असल्याने खरेदीदाराला घर खरेदी करणे हे आधीच्या तुलनेत सोपे झाले आहे. परवडणाऱ्या घरांचा विचार केल्यास, पंतप्रधान आवास योजनेचा मिळणारा फायदा, गरजेच्या वेळी प्रॉपर्टीच्या नावे घेता येणारे कर्ज या सुद्धा या क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी जमेच्या बाजू आहेत.

हेही वाचा: अर्थबोध - ‘सिक्रेट्स ऑफ द मिल्यनेअर माईन्ड’

मालमत्ता खरेदीची सर्व नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने यावर सरकारचीदेखील नजर असते. इतकेच नव्हे, तर कागदपत्रे हरविल्यास सरकारकडून ती पुन्हा मिळविणे आता शक्य आहे. कर्ज घेताना बँकेच्या वतीने तपासणी होत असल्याने या ठिकाणीदेखील सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जाते. निवासी मालमत्ता ही खरेदीच्या किंमतीवर किमान ३ ते ५ टक्के भाडे देऊ शकते. मालमत्ता जुनी असली तरीदेखील पुनर्विकासाअंतर्गत ती चांगला परतावा देऊ शकते, याचादेखील फायदा गुंतवणूकदाराला मिळू शकतो..

सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना जनसामान्यांमध्ये रूढ होताना दिसत असून, घरातून काम करणे सोपे जाईल, अशा पद्धतीच्या काहीशा मोठ्या घरांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. मागील तिमाहीत वाढलेला घरखरेदीचा आलेख, हे याचेच द्योतक आहे. यामध्ये प्रामुख्याने मोक्याची व कामाच्या दृष्टीने सोयीची ठिकाणे, हवेशीर खोल्या, आरोग्याशी संबंधित सुविधांची सोय यांबरोबर घरामधून काम करण्याच्या दृष्टीने अपेक्षित बदल यांचादेखील समावेश होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची साथ गेल्यानंतर पुन्हा कार्यालयांची गरज भासणारच आहे, हेही लक्षात ठेवायला हवे, कारण सर्व गोष्टींची घरी राहून पूर्तता होऊ शकत नाही.

हेही वाचा: शेअर मार्केट - दुसरी लाट...दुसरी संधी

परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांनादेखील या महासाथीच्या पार्श्वभूमीवर भारतात आपले स्वतःचे घर असावे व भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे महत्त्व लक्षात आले आहे.वाढती मागणी, मर्यादित पुरवठा, सिमेंट आणि स्टीलच्या वाढत्या किंमती यामुळे नजीकच्या भविष्यात रिअल इस्टेटचे दर निश्चितपणे वाढणार आहेत. त्यामुळे सध्या कमी मागणी व कमी किंमत असल्याने हाच काळ खरेदी व गुंतवणुकीसाठी योग्य आहे.