आयबीएमकडून रोजगार ‘पळवापळवी’ - ट्रम्प

पीटीआय
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

हिलरी क्‍लिंटन यांना अमेरिकेत येणाऱ्या सीरियातील निर्वासितांची संख्या ५५० टक्के वाढवायची आहे. जगातील सर्वांत धोकादायक विभागातील निर्वासितांना अनिर्बंध स्थलांतर आणि प्रवेश देण्याची हिलरी यांची इच्छा आहे. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार 

वॉशिंग्टन - अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या आयबीएम कंपनीने मिनिपोलिस येथील पाचशे कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांचे काम भारत तसेच, अन्य देशांतील कर्मचाऱ्यांना दिले, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. 

मिनिपोलिस येथे बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘‘आयबीएमने मिनिपोलिस येथील पाचशे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आणि त्यांचे काम भारत तसेच, अन्य देशांतील कर्मचाऱ्यांना दिले. आपले सरकार अमेरिकेतून बाहेर जाणारे रोजगार थांबवेल. तसेच, मिनिसोटा येथून बाहेर जाणारे रोजगारही थांबविण्यात येतील. एखाद्या कंपनीने मिनिसोटा येथील कामगारांना काढून टाकून त्यांचे काम दुसऱ्या देशांत वळवून त्यांनी उत्पादने पुन्हा विक्रीसाठी अमेरिकेत आणल्यास त्यावर ३५ टक्के आकारण्यात येईल.’’ 

‘बराक ओबामा यांनी लादलेल्या निर्बंधांचा मिनिसोटा येथील शेतकरी, कामगार आणि लघुउद्योगांना फटका बसत आहे. अशा प्रकारचे घातक निर्बंध रद्द करण्यात येतील. पुन्हा एकदा आपला देश श्रीमंत बनेल. परंतु, श्रीमंत देश बनण्यासाठी आपला देश सुरक्षित बनणेही गरचे आहे,’’ असे ट्रम्प यांनी नमूद केले.

Web Title: Donald Trump accuses IBM of moving jobs out of America